लघुउद्योग

खवा निर्मिती तंत्र
खवा निर्मिती तंत्र

खव्यापासून बर्फी, पेढा, गुलाबजामून, कलाकंद, कुंदा इ. पदार्थ तयार करता येतात. खवा बनविण्याच्या पारंपरिक पद्धतीत मंद आचेवर दूध तापवत ठेवून सतत ते हलवत राहावे लागते. दूध चांगले घट्ट झाल्यावर तापमान 80 ते 88 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आणले जाते. जेव्हा खवा कढईचा आजूबाजूचा व तळाचा भाग सोडेल आणि एकत्र चिकटू लागेल तेव्हा खवा तयार झाला असे समजावे. पण या पद्धतीत वेळ जास्त लागतो.

खवानिर्मिती यंत्र

खवानिर्मिती यंत्र हे गॅस मॉडेल व डिझेल मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. बहुतांशी ठिकाणी गॅस मॉडेलचाच वापर होतो. हे यंत्र वेगवेगळ्या क्षमतेचे आहे. यंत्र खरेदी करताना “जार क्षमता’ ध्यानात न घेता जास्तीत जास्त किती व कमीत कमी किती खवा बनविता येईल याचा विचार करावा.

खवा बनविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेस 60 ते 70 मिनिटे लागतात. प्रति किलो खव्यास नऊ ते दहा रु. खर्च (गॅस, वीज) येतो. डिझेल मॉडेलसाठी हा खर्च 16 ते 17 रु. प्रति किलो एवढा येतो. या यंत्रामध्ये मोठे गोलाकार भांडे 0.5 एच.पी. मोटारच्या साह्याने गोल फिरते. भांड्यातच असणाऱ्या दोन स्क्रॅपरच्या साह्याने दूध भांड्याच्या पृष्ठभागास व कडेस लागत नाही. फक्त आचेवर नियंत्रण ठेवावे लागते. मोठ्या चौकोनी चमच्याने (सुपडी) दूध खाली-वर करावे लागते. भांड्याला नळ जोडला असल्यामुळे दूध गरम करणे किंवा बासुंदी, खीरसाठी दूध आटवणे या गोष्टीही सहज होतात.

खवा तयार करताना

* खव्यासाठी निर्भेळ दूध वापरावे.
* गाईच्या एक लिटर दुधापासून 170 ते 190 ग्रॅम खवा मिळतो.
* म्हशीच्या एक लिटर दुधापासून 200 ते 220 ग्रॅम खवा मिळतो.
* दुधाची आम्लता 0.14 ते 0.15 टक्का इतकी असावी.
* दुधात फॅट कमी असल्यास खवा कोरडा बनतो.
* दुधात भेसळ असल्यास खवा कठीण बनतो.
* म्हशीच्या दुधापासूनचा खवा पांढरट, तपकिरी छटा असलेला, किंचित तेलकट पृष्ठभाग मृदू, मुलायम, दाणेदार किंचित गोड असा असतो.
* गाईच्या दुधापासूनचा खवा फिक्कट पिवळा, तपकिरी छटा असलेला, ओला पृष्ठभाग, किंचित कठीण, खारट असतो.

संपर्क – 9405794668
डॉ. धीरज कंखरे, कृषी महाविद्यालय, धुळे

केळीखोडापासून धागे
केळीखोडापासून धागे

केळीचा घड काढल्यानंतर केळीच्या खोडापासून धागानिर्मिती करणे शक्‍य आहे. त्यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळू शकेल.

केळीचे खोड लवकर कुजत नसल्यामुळे आंतरमशागतीसाठी अडचणी येतात. मात्र, खोडापासून धागानिर्मितीमुळे ही अडचण दूर होण्यासोबत उत्पन्नही मिळू शकते.

केळी खोडापासून धागानिर्मितीसाठी आवश्‍यक बाबी

केळी खोडापासून धागा काढणारे यंत्र

कापलेल्या केळीझाडांचे खोड

तीन पुरुष मजूर व २ स्त्री मजूर प्रतिदिवस

विद्युत पुरवठा

केळी खोडापासून धागानिर्मितीची प्रक्रिया

केळी खोडापासून उत्कृष्ट प्रतीचा धागा काढण्यासाठी लाल केळी, नेंद्रन, रस्थाली ह्या जातींचा वापर करतात. महाराष्ट्रात लागवडीखाली असलेल्या अर्धापुरी, ग्रॅन्ड नैन, श्रीमंती, महालक्ष्मी ह्या जातींपासूनही चांगल्या प्रतीचा धागा काढता येतो. धागा काढण्यासाठी फक्त खोडाचाच वापर करता येतो असे नाही, तर घडाच्या दांड्याचा तसेच पानाच्या शिरेचाही करता येतो. परंतु, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर धागा फक्त खोडापासून बनू शकतो. धागा काढण्यासाठी खोडाचा वापर झाड कापल्यापासून चोवीस तासांच्या आत करावा.

धागा काढणीसाठी तीन माणसांची गरज असते. एक माणूस खोड उभे चिरून त्याचे चार तुकडे करतो. त्यासाठी गुजरात येथील नवसारी कृषी विद्यापीठामध्ये केळीचे खोड कापणी यंत्र तयार केले आहे. हे यंत्र खोडाचे दोन ते चार उभे काप करते. दुसरी व्यक्ती प्रत्यक्ष यंत्रावर धागा काढणीचे काम करते. तिसरी व्यक्ती काढलेला धागा पिळण्याची प्रक्रिया करून धागा दोरीवर वाळत घालते. तसेच प्रक्रियेदरम्यान निघालेले पाणी व लगदा वेगळे करते. दोन स्त्री मजुरांचा वापर सहाय्यक म्हणून होतो.

सुकवलेला धागा मोठ्या दाताच्या फणीने विंचरून घेतल्यास धाग्याची प्रत चांगली मिळते. कुशल कारागीराद्वारे आठ तासांमध्ये २० ते २५ किलो धागा मिळू शकतो. या यंत्राची किंमत अश्‍वशक्तीनुसार ७० हजार ते १ लाख ७५ हजार रुपये अशी असते. केळी खोडापासून काढलेला धागा एकूण ३ (पहिली, दुसरी व तिसरी) प्रतीत विभागला जातो. यंत्रामधून काढलेले सूत सहसा तिसऱ्या प्रतवारीचे असते. त्याला विंचरून घेतल्यास ते दुसऱ्या प्रतिपर्यंत जाऊ शकते. त्यानंतर लाकडी पाटीने त्यास पॉलिश करून पांढरे शुभ्र झाल्यास पहिल्या प्रतिपर्यंत जाऊ शकते.

धाग्याचा दर

पांढरा शुभ्र धागा – १०० ते १२० प्रतिकिलो

सिल्व्हर शाईन धागा – ८० ते १०० प्रतिकिलो

पिग्मेंट युक्त धागा – ८० रु. किलो

धाग्याची उपयुक्तता

धाग्यापासून बारीक दोरी, दोरखंड, पिशव्या, पाय पुसणी, चटई, आकर्षक टोप्या, कापड, साड्या, शोभेच्या वस्तू, क्राफ्ट पेपर, टिश्‍यू पेपर, फिल्टर पेपर, पृष्ठ, फाईलसाठी जाड कागद, सुटकेस, डिनरसेट, बुटांचे सोल, चप्पल इत्यादी वस्तू बनविता येतात.

केळी खोडापासून धागा निर्मितीचे फायदे

केळी बागेतील न कुजणारे अवशेष जाळले जातात. त्यामुळे पर्यावरणाच्या ऱ्हासासोबतच जमिनीतील उपयुक्त जिवाणूही नष्ट होतात. त्याचा फटका उत्पादकतेला बसतो.

बागेच्या स्वच्छतेसाठी लागणारी अनुत्पादक मजुरी वाचते.

दुष्काळामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे घडनिर्मिती न झाल्यास उर्वरीत उभ्या खोडापासून काही प्रमाणात आर्थिक लाभ होऊ शकतो.

केळी खोडापासून धागेनिर्मिती यंत्र व कार्यपद्धती

या यंत्रात दोन रिजिड पाइप बसवले असून, गायडिंग रोलर असतात. या रोलरमुळे केळी खोड आत सरकते. खोडाच्या आकारमानानुसार दोन रिजिड पाइपमधील अंतर कमी-जास्त करता येते. रोलर फिरविण्यासाठी बेल्ट पुली यंत्रणा बसवलेली असते. यासाठी एक एचपी क्षमतेची सिंगल फेज विद्युत मोटर पुरेशी होते.

यंत्राच्या दुसऱ्या बाजूने निघालेले धागे पिळून त्यातील पाणी बाहेर काढले जाते. धागे तारांवर एक दिवस वाळवतात. कोरड्या धाग्यांमध्ये विशिष्ठ प्रकारची फणी फिरवून ते एकमेकांपासून वेगळे करतात.

शेतातून खोडाची वाहतूक, उभे चिरून त्याचे चार तुकडे करणे, यंत्रात भरणे व धागे पिळून काढणे या कामांसाठी पुरुष मजूर लागतात. धाग्यांतून फणी फिरविणे, ते वाळत घालणे या कामांसाठी महिला मजूर लागतात.

काजू टरफल प्रक्रियेबाबत माहिती
काजू टरफल प्रक्रियेबाबत माहिती

 1. काजू बी टरफलाच्या आतील व बाहेरील आवरणामध्ये ज्या मधमाश्‍यांच्या जाळ्यासारख्या पेशी असतात, त्यात अर्धप्रवाही घट्ट व चिकट द्रावण असते, त्यालाच काजू टरफल तेल म्हणतात. काजू टरफलाचे तेल हे काळ्या रंगाचे, घट्ट डांबरासारखे दिसते.
 2. काजू टरफल तेलाचा लॅमिनेटिंग कागद, ऍक्‍टिवेटेड कार्बन, ब्रेक लायनिंग, रंग, रेक्‍झिन, रबर संयुगे इत्यादी उद्योगधंद्यांत मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याव्यतिरिक्त इमारती लाकूड, होड्या, जहाजे इत्यादींना लावण्यासाठी वापर करतात. तेलामुळे लाकडाचे पाणी आणि कीटक, किडी इत्यादींपासून संरक्षण होते.
 3. काजू टरफल तेलापासून अनेक पदार्थ तयार करता येतात. कॉरडॅनॉल हा काजू बी टरफलाचा महत्त्वाचा घटक आहे. कॉरडॅनॉलचा उपयोग पृष्ठभागावर थर देण्यासाठी, विद्युतरोधक वॉर्निश आणि लाकडी सामानाला कोटिंग देण्यासाठी होतो.
 4. काजू टरफल तेल ऊर्ध्वपतनानंतर गाळाचा उपयोग हवेवर सुकणारे वॉर्निश, सायकलचे कोटिंग, प्रायमर (रंगाच्या आधी) इ. तयार करण्यासाठी होतो. ब्रेक लायनरमध्ये टरफल तेलाचा उपयोग करतात, तर त्याच्या उपपदार्थांचा उपयोग यंत्राचे तेल, कीडनाशक, औषधी द्रव्य इत्यादीमध्ये करतात.

संपर्क : 02358 – 282414 
कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली

उसापासून पॅकेजिंग
उसापासून पॅकेजिंग

सर्व प्रकारच्या उत्पादनविक्रीसाठी पॅकेजिंग ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. पॅकेजिंगमधून त्या उत्पादनाच्या वैशिष्ट्याला उठाव आणण्याचे काम केले जाते. सेंद्रिय उत्पादनासाठी नैसर्गिक व सेंद्रिय पॅकेजिंग आवश्‍यक मानले जाते. तसा आग्रहही आता जागरूक ग्राहक आणि सुपर मार्केट धरत आहेत. नेदरलॅंड येथील सेंद्रिय उत्पादक कंपनीने आपल्या पुरवठादारासह उसाच्या टाकाऊ घटकापासून पॅकेजिंग विकसित केले आहे.
नेचर अँड मोअर ही कंपनी सेंद्रिय भाजीपाला आणि फळांच्या उत्पादन आणि विक्रीमध्ये प्रसिद्ध आहे. सेंद्रिय शेतीमालाच्या विक्रीसाठी सेंद्रिय पद्धतीच्या पॅकेजिंगसाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यांनी फळांच्या पॅकेजिंगसाठी उसाच्या टाकाऊ घटकापासून बनविलेल्या कार्डबोर्डचा वापर केला आहे. याविषयी माहिती देताना कंपनीचे पॅकेजिंग तज्ज्ञ पॉल हेन्ड्रिक्‍स यांनी सांगितले, की गेल्या दोन वर्षांपासून नवीन प्रकारचे पॅकेजिंग विकसित करण्यासाठी पुरवठादारांसह प्रयत्न केले आहेत. त्यातून उसाच्या टाकाऊ घटकांचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात पॅकेजिंगनिर्मिती करण्यात येत आहे. या पॅकेजिंगचा उपयोग सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या वेली टोमॅटो, पिअर विक्रीसाठी केला जातो.

सुपर मार्केटही वळताहेत प्लॅस्टिकमुक्त पॅकेजिंगकडे

विघटन होणारे, पुनर्वापर करणे शक्‍य असलेल्या प्लॅस्टिकमुक्त व पर्यावरणपूरक पॅकेजिंगच्या वापराकडे सुपर मार्केट वळत आहेत. नेचर अँड मोअरच्या सेंद्रिय उत्पादनांचा प्रमुख खरेदीदार असलेल्या फ्रेंच चेन चारेफोर या सुपर मार्केट व्यवस्थापक ज्यूली मेहमोन म्हणाल्या, की आम्ही आमच्या पुरवठादारांकडून पॅकेजिंगसह अनेक बाबींमध्ये पुनर्वापरायोग्य अशा घटकांच्या वापराला प्रोत्साहन देत असतो. त्यातून कचरा विल्हेवाटीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. तसेच उसासारख्या घटकापासून पॅकेजिंग ही चांगली कल्पना आहे. त्याचा वापर अन्य पुरवठादारही करतील, अशी आशा आहे.

हे फायदे आहेत

 • प्लॅस्टिकचा वापर टाळला आहे.
 • टाकाऊ घटकांचा पुरेपूर वापर
 • कागदाच्या निर्मितीसाठी झाडांची तोड करावी लागणार नाही.
 • सध्या कंपनी जुन्या पद्धतीच्या ट्रे, टॅग आणि लेबल, स्टिकर यामध्येही बदल करीत आहे. उसापासून पॅकेजिंग हे स्वच्छ, नैसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादनासाठी योग्य आहे. तसेच वापरानंतर विल्हेवाट लावण्यामध्येही सोपे आहे. अगदी ते जाळले तरी पर्यावरणामध्ये प्लॅस्टिकप्रमाणे विषारी वायू निर्माण होत नाहीत.

आवळा कॅन्डी
आवळा कॅन्डी

आवळा कॅन्डी करताना पूर्ण पिकलेली मोठी किंवा मध्यम आकाराची रसदार फळे निवडावी. फळांना प्रथम उकळत्या पाण्याची प्रकिया ८ ते १० मिनिटे देऊन त्यामधील बिया आणि काप वेगळे करावेत. अर्धवट शिजलेल्या फळांवर बोटाचा दाब दिल्यावर पाकळ्या बियापासून सहजपणे वेगळ्या करता येतात. वेगळे केलेले काप प्रथम ५० डिग्री ब्रिक्स असलेल्या साखरेच्या पाकात २४ तास ठेवावेत. त्यासाठी १ लिटर पाण्यात १ किलो साखर मिसळावी. दुसऱ्या दिवशी पाकातील ब्रिक्सचे प्रमाण साधारणपणे २५ ते ३० एवढे कमी होते. त्यामध्ये ३५० ते ४०० ग्राम साखर मिसळून त्याचा ब्रिक्स ६० करावा. तिसऱ्या दिवशी त्याच पाकात ५०० ते ६०० ग्राम साखर मिसळून ब्रिक्स ७० डिग्री कायम ठेवावा. पाचव्या दिवशी त्याच पाकात १५० ते २०० ग्राम साखर घालावी आणि सातव्या किंवा आठव्या दिवशी पाकात मुरलेल्या पाकळ्या बाहेर काढाव्यात. पाकात पहील्यांदाच २% आल्याचा रस किवा विलायची पूड मिसळल्यास चव चांगली येते. कॅन्डी तयार झाल्यावर पाण्यात झटपट धुवून घ्यावी किंवा कापडाने पुसून घ्यावी आणि ३ ते ४ दिवस सुकवून घ्यावी. सुकलेली कॅन्डी प्लास्टिक पिशवीत भरून हवा बंद करावी.

(स्रोत: कृषी दर्शनी, महत्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

डेअरी व पोलट्री व्हेचर कँपिटल योजना
डेअरी व पोलट्री व्हेचर कँपिटल योजना

 1. पात्र शेतकरी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे ह्ग योजनेचा फायदा घेऊ शकतात.
 2. पात्र व्यवसाय व प्रकल्प किंमत-

 • अ) लहान डेअरी – ( १० म्हशी किंवा संकरीत गायी) दुधाचा महापूर योजना ज्या तालुक्यात राबविली आहे त्या तालुक्यांना ही योजना लागु नाही. प्रकल्प किंमत – रु. ३ लाख.
 • ब) मिल्कींग मशिन व बळ्क मिल्क कुलींग युनिट (२००० लि. क्षमतेपर्यंत) प्रकल्प किंमत – रु १५ लाख.
 • क) स्थानिक दुग्धजन्य पदार्थ तयार करणयासाठी मशिनरी विकत घेणे. प्रकल्प किंमत – रु १० लाख.
 • ड) दुग्ध पदार्थ वाहतुक व्यवस्था (कोल्ड चेन सहीत प्रकल्प किंमत – रु २० लाख.
 • इ) खाजगी व्हेटरनरी क्लिनिक काढण्यासाठी रु. २ लाख. फिरते क्लिनिक व स्थानिकासाठी रु. १.५० लाख
 • उ) पोल्ट्री ब्रीडींग फार्म – प्रकल्प किंमत – रु ३० लाख.

३. मार्जिन १० %
४  प्रकल्प किंमतीच्या ५० % बीनव्याजी वहेंचर कँपिटल
५  बँक कर्ज – प्रकल्प किंमतीच्या ४० %
६  परतफेड कालावधी ७ वर्षे
७  योजनेची अंमलबजावणी नाबार्ड बँकांमार्फत करते.
८  नियमित कर्जफेड करणान्यांस बँकेने दिलेल्या कर्जवर ५० %  व्याजासाठी अनुदान मिळते.

कृषी पदवीधारकांसाठी अँग्रो क्लिनिक व बिझनेस सेंटर योजना
कृषी पदवीधारकांसाठी अँग्रो क्लिनिक व बिझनेस सेंटर योजना

 1. कृषी किंवा कृषी संलग्न विषयातील पदवी धारक उघोजक वैयक्तिक कींवा संयुक्तपणे ह्ग योजनेचा फायदा घेण्यासाठी पात्र.
 2. ह्या योजनेअंतर्गत कृषी पदवी धारकाने तंत्रक्षान प्रसाराने पिकांचे रोग व किड नियंत्रण आदी बाबत शेतकन्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.
 3. या योजने अंतर्गत वैयक्तिक कर्जासाठी १० लाखाची / मर्यादा संयुक्तपणे घेतलेल्या प्रकल्पास रु. ५० लाखाची / मर्यादा.
 4. रु. ५ लाख पर्यँतच्या कर्जस मार्जनची आवश्यकता नाही. यापुढील कर्जाल अ. जा/ महिला लाभार्थीसाठी नाबार्डच्या मार्जीन मनी असिस्टोन्स योजनेखाली ५० % मार्जीन मनी उपलब्ध आहे.
 5. लाभार्य़ीस कर्जाशी निगडीत  २५ %  अनुदान उपलब्ध आहे. अजा / अजा महिला लाभार्थ्यास ३३ %  अनुदान उपलब्ध आहे. सदर रक्कम ३ वर्षे पुर्ण झाल्यावर मिळते.
 6. पहिली दोन वर्षे कर्जावरील पूर्ण व्याज रकमेचे अनुदान मिळते.
 7. वरील दोन्हीही प्रकारचे अनुदान बँक कर्जचे नियमितपणे परतफेड करणन्यासच मिळते. परतेफेडीचा कालावधी प्रकळ्पानुसार ५ ते १० वर्षे.
 8. उपरोक्त योजने अंतर्गत निवड झाल्यावर मान्याप्राप्त प्रशिक्षण संस्थेत विना शुल्क प्रशिक्षाणाची सोय.

ज्वारीवर आधारित प्रक्रिया पदार्थ
ज्वारीवर आधारित प्रक्रिया पदार्थ

ज्वारीचा उपयोग प्रामुख्याने भाकरीसाठी होतो. दक्षिण भारतामध्ये ज्वारीती संकटी, अन्नाम/ घुगऱ्या आणि पातळ पोरजी करण्यासाठी होतो. याशिवाय पारंपरिक पद्धतीने लाह्या, पापड्या, भातवाड्या व हुरड्यासाठी सुद्धा ज्वारीचा उपयोग केला जातो.

ज्वारीच्या लाह्या

मक्‍याप्रमाणेच ज्वारीपासून उत्तम प्रकारच्या लाह्या तयार होऊ शकतात. त्यासाठी राजहंस, कोंडवा, झिलारी या स्थानिक वाणांचा वापर केला जातो. राहुरी कृषी विद्यापीठाने यासाठी फुले पंचमी हे वाण प्रसारित केले आहे. परभणी मोती या वाणापासूनसुद्धा मोठ्या आकाराच्या आणि चविष्ट लाह्या तयार करता येतात.

पापडासाठी ज्वारी

पांढरी चिकनी आणि तांबडी चिकनी या जातीपासून उत्कृष्ट प्रकारचे पापड व कुरडई तयार करता येतात.

हुरडा

पेरणीनंतर ९०-९५ दिवसांनी दुधाळ अवस्थेत हुरडा तयार होतो. खरीप हंगामात वाणी, अकोला अश्‍विनी तर रब्बी हंगामात गुळभेंडी, सुरती या स्थानिक वाणांचा हुरड्यासाठी वापर होतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून येथून एस.जी. एस. ८४ तर राहुरी विद्यापीठातून उत्तरा हे वाण हुरड्यासाठी प्रसारित करण्यात आले आहेत. या वाणांच्या गोंडातून दाणे सहज पडतात. सरासरी एका कणसापासून ७०-९० ग्रॅम गोड हुरडा मिळतो. शिवाय ताटेही गोड असल्याने (ब्रिक्‍स १५-१७) जनावरे कडबा चवीने खातात.

ज्वारीचा रवा

ज्वारीच्या दाण्यांना पॉलिश केले असता त्यापासून विविध ग्रेडचा रवा तयार करता येतो. ज्वारीला पॉलिश/ परलिंग केल्याने कोंड्यामधील कडवट घटक पदार्थ निघून जातात. अशा प्रकारे तयार करण्यात आलेल्या रव्याची प्रत आणि चव उत्कृष्ट असते. यापासून उपमा, दोसा, इडली, शेवया, शिरा, लाडू, असे विविध पदार्थ बनवता येतात.

ज्वारीपासून तयार केलेल्या जाड रव्याची साठवण क्षमता प्लास्टिकच्या बॅगमध्ये सर्वसाधारण ४५ दिवस तर बारीक रव्याची ३० दिवसापर्यंत आहे. संकरित वाण एसपीएच १४४९, सी एस व्ही १४ आर आणि परभणी ज्योती या वाणापासून उत्कृष्ट प्रतीचा रवा तयार होतो.

ज्वारीपासून मिश्र आट्याची निर्मिती

राष्ट्रीय ज्वारी संशोधन संचालनालय, हैदराबाद यांच्या मार्फत ५०-६० टक्के ज्वारी, गहू, तांदूळ, मका, रागी, बाजरी व सोयाबीन यांचा समावेश करून मिश्र आट्याची निर्मिती झाली आहे. त्यापासून उत्कृष्ट प्रतीची व चवीची भाकरी/ धपाटे तयार करता येतात. तसेच प्रथिनांची उपलब्धता वाढल्यामुळे पौष्टिकता सुद्धा वाढविली जाते.

माल्टप्रक्रिया

ज्वारीला मोड आणून पीठ केल्यास त्यातील प्रथिनाची प्रत सुधारते. मुक्त अमिनो ऑसिड्‌स वाढतात. साखर वाढते, प्रथिनाची, स्टार्चची पचनक्षमता सुधारते. ज्वारीच्या माल्टयुक्त पिठात सोयाबीन आणि नाचणीचे माल्टयुक्त पीठ मिसळून पॉलिप्रोपीलीनच्या पिशव्यात भरून हवाबंद करून ठेवल्यास सहा महिने टिकते.

अशा पिठाची भाकरी मधुमेही रुग्णासाठी फायद्याची आहे. या पिठापासून थालीपीठ, पराठे, भाकरी, सुप इ. पदार्थ तयार करता येतात. शिवाय अस पीठ रुग्णाला त्वरीत ऊर्जा, प्रथिने खनिज द्रव्य जीवनसत्त्व मिळवून देतात.  या १०० ग्रॅम पिठापासून १५ टक्के प्रथिने, ६.५ टक्के तंतूमय घटक ३.८ टक्के उष्मांक, ४३५ किलो कॅलरीज मिळतात.

ज्वारीची बिस्किटे

ज्वारीच्या माल्ट पिठात नाचणी, सोयाबिनचे माल्ट पीठ, मिल्क पावडर घालून साखर विरहित क्रिमसह, प्रथिनयुक्त, उच्च तंतुमय आणि कमी कॅलरीज असणारी उत्तम प्रतीची बिस्किटे तयार करता येतील.

ज्वारीचे पोहे

ज्वारीच्या दाण्यावरील जाडसर थर (परलिंग) मशिनने काढून टाकून कुकरमध्ये उकडून घेताना त्यात थोडसं सायट्रिक आम्ल आणि मीठ घालतात. उकडल्यानंतर बाहेर काढून ते दाणे पोह्याच्या मशिनने चपटे करावेत. ड्रायरने चांगला कुरकुरीतपणा येईपर्यंत सुकवावेत. असे पातळ पोहे पॅकिंग करून विकावेत.

ज्वारीचा उकडा रवा

उकडा रवा तयार करण्यासाठी ज्वारी ऑटोक्‍लेव्हमध्ये उच्च दाबाखाली शिजवले जाते. नंतर ती सुकवून जाडसर दळली जाते चाळून रवा वेगळा करावा. हा रवा हवाबंद पॅक करून जास्त काळ टिकवता येतो. यापासून उपीट, उतप्पा, डोसा, इडली बनविता येते.

ज्वारीपासून मद्यार्क निर्मिती

काळ्या, खाण्यास अयोग्य अशा ज्वारीपासून आधुनिक तंत्राने मशिनच्या साह्याने ऊर्ध्वपातन पद्धतीने मद्यार्क निर्मिती करता येते. गोड ज्वारीपासूनही मद्यार्क निर्मिती करता येते.

इतर उपयोग

इतर अनेक उपयोगांसाठी ज्वारीचा वापर केला जातो. उदा. स्टार्च निर्मिती, पाव/ब्रेड बनवण्यासाठी, काकवी, गूळ, खांडसरी, साखर, बिअर व अल्कोहोलसुद्धा गोड ज्वारीपासून तयार करता येते. पशुखाद्य म्हणून जनावरे कोंबड्या, डुकरे यांच्यासाठीसुद्धा ज्वारी धान्याचा उपयेग केला जातो.

चाऱ्यासाठी ज्वारी ओल्या व वाळलेल्या कडब्यावर प्रक्रिया करून जनावरांसाठी सुद्धा उत्तम प्रतीचा चारा तयार करता येतो. ओल्या चाऱ्यापासून मुरघास (सायलेज), तर वाळलेल्या चाऱ्यापासून कडबाकुट्टी, कडबा बारीक करून त्याचे चौकोनी ठोकळे तयार करणे.  तसेच ज्वारीच्या कडब्याबरोबर हरभरा, भुईमूग, तूर, उडीद, इ. भुसकटांचा वापर करून चविष्ट आणि अधिक पोषणमूल्य असलेला चारा जनावरांना मिळू शकतो.

क्षेत्र उत्पादन व उत्पादकता

शास्त्रीयदृष्ट्या ज्वारी हे सी-४ या वर्गातील पीक आहे.  प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया अतिशय कार्यक्षमतेने केली जाते.

ज्वारी हे पीक ग्रॅमिनी या वंशातील असून, त्याचे शास्त्रीय नाव ‘सोरगम बायकोलार’ असे आहे.

ज्वारीच्या कणसाचा आकार, दाटपणा व दाण्याचा आकार यावरून ज्वारीचे पाच प्रकार आढळतात. ते म्हणजे बायकोलार, गुनीया, कोडॅटम, काफिर आणि ड्युरा.

ज्वारीची प्रथम उत्पत्ती इथियोपिया या आफ्रिकन देशात झाली आहे. आफ्रिका खंडातील काही देश उदा. सुदान, कॅमेरून, खांडा इ. देशात ५० टक्के पेक्षा जास्त ज्वारीचे पीक घेतले जाते.

जगामध्ये अमेरिका, नायजेरिया, मेक्‍सिको, भारत, सुदान, अर्जेंटिना,

चीन, इथियोपिया, ऑस्ट्रेलिया, बक्रीना, फॅस्को आणि ब्राझील हे

ज्वारीचे प्रमुख उत्पादक देश आहेत. जागतिक स्तरावर ज्वारी हे गहू,

मका, भात व बार्ली यांच्यानंतर पाचव्या क्रमांकाचे प्रमुख अन्नधान्य पीक आहे.

इ.स. २०१०-२०११ मध्ये जगातील ११० देशात ४०.५ दशलक्ष हे. क्षेत्रावर ज्वारीचे पीक घेतले असून, ५५.६५ दशलक्ष टन एवढे उत्पादन मिळाले होते. भारत हा जगातील ज्वारी उत्पादक देशातील चौथ्या क्रमांकाचा देश असून एकूण उत्पादनाच्या १८ टक्के वाटा भारताचा आहे. (संदर्भ ः एफएओ)

भारतातील एकूण ज्वारीच्या क्षेत्र उत्पादनात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा

(४९ टक्के) आहे. महाराष्ट्रा खालोखाल कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेशव आंध्र प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. परंतु, उत्पादकतेचा विचार करता मध्य प्रदेश (१४२६ किलो ग्रॅम/हे) त्या पाठोपाठ आंध्र प्रदेश (१२१३ कि.ग्रॅ./ हे), कर्नाटक (११८० कि.ग्रॅ./हे) या राज्यांचा क्रमांक लागतो.

ज्वारी इडल्या, चकल्या आणि केकही !

ज्वारीच्या मूल्यवर्धनासाठी शबरी फ्रेश ब्रॅंड

सोलापूर जिल्ह्याची ओळख असलेल्या ज्वारीचे मूल्यवर्धन करून उद्योजक तयार करण्यासाठी सोलापूर कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) पुढाकार घेतला आहे. केव्हीकेच्या नावाने ‘शबरी फ्रेश’ या नावाखाली खास ब्रॅंड तयार केला असून, ज्वारीच्या रव्याची विक्री सुरू केली आहे. ज्वारीचे अधिकाधिक मूल्यवर्धन व्हावे, हा हेतू त्यामागे आहे.

शेतमाल प्रक्रिया किंवा मूल्यवर्धन याबाबत केवळ मार्गदर्शन करण्यापेक्षा यासंबंधीचा प्रयोग स्वतः करावा, तो इतरांना दाखवावा आणि उद्योजक घडवावेत असा व्यापक दृष्टिकोन सोलापूर कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) ठेवला आहे. या संबंधीचे प्रशिक्षण महिला बचत गटांना देऊन उद्योजक घडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. शंभरहून अधिक महिलांना प्रशिक्षण दिले आहे.

आरोग्यासाठी पौष्टिक म्हणून ज्वारीची निवड

पौष्टिक म्हणून ज्वारी परिचित आहेच. त्यात विविध आरोग्यदायी गुणधर्म आहेत. अमेरिकेसारख्या देशातही ज्वारीला महत्त्व आले आहे. ज्वारीपासून रवा, पोहे, शेवया, लाह्या यासारख्या पदार्थांचे महत्त्व बाजारात वाढत आहे. ज्वारीच्या पिठात सोयाबीनचे पीठ मिसळून त्यातील प्रथिनांचे प्रमाण १४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढवता येते. ज्वारीसोबत गहू, मका, रागी, बाजरी, सोयाबीन अशा विविध अन्नधान्यांची पिठे मिसळून तयार करण्यात येणाऱ्या भाकरीची चव काही न्यारीच आहे.

महिला बचत गटांना प्रशिक्षण

ज्वारीचे हे महत्त्व कृषी विज्ञान केंद्राने जाणले आणि २०१० पासूनच ज्वारीच्या मूल्यवर्धनासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी मशिनरीसह कौशल्याची गरज होती. त्यासाठी प्रयत्न केले. ज्या महिला बचत गटांनी या कामासाठी तयारी दर्शवली, त्यांची मानसिक तयारी पूर्ण करून घेतली. तज्ज्ञांकडून बचत गटांतील महिलांमध्ये कौशल्य विकसित केले. आवश्‍यक प्रशिक्षण, कच्चा मालाचा पुरवठा, ब्रॅंडिंग, ट्रेडमार्क, मार्केटिंग यासारख्या तांत्रिक गोष्टीपासून विक्री व्यवस्थेपर्यंतचे सर्व प्रशिक्षण देण्यात आले.

ज्वारीच्या मूल्यवर्धनासाठी पाच प्रकारची यंत्रे आहेत. त्यावर वेगवेगळी कामे करता येतात. त्यात क्‍लिनिंग अँड ग्रेडिंग (ज्वारी स्वच्छ करणे), पल्वरायझर, डीहलर (ज्वारीचे पॉलिशिंग), पीठ, रवा, भुसा वेगळे करणे (फ्लोअर शिफ्टर) आणि त्यानंतर ज्वारीच्या पदार्थांचे पॅकिंग आदीं विविध कामांसाठी ही यंत्रे उपयोगात आणली जातात.

ज्वारी व अन्य तृणधान्यातील पोषक घटकांचे प्रमाण

तृणधान्य ज्वारी रागी मका बाजरी तांदूळ गहू
प्रथिने (टक्के) 11.6 7.3 1.1 11.6 6.8 12.1
स्निग्ध पदार्थ (टक्के) 1.9 1.3 3.6 5.0 0.5 1.7
खनिज पदार्थ (टक्के) 1.6 2.7 1.5 2.3 0.6 2.7
तंतूमय पदार्थ  (टक्के) 1.6 3.6 2.7 1.2 0.2 1.9
पचणारे तंतूमय पदार्थ (मि.ग्रॅ/ग्रॅ.) 12.69 19.08 —- —- —- 11.40
पिष्टमय पदार्थ (टक्के) 72.6 72.0 66.2 67.5 78.2 69.4
ऊर्जा (मि.ग्रॅ./ 100 ग्रॅम) 349 328 342 361 345 341
कॅल्शियम (मि.ग्रॅ/ 100 ग्र्रॅम) 25 344 10 42 10 48
फॉस्फरस (मि.ग्रॅ/ 100ग्रॅम) 222 286 348 296 160 355
लोह(मि.ग्रॅ/100ग्रॅम) 4.1 3.9 2.3 80 0.7 4.9

लेखक : डॉ. हि. वि. काळपांडे, ०२४५२-२२११४८(लेखक ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक)

मशरूम लागवड प्रक्रिया
मशरूम लागवड प्रक्रिया

काड भिजवणे

प्रथम काड लांब असल्यास त्याचे ३-५ सें.मी. चे तुकडे करावेत. नंतर थंड पाण्यात १०-१२ तास भिजवावे. भिजलेले काड बाहेर काढून निर्जंतुक करावे. निर्जन्तुकीकरणा करिता गरम पाण्यात १ तास ठेवावे.

निर्जंतुकीकरण

निर्जंतुकीकरणा करिता २०० लि. क्षमता असणारा गंज नसणारा ड्रम घ्यावा. त्यात १०० लि.पाणी टाकावे व ते ८० ते ८५ अंश सेल्सियस तापमानापर्यंत गरम करावे व त्यात भिजवलेले काड १ तास ठेवावे. त्यानंतर २ तास निर्जंतुक केलेले काड निथळण्याकरिता ठेवावे.

आळिंबी लागवड प्रक्रिया

काड भिजवणे → १२ ते १५ तास → गरम पाण्यात निर्जंतुक करणे

↓ १ तास

पिशव्यांमध्ये बी भरणे

उबविणे

↓ १४ ते २० दिवस

पिशवी काढणे

↓ २-३ दिवस

१ ली काढणी

↓ ४-६ दिवस

२ री काढणी

↓ ५-६ दिवस

३ री काढणी

३. बी पेरणे

प्लास्टिकच्या पिशवीत काडाचा थर द्यावा. अंदाजे दोन ते अडीच इंच. नंतर त्यावर पिशवीच्या कडेने बी पेरावे. बीच्या थरावर पुन्हा काडाचा थर द्यावा. पुन्हा बी चा ठार, असे करून पिशवी भरावी.

बी पेरताना ओल्या काडाच्या २% प्रमाणात पेरावे. पिशवी भरताना काड दाबून भरावे. पिशवी भरल्यावर दोर्याच्या सहाय्याने तोंड बांधावे व पिशवीला २५-३० छिद्रे मारावीत. छिद्रे पाडताना दाभान किंवा गंज नसलेल्या सुईचा वापर करावा.

उबविणे

बुरशीच्या वाढीकरिता उबविने ही महत्वाची क्रिया आहे. बी पेरून बांधलेल्या पिशव्या निर्जंतुक खोलीत ठेवाव्यात. खोलीत अंधार ठेवावा व तापमान २२ ते २६ अंश सेल्सियस ठेवावे.

पिशवी काढणे

पिशवीमध्ये बुरशीची पूर्ण वाढ झाल्यावर ती पांढरी दिसते. ती ब्लेडने कापून काढावी व रॅकवर ठेवावी. तापमान २० ते ३० अंश सेल्सियस  व आद्रता ७०-८५% राहील याची दक्षता घ्यावी. खोलीमध्ये अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश (संधीप्रकाश) व हवा खेळती ठेवावी. पिशवीतून काढलेल्या बेडवर एक दिवसानंतर पाण्याची हळुवार फवारणी करावी. दिवसातून ३-४ वेळा पाण्याची फवारणी करावी. फवारणी करण्याकरिता पाठीवरचा स्प्रे पंप किंवा हॅन्ड स्प्रेचा वापर करावा.

काढणी

मशरूमची पूर्ण वाढ पिशवी फाडल्यानंतर ४-५ दिवसांत होते. वाढ झालेले मशरूम हाताने उजवीकडे किंवा डावीकडे वळवून काढावेत. मशरूम काढल्यानंतर बेड एक ते दीड इंच खरडावा व पाणी द्यावे. १० दिवसांनी दुसरे पीक, परत १० दिवसांनी तिसरे अशी तीन पिके मिळतात.

एका बेड (पिशवी) पासून ९०० ते १५०० ग्रॅम पर्यंत ओली आळिंबी मिळते. शिल्लक राहिलेल्या बेडचा वापर झाडांना खत, जनावरांना पौष्टिक चारा म्हणून करण्यात येतो.

साठवण

ताज्या आळिंबीची (मशरूमची) साठवण छिद्रे पाडलेल्या २००-३०० गेजच्या प्लास्टिक पिशवीत करतात. ४-५ दिवस फ्रीजमध्ये मशरूम उत्तम राहते. मशरूम उन्हात दोन दिवसात उत्तम वळते. मशरूम वाळवण्याकरिता ४५-५० अंश सेल्सियस तापमान योग्य ठरते. वाळविलेले मशरूम सीलबंद पिशवीत भरून ठेवावे.

योग्य व्यवस्थापन यशाची गुरुकिल्ली

मशरूम उत्पादन येण्याकरिता महत्वाच्या बाबी :

१. मशरूम उत्पादन परिसर स्वच्छ ठेवावा.

२. मशरूमचे उत्पादन बंदिस्त जागेतच घ्यावे.

३. मशरूमच्या खोलीत खेळती हवा राहील, याची काळजी घ्यावी.

४. खोलीतील तापमान ३० अंश सेल्सियस व आद्रता ८०% राहील याची काळजी घ्यावी.

५. आळिंबी लागवड करणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता पाळावी. स्वच्छ कपडे, चप्पल यांचा वापर करावा.

६. नवीन व स्वच्छ कोरडा कच्चा माल वापरावा.

७. काडाचे निर्जंतुकीकरण महत्वाची प्रक्रिया आहे. ती योग्य करावी.

८. सूर्यप्रकाश प्रत्यक्ष येऊ देऊ नये. संधीप्रकाश बॅग उघडल्यावरच भरपूर ठेवावा.

९. मशरूम बेडवर फवारण्याचे पाणी स्वच्छ असावे.

१०. पिशव्या भरण्यापूर्वी काड फार ओले नसावे. हाताने दाबून पाहावे. पाणी न निघाल्यास भरण्यास योग्य आहे, असे समजावे.

११. पिशव्या ठेवताना दोन पिशव्यातील अंतर १० इंच ठेवावे.

१२ .रोग, किडीचा, चिलटांचा प्रादुर्भाव झाल्यास नुवान ( १ मि.मि., १ लिटर पाण्यात मिसळून फवारावे.)

१३. आळिंबीचे स्पॉन विश्वसनीय संस्थेमार्फतच घ्यावे. जुने, काळसर, हिरवी बुरशी असणारे स्पॉन वापरू नये.

१४. भरलेल्या बेड (पिशव्या) मध्ये कीडी, रोगांचा प्रादुर्भाव झाला तर नाही ना, या करिता दर रोज निरीक्षण करावे.

१५.  मशरूमची काढणी वेळेत करावी. योग्य पद्धतीने वर्गीकरण करावे. उन्हात किंवा ड्रायरमध्ये आळिंबी सुकवून सीलबंद पाकिटात साठवण करावी.

अशा पद्धतीने काळजी घेतल्यास आपण यशस्वी उत्पादन घेऊ शकतो.

बोरापासून रस, सरबत, स्क्वॅश
बोरापासून रस, सरबत, स्क्वॅश

बोरापासून घरच्या घरी रस, सरबत, स्क्वॅश तयार करता येतो. उमराण, गोला, ऍपल बोर, कडाका या बोरांपासून टुटीफ्रुटी तयार करावी.

रस

1) खाण्यायोग्य असलेली पिवळसर रंगाची पिकलेली व निरोगी बोरे निवडून घ्यावीत. किडकी बोरे निवडून काढण्यासाठी बोरे पाण्यात टाकल्यास किडकी बोरे पाण्यावर तरंगतात, तर चांगली बोरे पाण्यात बुडतात.
2) पाण्यात बुडालेली बोरे स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर बोरातील बी कॉर्क बोररच्या साह्याने काढून गरांचे बारीक तुकडे करून ते मिक्‍सरमधून लगदा तयार करावा किंवा पल्परला लावून गर एकजीव करून घ्यावा.
3) या लगद्यात 0.50 ते 1 टक्का पेक्‍टिनेज थ्री एक्‍सएल किंवा ट्रायझाइम पी-50 हे एंझाइम मिसळून रस थोडा वेळ तसाच ठेवावा. यामुळे रसाची रिकव्हरी 45-55 टक्‍क्‍यांपर्यंत मिळते.
4) हायड्रॉलिक बास्केट प्रेसच्या साह्याने त्या लगद्यातून रस काढावा. हा रस पाश्‍चराईझ करून, परिरक्षकाचा वापर करून, निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून, बाटल्या हवाबंद करून वर्षभर साठवून ठेवता येतो. हा रस पुढील पेये तयार करण्यासाठी वापरता येतो.

सरबत, स्क्वॅश, सिरप

1) सरबत तयार करताना वरीलप्रमाणे काढलेला रस 10 टक्के, रसामधील साखर ग्रहित धरून उरलेली साखर टाकून त्याचा ब्रिक्‍स 15 अंश, सायट्रिक आम्ल मिसळून आम्लता 0.30 टक्के करावी. उरलेले पाणी वापरून सरबत तयार करावे.
2) स्क्वॅश करताना रस 25-30 टक्के घ्यावा. रसामधील साखर व आम्लता ग्रहित धरून बाकीची साखर व सायट्रिक आम्ल टाकून अनुक्रमे त्याचा ब्रिक्‍स 45 अंश व आम्लता 1.50 टक्के करावी. तयार झालेला स्क्वॅश निर्जंतुक केलेल्या बाटल्यांत भरावा. स्क्वॅश वापरताना एक ग्लास स्क्वॅशमध्ये दोन किंवा तीन ग्लास थंड पाणी घालून त्याचा आस्वाद घ्यावा.
3) सिरप करण्यासाठी रस 40 टक्के घ्यावा. रसामधील साखर ग्रहित धरून उरलेली साखर व सायट्रिक आम्ल टाकून त्याचा अनुक्रमे ब्रिक्‍स 65-68 अंश, आम्लता 1.5 ते 2 टक्के व उरलेले पाणी टाकून सिरप बनवावा. स्क्वॅश व सिरपमध्ये सोडियम बेन्झोएट 600 मिलिग्रॅम प्रति किलो पेय या प्रमाणात वापरावे. सिरपचा आस्वाद घेताना एक ग्लास सिरपमध्ये चार-पाच ग्लास थंड पाणी मिसळावे.

बोराची टुटीफ्रुटी

1) बोरापासून टुटीफ्रुटी तयार करण्यासाठी उमराण, गोला, ऍपल बोर, कडाका इत्यादीसारख्या आकाराने मोठ्या असणाऱ्या जाती वापराव्यात.
2) टुटीफ्रुटी तयार करण्यासाठी पिवळसर रंगाची बोरे निवडून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत व त्यांची साल स्क्रॅपरच्या किंवा पिलरच्या साह्याने काढावी. नंतर त्यातील बी कॉर्क बोररच्या साह्याने काढून टाकून सुरीने त्यांचे चौकोनी लहान तुकडे करून उकळत्या पाण्यात 3 मिनिटे धरावेत. नंतर ते तुकडे एक टक्का सायट्रिक आम्ल असलेल्या 50 अंश ब्रिक्‍सच्या पाकात 24 तास ठेवावेत. गरज भासल्यास खाद्य रंग वापरावा.
3) दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी पाकाचा ब्रिक्‍सवर कॅंडीमध्ये दिल्याप्रमाणे करावा. तुकडे पूर्णपणे पाकवल्यानंतर पाकातून काढून, वाहत्या पाण्यात धुऊन घ्यावेत. सावलीत सुकवून, वजन करून, प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवावेत.
4) बोरापासून तयार केलेल्या टुटीफ्रुटीचा उपयोग विविध प्रकारचे केक, फ्रूट ब्रेड, फ्रूट सॅलड, आइस्क्रीममध्ये करता येतो.

जॅम

1) चांगली पिकलेली निरोगी फळे निवडून वाहत्या स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यावीत. नंतर फळांतील बी कॉर्क बोररच्या साह्याने काढून त्यांचे लहान लहान तुकडे करावेत.
2) या तुकड्यांच्या वजनाएवढे पाणी टाकून शिजवून घ्यावे व तो लगदा थंड थालेवर एक मिलिमीटरची छिद्रे असलेल्या चाळणीतून काढून घ्यावा. या एकजीव केलेल्या 1 किलो गरामध्ये 1 लिटर पाणी, 750 ग्रॅम साखर व 8-10 ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून ते मिश्रण शेगडीवर गरम करावे.
3) मिश्रणाचा ब्रिक्‍स 65 ते 68 अंश ब्रिक्‍स आला किंवा ते मिश्रण तुकड्यात पडू लागले म्हणजे जॅम तयार झाला असे समजावे. तयार झालेला जाम गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून, बाटल्या थंड झाल्यावर मेणाचा थर देऊन किंवा ऍल्युमिनियम फॉइल लावून, लेबल लावून, बाटल्या थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.

फणसापासून मुरांबा, जॅम
फणसापासून मुरांबा, जॅम

फणसातील महत्त्वाचा खाद्य भाग म्हणजे पिकलेले गरे. हे गरे रुचकर, मधुर व गोड असतात. त्यात “अ’ आणि “क’ जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. पिकलेल्या फणस गरांपासून जेली, जॅम, सरबत, मुरांबा, फणसपोळी, स्क्वॅश, नेक्‍टर इ. पदार्थ बनवितात. फणसापासून वेफर्स, चिवडासुद्धा बनविले जातात. कोवळ्या (कच्च्या) फणसाचा उपयोग भाजीसाठी केला जातो.
फणसाचे फळ पोषणदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत आहे. फळातील महत्त्वाचा खाद्य भाग म्हणजे पिकलेले

गरे

गरे रुचकर, मधुर व गोड असतात. त्यात “अ’ आणि “क’ जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. फणसाच्या बियासुद्धा खाद्य म्हणून वापरतात. बियांमध्ये कर्बोदकांचे / पिष्टमय पदार्थांचे प्रमाण मुबलक आहे. बी खाण्यासाठी वापरताना भाजून किंवा उकडून खाण्यासाठी वापरतात. बिया ओल्या असताना त्याची चिरून भाजी करतात. सुकवलेल्या अठळ्या डब्यामध्ये साठविता येतात. सुकलेल्या बिया पाहिजे त्या वेळेस भाजून वा मिठाच्या पाण्यात उकडून खातात. भाजलेल्या बियांची भाजी करण्याचीही पद्धत आहे. पिकलेल्या फणस गरांपासून जेली, जॅम, सरबत, मुरांबा, फणसपोळी, स्क्वॅश, नेक्‍टर इ. पदार्थ बनवितात. फणसापासून वेफर्स, चिवडासुद्धा बनविले जातात. कोवळ्या (कच्च्या) फणसाचा उपयोग भाजीसाठी केला जातो. अशा प्रकारच्या फणसापासून लोणचेदेखील चांगले होते. फणसाच्या लाकडाचा उपयोग इमारतीसाठी वापरला जातो. फणसाचे गरे व बिया सोडून राहिलेला भाग जनावरांना खाद्य म्हणून उपयोगात आणला जातो.

गऱ्यांचा मुरांबा

पाण्यामध्ये एक टक्का सायट्रिक आम्ल टाकून एकत्र करून त्यामध्ये कापा फणसाचे गरे 20-25 मिनिटे बुडवून ठेवावेत. हे गरे जसेच्या तसे किंवा तीन-चार तुकडे करून घ्यावेत. एका भांड्यामध्ये पाणी घेऊन उकळायला ठेवावे. पाण्याला उकळी आली, की त्यामध्ये सायट्रिक आम्लाच्या पाण्यातील गरे काढून गाळा. एक उकळी आली, की गॅस बंद करून, भांड्यावर झाकण ठेवून, दहा मिनिटे तसेच स्टेनलेस स्टीलच्या चाळणीत वरील गरे व पाणी टाकून, गरे निथळून घ्यावेत. नंतर साखरेचा 65 अंश ब्रिक्‍सचा पाक करून त्यामध्ये 0.8 टक्का सायट्रिक आम्ल टाकावे. द्रावणाला चांगली उकळी आल्यानंतर द्रावण शेगडीवरून उतरून त्यामध्ये वरील निथळलेले गरे टाकावेत व शेवटी 0.05 टक्का पोटॅशिअम मेटाबायसल्फाईट टाकून वरील मिश्रण निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या बरणीत भरून हवाबंद करावे. बरणी थंड व कोरड्या जागी साठवावी.

गऱ्यांचा जॅम

पिकलेल्या फणसाच्या गऱ्यांमधील बिया (आठळ्या) काढून, त्याचे तुकडे करावेत. त्या तुकड्यांमध्ये आवश्‍यकतेनुसार पाणी टाकून मिक्‍सरच्या किंवा पल्पच्या साह्याने लगदा करून घ्यावा व जॅम बनविण्यासाठी खालीलप्रमाणे साहित्य वापरावे.साहित्य – प्रमाण
गर लगदा – एक किलो
साखर – 1.250 किलो
सायट्रिक आम्ल – दहा ग्रॅम
पोटॅशिअम मेटाबायसल्फाइट – एक ग्रॅम

गऱ्यांचा लगदा व साखर स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात एकत्र करून शिजविण्यासाठी शेगडीवर ठेवावे. मिश्रण घट्ट होत आल्यानंतर, दोन वेगवेगळ्या काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये सायट्रिक आम्ल व पोटॅशिअम मेटाबायसल्फाईट विरघळून वरील मिश्रणात टाकावे. मिश्रण शिजत असताना सतत ढवळावे. जेणेकरून भांड्याला लागणार नाही किंवा करपणार नाही. मिश्रणातील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण 68.5 अंश ब्रिक्‍सच्या वर गेल्यावर जॅम तयार झाला असे समजावे किंवा मिश्रण तुकड्यात पडू लागले म्हणजे जॅम तयार झाला असे समजावे. तयार झालेला जॅम रुंद तोंडाच्या निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये भरून, हवाबंद करून, कोरड्या व थंड जागी साठवावा.

गऱ्यांची जेली

फणसाच्या गऱ्यांमध्ये पेक्‍टीनचे प्रमाण चांगले असल्याने त्यापासून उत्तम जेली तयार होते. गऱ्यांमधील आठळ्या बाजूला करून, गऱ्यांचे बारीक तुकडे करावेत. जेली करताना गऱ्यांबरोबर सालीचा पांढरा भाग घेतल्यास उत्तम जेली होते. एक किलो तुकड्यासाठी सव्वा ते दीड लिटर पाणी टाकावे. मिश्रण 30 मिनिटे शिजवावे. मिश्रण शिजत असताना पळीने सतत ढवळावे. थंड झाल्यावर हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घेऊन उभट भांड्यात एक दिवस फ्रीजमध्ये ठेवावे. उभट भांड्यातील पारदर्शक रस वेगळा करावा. अशाप्रकारे वेगळ्या केलेल्या रसामध्ये (एक किलो रसासाठी) एक किलो साखर घालून, मिश्रण ढवळून गरम करण्यास ठेवावे. मिश्रण बऱ्यापैकी घट्ट होत आल्यानंतर त्यामध्ये दोन वेगवेगळ्या ग्लासमध्ये वरील पारदर्शक रस घेऊन सहा ग्रॅम सायट्रिक आम्ल व एक ग्रॅम पोटॅशिअम मेटाबायसल्फाईट विरघळून वरील मिश्रणात टाकावे. मिश्रणातील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण 67 अंश ब्रिक्‍सच्या वर गेल्यावर किंवा मिश्रण तुकड्यात पडू लागले किंवा गोळीबंद पाकाची परीक्षा घेऊन जेली तयार झाल्याची खात्री करावी. तयार झालेली जेली निर्जंतुक केलेल्या बाटलीमध्ये भरून हवाबंद करून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवावी.

फणस पोळी

पोळी तयार करण्यासाठी गऱ्यांमधील बिया काढाव्यात. गऱ्यांतील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण साखर टाकून 23 ते 25 अंश ब्रिक्‍स करावे. मिक्‍सरमध्ये गरे व साखर एकजीव करून घ्यावे. एकजीव केलेले मिश्रण, तुपाचा हात लावलेल्या पसरट स्टीलच्या ताटात पातळ पसरावे. उन्हामध्ये वाळविण्यास किंवा वाळवणी यंत्रामध्ये 55 ते 60 अंश तापमानास वाळवावे. गराचा एक थर वाळल्यानंतर दुसरा थर द्यावा. असे थरावर थर देऊन जाडी 1.5 सें.मी. झाली की बटर किंवा ऍल्युमिनिअम फॉईलच्या पेपरमध्ये गुंडाळून रुंद तोंडाच्या बरणीत भरून साठवितात.: 02426- 243247, प्रा. कड, 
उद्यानविद्या विभाग, 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

औषधी गुणधर्म

फणस रुचकर, मधुर व गोड असतो. फणस खाण्याने तृप्ती होते.
फणस शुक्रधातू वाढविण्यास मदत करतो.
ताकद वाढविण्यास हितकारक.
वजन वाढविण्यास मदत करतो.
रक्तपित्त रोगावर हितकारक.
फणस गराचे अतिप्रमाणात सेवन केल्याने छाती-पोटात दाह होऊ शकतो.कच्चा फणस खाल्ल्याने मलप्रवृत्ती कडक होऊ शकते व वातदोषही वाढू शकतो. तेव्हा फणस पिकला की मगच खाणे हितकारक आहे.
फणसाच्या बियांमुळे मलप्रवृत्ती कडक होऊ शकते. तेव्हा मलावरोधाची प्रवृत्ती असणाऱ्यांनी फार प्रमाणात बियांचे सेवन करू नये.

कच्च्या फणसाचे पदार्थ

वेफर्स

पूर्ण परिपक्व झालेले, परंतु कच्चे फणस निवडून धारदार सुरीच्या साह्याने कापून गरे काढावेत. सुरी किंवा विळीच्या साह्याने गऱ्याचे तीन ते चार मि.मी. रुंदीचे तुकडे बिया बाजूला करून करावेत. तेल कढईमध्ये घेऊन गरम करण्यास ठेवावे. तेल व्यवस्थित गरम झाल्याची खात्री झाल्यानंतर गरे व्यवस्थित तळून घ्यावेत. असे तळून काढलेले गरे जाळीवर काही काळ ठेवावेत, जेणेकरून अतिरिक्त तेल पाझरून निघून जाईल. तळलेले गरे (वेफर्स) थंड झाल्यानंतर पॉलिथिनच्या पिशवीमध्ये भरून हवाबंद करावेत. काही वेळा ग्राहकांच्या पसंतीनुसार वेफर्स खारे करायचे असतील, तर वेफर्स कढईत घट्ट झाल्यानंतर थोडेसे बाजूला करून त्यावर मिठाचे संपृक्त म्हणजेच 7.5 टक्के तीव्रतेचे द्रावण शिंपडावे. याव्यतिरिक्त काही वेळा वेफर्सला किंचित मसाल्याचीही चव दिली जाते. बाजारातही साधे, खारे आणि तिखट अशा तीन प्रकारचे वेफर्स उपलब्ध असतात. याव्यतिरिक्त लोकांच्या आवडीनुसारही फणसाच्या वेफर्सला स्वाद देता येतो.

फणसाची पावडर

चिवडा करताना दुसऱ्या पद्धतीप्रमाणे फणसाच्या तुकड्यांना वाफवून किंवा गरम पाण्यात दोन-तीन मिनिटे बुडवून, जास्तीचे पाणी निचरा करून, वाळवणी यंत्रामध्ये किंवा सूर्यप्रकाशामध्ये वाळवितात. ज्या वेळेस तुकड्यांमधील पाण्याचे प्रमाण सात टक्‍क्‍यांपेक्षाही कमी होईल, त्या वेळेस दळणी यंत्रामध्ये दळून पावडर तयार केली जाते. अशा प्रकारे तयार झालेली पावडर (भुकटी) पॉलिथिनच्या पिशवीत भरून हवाबंद केली जाते.

फणसाचा चिवडा

फळाच्या गऱ्यांपासून उत्तम प्रतीचा चिवडा तयार करता येतो. यासाठी काप्या फणसाचा वापर केला जातो. प्रथम कच्चा फणस घेऊन त्याचे गरे काढले जातात. गऱ्यांपासून धारदार सुरीच्या साह्याने बिया वेगळ्या करून चार मि.मी. जाडीचे तुकडे/काप केले जातात. या कापांना/तुकड्यांना एक वाफ दिली जाते किंवा उकळत्या पाण्यात दोन-तीन मिनिटे धरले जाते. जास्तीचे पाणी निथळून देऊन तुकडे तळले जातात. तळत असताना त्यावर 7.5 टक्के मिठाचे संपृक्त द्रावण शिंपडावे. तुकडे व्यवस्थित तळल्यानंतर तेलातून बाहेर काढून त्यावर आवडीप्रमाणे चिवडा मसाला चोळावा. दुसऱ्या पद्धतीमध्ये वरीलप्रमाणे वाफवून घेतलेल्या तुकड्यांना वाळवणी यंत्रामध्ये 55 ते 60 अंश सेल्सिअस तापमानास सर्वसाधारणपणे वाळेपर्यंत (16-18 तासांपर्यंत) किंवा सूर्यप्रकाशामध्ये वाळवावेत. अशा प्रकारे वाळलेले तुकडे हवाबंद करून साठवावेत. आवश्‍यकतेनुसार तेलात तळून त्याला मीठ व चिवडा मसाला लावून खाण्यासाठी वापरावेत.

स्पिरुलीना (शेवाळ) प्रकल्प
स्पिरुलीना (शेवाळ) प्रकल्प

महिला बचत गटांसाठी एक सोपा उदयोग

स्पिरुलीना (शेवाळ ) प्रकल्प

महाराष्ट्रात सध्या उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात चावडीच्या माध्यमातून शेतकरयांशी ; महिला बचत गटांसोबत तसेच तरूणांबरोबर संवाद साधताना अशी मागणी आली की,एखादा असा व्यवसाय सुचवा ज्यामध्ये स्व:स्तातले बियाणे,खते कमी, कमी मजूर, किडीचा कमी प्रादुर्भाव आणि भरपूर उत्पादन आणि मुळात बाजारभाव चांगला मिळेल अणि मार्केट मिळणे सोपे असा प्रकल्प सांगा. जेव्हा या प्रश्नावर अभ्यास केला तेंव्हा एका आगळ्यावेगळ्या शेतीपूरक व्यवसायाची माहिती मिळाली. या व्यवसायाचे नाव आहे “ स्पिरुलीना प्रकल्प (हिरवे-निळे शेवाळ निर्मिती) “ हे शेवाळ हौदामध्ये तयार केले जाते.

१. जागा – १ ते २ गुंठे (हा प्रकल्प फक्त शेतावर करावा असे बंधन नाही अगदी शहरी भागात मोकळ्या प्लॉट मध्ये ; घराजवळील मोकळ्या जागेत हा प्रकल्प सूरू करता येईल)

२. उत्पादन खर्च – प्रति किलो १०००-१५०० रुपये

३. शेवाळाचा नक्की उपयोग – विविध आजारांवर प्रभावी औषध म्हणून वापरले जाते.शक्तिवर्धक आहे.नासाने यास सर्वोत्तम अन्न म्हणून घोषित केले आहे.

४. प्रकल्प उभारणीचा खर्च – १ ते १.५ लाख

५. मजूर,पाणी लागते का ? – पाणी सारखे लागत नाही. घरातील प्रशिक्षित व्यक्ती हे काम एकटेसुद्धा करू शकते

६. बाजारभाव – थेट स्वत विक्री केल्यास अंदाजे ५००० ते ६०००/- किलो

७. बाजारात कुठे विकले जाते?
कंपन्या मार्केटमध्ये विकत घेण्यास तयार आहेत तसेच लोकल मार्केट मध्ये विक्री करणे शक्य आहे.

८. बँक कर्ज व शासकीय योजना – यास शासनातर्फे प्रयत्न केल्यास प्रोत्साहनपर अनुदान मिळू शकते तसेच पत पाहून बँक कर्ज उपलब्ध होऊ शकेल.

सुरवातीस ५० हजार ते १ लाख खर्च करून उद्योग सुरु केल्यास जास्त फायदा होईल.

महिला बचत गटाने एकञ येऊन आपल्या राहत्या घराच्या शेजारच्या मोकळ्या जागेत सुध्दा छोटा प्रकल्प सुरू करता येईल.
सुशिषित बेरोजगार तरूणांसाठी हा उदयोग म्हणजे एक सर्वात मोठी संधी म्हणायला हरकत नाही.

हा व्यवसाय सुरू केल्यास

कमी भांडवल,कमी मनुष्यबळ,सोपे तंत्र,आणि भरपूर नफा असे या व्यवसायाचे सूत्र आहे.
अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र , (पायरेन्स ) बाभळेश्वर, ता राहता जि अहमदनगर येथे संपर्क करावा

लेखक : अनिरुद्ध मिरीकर

सौरऊर्जेच्या मदतीने टोमॅटो पावडर बनवणारे तंत्र
सौरऊर्जेच्या मदतीने टोमॅटो पावडर बनवणारे तंत्र

दर कोसळतात त्या वेळी करा मूल्यवर्धन

टोमॅटोचे दर जेव्हा कोसळतात, त्या वेळी निराश होण्याची गरज नाही. त्यावर साधीसोपी प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करून त्याची पावडर तयार करा. बाजारपेठेत अशा तयार पदार्थांना मार्केट तयार करणे शक्‍य आहे, असे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.
अलीकडील काळात विविध शेतमालांच्या प्रक्रियेला महत्त्व आले आहे. उदाहरण घ्यायचे तर आल्याची वा लसणाची पेस्ट बाजारात तयार मिळू लागली आहे. सध्याच्या काळात शहरांमधील रहिवाशांना धकाधकीच्या जीवनातून वेळेची कमतरता जाणवते. साहजिकच ते अशा तयार पदार्थांना पसंती देतात. त्यामुळे काळाची व ग्राहकांची गरज लक्षात घेऊन अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरून तसा व्यवसाय करण्याची संधी आहे.
टोमॅटोचे उदाहरण घेऊया. टोमॅटोची पावडर तयार करण्याचे तंत्रज्ञान आता उपलब्ध झाले आहे.
टोमॅटोचे आहारात विशेष महत्त्व आहे. त्यामध्ये कॅलरीज कमी असतात, शिवाय अँटिऑक्‍सिडंट या महत्त्वाच्या आरोग्यदायी घटकाबरोबर तंतुमय पदार्थ (फायबर्स), खनिजे व जीवनसत्त्वे यांचा त्यात चांगला समावेश असतो. लायकोपीन या घटकाचे प्रमाणही त्यात भरपूर म्हणजे प्रति किलोमागे 60 ते 90 मिलिग्रॅमपर्यंत असते. ताज्या टोमॅटोमध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले म्हणजे शंभर ग्रॅममागे 237 मिलिग्रॅमपर्यंत असते. लोह, कॅल्शिअम, मॅंगनीज आदींनीही टोमॅटो समृद्ध असतो.
टोमॅटोबाबत एक गोष्ट नेहमी घडते, ती म्हणजे त्याच्या किमती कधीही स्थिर नसतात. अनेकवेळा तर शेतकऱ्यांना माल बाजार समितीतच सोडून जावा इतकी वाईट वेळ येते. अशा वेळी टोमॅटो साठवणूकगृहांचा पर्याय काही जण मांडतात. मात्र, टोमॅटो सौरऊर्जेच्या साह्याने वाळवून त्याची पावडर तयार करण्याचाही एक पर्याय शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. त्याचे साधे सोपे तंत्रज्ञानही भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या अंतर्गत आंध्र प्रदेशातील रेडीपल्ली, अनंतपुरम येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञांनी उपलब्ध केले आहे. ते थोडक्‍यात असे.

सुरवातीला पूर्ण पिकलेले टोमॅटो घ्यावेत. मुलायम वस्त्राने ते स्वच्छ कोरडे करावेत, जेणेकरून पृष्ठभागावर पाण्याचा अंश राहणार नाही. टोमॅटोचे उभे सहा ते आठ काप करावेत व ते लाकडी ट्रेमध्ये कोरडे करावेत. 
पावडर स्वरूपात त्यांची साठवणूक करता येते, अथवा त्याचे सुकलेले काप पॉलिथिन पेपरवरती ठेवता येतात. 
टोमॅटोच्या वाणानुसार एक किलो टोमॅटोपासून 50 ते 55 ग्रॅम पावडर मिळते. 
जर ग्राहकाला शंभर ग्रॅम टोमॅटो एवढा वापर करायचा असेल, तर त्याला केवळ पाच ग्रॅम पावडरीचा वापर केला तरी ते पुरेसे होते. विशेष म्हणजे टोमॅटोमधील पोषक द्रव्यांचा फारसा काही ऱ्हास होत नाही.

सूर्यप्रकाशात टोमॅटो काप सुकवणीचा कालावधी

तापमान (अंश सेल्सिअस) सुकण्याचा कालावधी (दिवसांमध्ये) 
34 5- 6 
38 3- 4 
40 व त्याहून अधिक 2- 3

टोमॅटोतील पोषणमूल्ये

पोषणद्रव्ये ताजे टोमॅटो सुकवलेले टोमॅटो 
(मिलिग्रॅम प्रति 100 ग्रॅम) 
जीवनसत्त्व क 27 26.7 
लायकोपीन 50-70 63.04

सोयाबीनपासून दूध, फ्लेक्‍स
सोयाबीनपासून दूध, फ्लेक्‍स

सोयाबीनपासून सोयातेल, सोयानट्‌स, सोया पीठ, सोया प्रोटिन्स, सोया दूध, सोया फ्लेक्‍स, सोया सॉस, सोया नगेट्‌स हे पदार्थ तयार केले जातात. या उत्पादनांना बाजारपेठेत मागणी वाढते आहे. त्यामुळे येत्या काळात सोयाबीनवर आधारितच उद्योगांना विशेष चालना देणे आवश्‍यक आहे.
बी. बी. गुंजाळ
सोयाबीनच्या पिठापासून पौष्टिक आटा तयार करता येतो. तसेच सोयामिश्रित बन, केक, बिस्कीट, पाव असे बेकरी पदार्थ तयार करता येतात. याचबरोबरीने स्थानिक बाजारपेठेचा विचार करता सोयामिश्रित चकली, शेव, लाडू, पापड, फरसाण, पकोडा, बुंदी, कढी तयार करता येऊ शकते.
सोयाबीनच्या दुधापासून व्हॅनिला, क्रीम, चॉकलेट, इलायची स्वाद असलेले सुगंधी दूध तयार करता येते. बाजारपेठेच्या मागणीनुसार दही, श्रीखंड, आम्रखंड, लस्सी, योगर्ट, आइस्क्रीम, पनीर, टोफू-पराठा, पुलाव, पनीर पकोडा, कटलेट, सॅंडविच, पॅटीस, ब्रेडरोल, मटार पनीर, पालक पनीर तयार करता येते. सोया दूध प्रक्रियेनंतर उरणाऱ्या सोया पल्पचा वापर बर्फी, गुलाबजामून, हलवा, पीठ, पकोडी, पशुखाद्य बिस्कीट, शेव, डोसा. इडली, ढोकळा तयार करण्यासाठी केला जातो.
दैनंदिन आहाराचा विचार करता डोसा, वडा, इडली इ. अन्नपदार्थांत जेथे कडधान्य व दालवर्गीय धान्याचा वापर केला जातो, त्यात 20 टक्‍क्‍यांपर्यंत सोयाबीनचा वापर करू शकतो. मोड आलेली सोयाबीन इतर मोड आलेल्या कडधान्यांप्रमाणे आहारात वापरावीत. छोले, राजमा, दालमखानी इत्यादी पदार्थांत सुद्धा सोयाबीनचा 20 टक्‍क्‍यांपर्यंत वापर करण्यास हरकत नाही.

डिफॅटेड सोया पीठ

सोयामीलपासून डिफॅटेड सोया पीठ तयार केले जाते. अशा पिठात प्रथिनांचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांपर्यंत असते. तांदूळ, गहू, हरभरा यांच्यापासून तयार केलेल्या पिठाचा वापर ज्या पदार्थात होतो त्या ठिकाणी 15 ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत सोया पिठाचा वापर करता येईल. ब्रेड, केक, पानकेक, बिस्कीट्‌स, शेव, फरसाण, चकली, बुंदी इत्यादी पदार्थांमध्ये प्रथिना ंचे प्रमाण वाढविणे व प्रथिनांची प्रत सुधारण्यासाठी 5 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत सोया पिठाचा वापर करता येईल.

पौष्टिक आटा

दहा टक्के सोया पिठाचा वापरासाठी व दहा किलो पौष्टिक आटा तयार करावयाचा झाल्यास नऊ किलो गव्हात एक किलो सोया पीठ मिसळून चपाती, रोटी, पुरी तयार करता येते. दहा टक्के सोया पीठ वापरामुळे प्रथिनांची मात्रा 11 टक्‍क्‍यांहून 16 टक्‍क्‍यांपर्यंत वाढते. जर डिफॅटेड सोया पीठ उपलब्ध नसले, तर सोयाबीन व गहू याच्या 1ः9 या प्रमाणानुसार पीठ तयार करावे. त्यासाठी सोयाबीन प्रथमतः भाजावे व ते वर निर्देश केलेल्या प्रमाणानुसार गव्हात मिसळून पीठ तयार करावे.

सोया पापड

पारंपरिक पद्धतीत उडीद डाळीच्या पिठापासून पापड तयार करतात. प्रथिनयुक्त तसेच वाजवी किमतीत पापड हवे असतील तर 70 टक्के उडीद ाळचे पीठ व 30 टक्के सोयाबीन पीठ यांच्या मिश्रणातून सोय पापड करता येतात. निव्वळ उडीद डाळ पिठाच्या तुलनेत मिश्रणातून मिळणाऱ्या पापडांमध्ये प्रथिनांचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांनी वाढते.

सोया नट्‌स

भाजक्‍या शेंगदाण्यास पर्याय, वाजवी किमतीत प्रथिनांची उपलब्धता व आयसोफ्लेव्हानचा उत्तम स्रोत म्हणून सोयानट्‌सकडे पाहिले जाते. भाजके सोयानट्‌स करावयाचे झाल्यास सोयाबीन सर्वसाधारण आठ तास भिजविले जाते. पाण्याचा अंश काढल्यानंतर ओव्हन मध्ये 175 अंश से. तापमानाला त्यास भाजण्याची प्रक्रिया सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत केली जाते. सोयानट्‌समधील अन्नघटकांची तुलना बदाम, काजू व शेंगदाणे यांच्याशी तक्ता क्र. 1 मध्ये दर्शविलेली आहे.
भाजक्‍या शेंगदाण्याच्या तुलनेत सोया नट्‌समध्ये स्निग्ध पदार्थांचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांनी कमी असून प्रथिनांचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांहून जास्त आहे. सोयानट्‌स वेगवेगळ्या स्वादात करता येऊ शकतात.
सोयातेलाशिवाय सोयामीलचा वापर विविध अन्नपदार्थ तयार करण्यासाठी कसा करता येईल. तसेच सोयाबीन, तृणधान्ये व कडधान्ये यांचे योग्य प्रमाण वापरून परंपरागत पदार्थांबरोबरच एक्‍ट्रुडर कुकिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्नॅक फूडचे अनेक अन्नप्रक्रिया लघु उद्योग उभारता येणे शक्‍य आहे. सोया दूध आधारित विविध उद्योग लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. सोया आधारित अन्नप्रक्रिया उद्योगासाठी लागणारी एक्‍स्ट्रुडर यंत्रसामग्री परदेशात विकसित झालेली असल्याने ही यंत्रणा आयात करण्यासाठी उद्योजकांना विशेष सवलत द्यावी. अन्नतंत्रज्ञानाशी संबंधित संस्थांनी सोयाप्र क्रिया आधारित उद्योगांशी सामंजस्य करार करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे सोया आधारित अन्नप्रक्रियांमध्ये सुधारणा होतील. नवनवीन पदार्थ बाजारात येतील.

सोया दूध

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक किलो सोयाबीनपासून सहा ते आठ लिटर सोया दूध तयार करता येते. गाईच्या दुधासारखी त्याला चव अथवा रुची नसते. परंतु काही प्रमाणात साखर व चॉकलेट, इलायची, व्हॅनिला इ. स्वादांचा वापर केल्यास त्यास मधुर चव प्राप्त होते. प्रथिने, जीवनसत्त्व व क्षार यांचे प्रमाण सोया दुधात चांगले तर आहेच. त्याशिवाय ते कोलेस्टेरॉलयुक्त लेक्‍टोजविरहित तसेच सॅच्युरेटेड स्निग्ध पदार्थांचे व सोडिअमचे अत्यल्प प्रमाण असलेले बहुगुणी पेय आहे. मात्र त्यात कॅल्शिअमचे प्रमाण गाईचे दुधाची तुलना करता सहा पेटीने कमी आहे. सोया दुधाचा वापर पनीर, गरम व शीत पेये, फळांचा शेक, दही, योगर्ट. आइस्क्रीम इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी करता येतो.

सोया टोफू (पनीर)

सोया दुधापासून तयार केल्या जाणाऱ्या सर्व पदार्थांत लोकप्रिय असलेला पदार्थ म्हणजे सोय टोफू (पनीर) हा होय. टोफू तयार करताना गरम दुधावर साकाळण्याची प्रक्रिया करून त्यातील द्रवरूप पदार्थ बाजूस काढला जातो. एक किलो सोयाबीनपासून 1.5 ते 2 किलो सोय टोफू प्राप्त होतो. रेफ्रिजरेटरमध्ये टोफू सर्वसाधारण दहा दिवस टिकू शकतो. पारंप रिक भारतीय डिशेसमध्ये विशेषतः मटार पनीर, पालक पनीर, पराठा तसेच स्नॅक्‍सचा विचार करता सोया बर्गर, पॅटीस, ब्रेडरोल, सॅंडविच, पकोडा, टिक्का इत्यादींमध्ये सोया पनीरचा वापर करता येईल.

सोया पल्प

सोया दूध तयार करताना शिल्लक राहणारा चोथा म्हणजे सोय पल्प होय. त्यात मोठ्या प्रमाणात प्रथिने (30 टक्के), स्निग्ध पदार्थ (दहा टक्के), तंतुमय पदार्थ (आठ-दहा टक्के) व पिष्टमय पदार्थ (40 टक्के) इत्यादी अन्न घटक असतात. सोया पल्प, इतर तृणधान्य व कडधान्य वापरून ढोकळा, डोसा, इडली, चकली, फरसाण, शेव, बिस्किट्‌स, पीठ पशुखाद्य यांसारखे पदार्थ तयार करता येतात.

सोया सॉस

सोया सॉसचा वापर विविध अन्नपदार्थांना स्वाद तसेच त्यांची रुची वाढविण्यासाठी होतो. काळसर तांबूस रंगाचे हे द्रव सोयाबीनवर आंबविण्याची पद्धत वापरून तयार केले जाते. त्यामुळे सोयाबीनमधील विविध अन्नघटकांवर जैविक प्रक्रिया होऊन त्याचे रूपांतर पचावयास सोपे असलेल्या पदार्थांमध्ये म्हणजे अमिनो ऍसिड्‌स फॅटी ऍसिड व साध्या शर्करामध्ये होते. सोया सॉस वर्षभर टिकू शकते.

सोया प्रोटिन पावडर

सोया पीठापासून सोया प्रोटिन कॉन्सन्ट्रेट्‌स व सोया आयसोलेट तयार करता येतात. तर सोया प्रोटिन कॉन्सन्ट्रेट्‌स व सोया आयसोलेटपासून सोया प्रोटिन पावडर तयार करता येते. विविध प्रकारच्या पेयांमध्ये याचा वापर घनता, चव व स्वादिष्टपणा वृद्धिंगत करणे, प्रथिने, क्षार तसेच जीवनसत्त्वाची उपलब्धता वाढविणे यासाठी केला जातो.

सोयायुक्त बेकरी पदार्थ

गहू पिठात तीन ते पाच टक्के सोया पिठाचा वापर केल्यास ब्रेडचा रंग व पोत सुधारण्यास मदत होते. स्कीम मिल्कला पर्याय म्हणून सोया पीठ व व्हे यांचे मिश्रण वापरता येते. सोया पिठात लायसिन या अमिनो ऍसिडचे प्रमाण चांगले असते; परंतु गव्हाच्या मैद्यात लायसिनची कमतरता असून सिस्टीन या अमिनो ऍसिडचे प्रमाण चांगले आहे. जर गव्हाच्या मैद्यात सोया पीठ मिसळल्यास लायसिन व सिस्टीन या दोनही अमिनो ऍसिडचा पुरवठा शरीरास होऊ शकतो. त्याशिवाय मैदा मिश्रित सोया पिठाच्या प्रथिनांची गुणवत्ता फ ारच चांगली असते.कुपोषित बालकांना पूरक अन्न म्हणून सोयायुक्त बिस्किटाचा आहार देता येईल. त्यात सर्वसाधारण 12 टक्के प्रथिने (बाजारात उपलब्ध असलेल्या बिस्किटां पेक्षा 50 क्के जास्त). 24 टक्के स्निग्धयुक्त पदार्थ व 500 किलो कॅलरी उष्मांक प्रति 100 ग्रॅम असू शकते. लहान मुलांना (सहा ते दहा वर्षे वयोगट) दररोज चार बिस्किटे खाऊ घातल्यास त्यांना 12 टक्के प्रथिने व 100 किलो ऊर्जा मिळू शकते.

(लेखक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे येथे प्रकल्प सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.)

सीताफळापासून बनवा पावडर, जॅम, रबडी
सीताफळापासून बनवा पावडर, जॅम, रबडी

सीताफळाच्या गरापासून पावडर, जॅम, पेये, सिरप, मिल्कशेक, रबडी, आइस्क्रीम, श्रीखंड हे पदार्थ तयार करता येतात. गराचा वापर विविध मिठाई, बेकरी व कन्फेक्‍शनरीमध्ये केला जातो. बाजारपेठेतील मागणीनुसार विविध पदार्थ तयार करणे शक्‍य आहे.

गर काढून साठविणे

1) प्रथम पिकलेली निरोगी चांगली सीताफळे निवडून घेऊन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर फळांचे दोन भाग करावेत. बियांसहित गर अलगदपणे चमच्याने काढून घ्यावा. 
2) हा काढलेला गर मिक्‍सरला लावून 1 मि.मी. स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात घ्यावा. त्यामध्ये 500 पीपीएम ऍस्कॉर्बिक आम्ल व 700 पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाईट मिसळून गरम करावा. हा गर निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये किंवा रिटॉर्टेबल पाऊचेसमध्ये भरून हवाबंद करावा. परत पाश्‍चराईज करून, थंड करून, लेबल लावून, थंड ठिकाणी (शीतगृहात) साठवून ठेवाव्यात. 
3) गर साठवण कालावधीमध्ये काळा पडण्याची शक्‍यता असते म्हणून तो थंड तापमानाला ठेवावा. 
4) या पद्धतीशिवाय त्या काढलेल्या गरामध्ये 500 पीपीएम ऍस्कॉर्बिक आम्ल व 700 पीपीएम केएमएस मिसळून तो उणे 20 अंश सेल्सिअस तापमानास गोठवून ठेवल्यास एक वर्षापर्यंत चांगला राहतो. 
5) हा गर आपणास विविध पदार्थ तयार करण्यासाठी वर्षभर वापरता येतो. या गोठविलेल्या सीताफळाच्या गरास स्थानिक तसेच परदेशी बाजारपेठांत चांगली मागणी आहे.

गराची पावडर

1) फळाचा काढलेला गर घेऊन त्यामध्ये 500 पीपीएम ऍस्कॉर्बिक आम्ल व 700 पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाईट व 2 ते 3 टक्के माल्टो डेक्‍स्ट्रीन मिसळून स्प्रे ड्रायरमध्ये किंवा ड्रम ड्रायरमध्ये 5 ते 8 टक्के पाण्याचा अंश येईपर्यंत वाळवावा. 
2) यानंतर तयार झालेली पावडर निर्वात केलेल्या पिशवीमध्ये भरून, थंड ठिकाणी साठवून ठेवावी. 3) अशा प्रकारे तयार केलेली पावडर आइस्क्रीम, कन्फेक्‍शनरी तसेच श्रीखंड, मिल्कशेक, टॉफी इत्यादी पदार्थ तयार करताना वापरता येते. या पावडरला परदेशी बाजारपेठांमध्ये चांगली मागणी आहे.

जॅम

1) गराच्या वजनाएवढी साखर मिसळून तो गरम करावा, सतत ढवळत राहावे. नंतर यामध्ये 2 ते 5 ग्रॅम प्रतिकिलो गर या प्रमाणात सायट्रिक आम्ल मिसळून ते मिश्रण घट्ट होईपर्यंत म्हणजेच तुकड्यांत पडेपर्यंत शिजवावे. 
2) या वेळी मिश्रणाचा टीएसएस 68 ते 69 टक्के असतो. 
3) तयार झालेला जॅम निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून, बाटल्या थंड करून, त्यावर मेणाचा थर देऊन किंवा ऍल्युमिनियम फॉईल लावून, हवाबंद करून झाकण लावावे. बाटल्या थंड आणि कोरड्या जागी साठवाव्यात.

सरबत

1) गर 15 टक्के, साखर 15 टक्के व सायट्रिक आम्ल 0.25 टक्के घेऊन उत्तम प्रकारे सरबत करता येते. प्रथम गर घेऊन त्यामध्ये प्रमाणात मोजून घेतलेली साखर, सायट्रिक आम्ल व पाणी मिसळून ते चांगले ढवळून घ्यावे. हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळावे. थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यावा. 
2) जर हे सरबत जास्त काळ साठवून ठेवायचे असल्यास ते गरम करून त्यामध्ये 100 पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाईट मिसळून निर्जंतुक केलेल्या 200 मि.ली.च्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून, झाकण लावून ठेवावे. परत पाश्‍चराईज करून, थंड करून, लेबल लावून, थंड ठिकाणी बाटल्या साठवून ठेवाव्यात. अशा तऱ्हेने तयार केलेले सरबत 1 ते 2 महिने टिकवून ठेवता येते.

रबडी

1) रबडी तयार करण्यासाठी गर एक किलो घेऊन त्यामध्ये 900 मि.ली. दूध आणि 100 ग्रॅम साखर मिसळून चांगले ढवळून गाळून घ्यावे. हे मिश्रण 15 ते 20 मिनिटे गरम करावे. 
2) थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवून त्याचा आस्वाद घ्यावा.

श्रीखंड

1) सीताफळाचा गर किंवा पावडर वापरून उत्तम प्रतीचे श्रीखंड तयार करता येते. या श्रीखंडास चांगली चव असते. 
2) गर 100 ग्रॅम, साखर 500 ग्रॅम व 400 ग्रॅम चक्का मिसळून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. त्यामध्ये ड्रायफ्रूट्‌स मिसळून फ्रिजमध्ये ठेवून थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यावा.

मिल्कशेक

1) सीताफळाचा गर किंवा पावडर वापरून उत्कृष्ट प्रतीचा मिल्कशेक तयार करता येतो. 
2) यासाठी गाईचे किंवा म्हशीचे स्वच्छ दूध गाळून घेऊन गरम करून ते प्रमाणित करावे. नंतर ते 70 अंश सेल्सिअस तापमानास 15 मिनिटे गरम करावे. त्यामध्ये 0.40 टक्के सोडियम ऍल्जिनेट मिसळून 10 टक्के साखर आणि 10 टक्के गर किंवा पावडर मिसळून हे मिश्रण चांगले गाळून घ्यावे. त्यानंतर 70 अंश सेल्सिअस तापमानास 30 मिनिटे गरम करावे. नंतर ते 10 अंश सेल्सिअस तापमानास तीन तास थंड करून घ्यावे. परत ते -2 अंश सेल्सिअस ते -4 अंश सेल्सिअस तापमानाला सात मिनिटे थंड करून मिक्‍सरला घुसळवून त्याचा आस्वाद घ्यावा.

गुणधर्म आणि उपयोग

1) फळे तयार होण्यास फलधारणेपासून जातीपरत्वे 135 ते 150 दिवस लागतात. हे फळ झाडावरून काढल्यानंतर पिकते. म्हणून त्याची काढणी पूर्ण वाढीच्या वेळी करतात. 
2) डोळा पडलेली सीताफळे काढल्यास दोन-तीन दिवसांत पिकून खाण्यास तयार होतात. 
3) हे अत्यंत नाशवंत फळ आहे. पिकल्यानंतर एक-दोन दिवसांपेक्षा जास्त काळ साठविता येत नाही. 
4) फळांचा हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत असतो. पिकलेल्या सीताफळामध्ये सर्वसाधारणपणे 50 टक्के गर, 20 टक्के टीएसएस व 0.30 टक्के आम्लता असते. 5) फळे अत्यंत नाशवंत असल्याने त्यांची दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त काळ साठवण करता येत नाही. गरामध्ये पोषणमूल्य चांगले असते. 
6) पिकलेल्या सीताफळामध्ये शर्करा, प्रथिने व लोह यांचे प्रमाण भरपूर असते. 
7) सीताफळाच्या पानांमध्ये ऍकोरिन आणि अनोनिन ही अल्कालॉईड्‌स असतात, त्यामुळे कोणताही प्राणी याची पाने खात नाही. 
8) पानांचा लेप डोकेदुखीवर गुणकारी आहे. 
9) झाडामध्ये हायड्रोसायनिक आम्ल असल्याने त्या झाडास वाळवी लागत नाही. 
10) सीताफळाच्या बियांपासून काढलेल्या तेलाचा उपयोग साबण तयार करण्यासाठी होतो, तसेच पेंडीचा उपयोग खत म्हणून केला जातो.

सीताफळाच्या 100 ग्रॅम गरामध्ये पोषण मूल्यांचे प्रमाण

घटक +प्रमाण +घटक +प्रमाण +घटक +प्रमाण 
पाणी (टक्के) +71.00 +कर्बोदके (टक्के) +24.00 +प्रथिने (टक्के) +1.60 
मेद (टक्के) +0.40 +तंतूमय पदार्थ (टक्के) +3.10 +कॅल्शिअम (मि.ग्रॅ.) +20 
स्फुरद (मि.ग्रॅ.) +5.00 +लोह (मि.ग्रॅ.) +0.20 +जीवनसत्त्व “क’ +22.43 
उष्मांक (किलो कॅलरी) +104 +कॉपर +2.4 +आम्लता +0.40

प्रक्रिया पदार्थ

1) गर आइस्क्रीमसाठी मोठ्या प्रमाणावर वापरतात. गरापासून जॅम, जेली, पावडर, टॉफी, श्रीखंड, रबडी, मिल्कशेक इत्यादी पदार्थ तयार करता येतात. 
2) गर नियमित सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो. 
3) पिकलेल्या फळाच्या सालीचा उपयोग जखमा बऱ्या करण्यासाठी होतो. बियांचा लेप जनावरांच्या जखमा बऱ्या करण्यासाठी केला जातो. 
4) फळाचा गर शुक्राणूवर्धक, तृष्णावर्धक, बलवर्धक, उत्साहवर्धक, पचनशक्ती वाढविणारा व पित्ताविकार कमी करणारा आहे. हाडांच्या व दातांच्या मजबुतीसाठी उपयोगी. हृदयाची कार्यक्षमता वाढते, रोगप्रतिकारशक्ती वाढते.

संपर्क – डॉ. विष्णू गरंडे – 9850028986 
(लेखक शाहू कृषी तंत्र विद्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे प्राचार्य आहेत)

संकरित नेपिअरची लागवड
संकरित नेपिअरची लागवड

जनावरांच्या समतोल आहारामध्ये वैरण, हिरवा चारा, आंबवण, खनिज पदार्थ, जीवनसत्त्वे, पाणी यांचा समावेश होतो. त्यात सुमारे 70 टक्के भाग हा हिरवा चारा असतो. त्यामुळे लुसलुशीत व पौष्टिक चाऱ्याचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी संकरित नेपिअर हे बहुवार्षिक गवत महत्त्वाचे ठरते. 
सर्वसाधारणपणे पूर्ण वाढलेल्या दुभत्या जनावराला दिवसाला 24 ते 25 किलो हिरवा चारा आणि 5 ते 6 किलो कोरडा चारा लागतो. समतोल आहाराच्या दृष्टीने एकदल व द्विदल चाऱ्याचे प्रमाण निम्मेनिम्मे असावे. 12 ते 13 किलो एकदल वर्गीय हिरवा चारा (उदा. ज्वारी, बाजरी, मका, ओट, संकरित नेपिअर इ.) तर 12 ते 13 किलो द्विदल वर्गीय हिरवा चारा (उदा. लसूण घास, बरसीम, चवळी इ.) यांचा समावेश करावा. एकदल चाऱ्यामध्ये शर्करेचे प्रमाण जास्त असते, तर द्विदल चाऱ्यामध्ये प्रथिने, कॅल्शिअम यांचे प्रमाण जास्त असते.

जमिनीची निवड

 • संकरित नेपिअर (फुले जयवंत) हा वाण सर्व प्रकारच्या जमिनीत वाढतो. तथापि खोल, मध्यम ते भारी, काळी कसदार उत्तम निचऱ्याची सुपीक गाळ फेरातील जमिनीची निवड करावी. यामुळे गवताची वाढ जोमाने होऊन फुटवे चांगले येतात. भरपूर हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. हा वाण 5 ते 8 सामू असलेल्या जमिनीत चांगल्या प्रकारे वाढू शकतो.
 • हवामान – हे गवत 24 अंश ते 40 अंश सेल्सिअस या तापमानात चांगले वाढते. 15 अंश सेल्सिअसपेक्षा खाली तापमान गेल्यास या गवताची वाढ खुंटते.
 • उन्हाळ्यात व पावसाळ्यात या गवताची वाढ अत्यंत उत्कृष्ट होते. पावसाच्या हलक्‍या सरी व त्यानंतर स्वच्छ सूर्यप्रकाश या वाणाच्या वाढीकरिता हितावह असतो.
 • हिवाळ्यात हे गवत सुप्त अवस्थेत राहते. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.
 • सिंचनाची सोय असल्यास व खते योग्य प्रमाणात वापरल्यास या गवताची लागवड तीन वर्षांपर्यंत टिकते.
 • पूर्वमशागत – जमिनीची खोल मशागत करून, कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या वेळी हेक्‍टरी 10 टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.
 • लागवडीचा हंगाम – या गवताची लागवड उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च या काळात करावी. खरीप हंगामात (पावसाळ्यात) जून ते ऑगस्ट मध्येही लागवड करता येते.

लागवडीची पद्धत

या गवताची ठोंबे (मुळासह) लावावीत. लागवडीकरिता साधारणपणे तीन महिने वाढू दिलेल्या गवताच्या खोडाचा जमिनीकडील दोन तृतीयांश भागातील दोन ते तीन डोळे असणाऱ्या कांड्या काढून लावाव्यात.या गवताची लागवड 90 x 60 सें.मी. अंतरावर करावी. गवताचे ठोंब 90 सें.मी. अंतरावर काढलेल्या सरीच्या बगलेत मुळासहित गवताची ठोंब अथवा डोळे असणाऱ्या कांड्याद्वारे लागवड करावी.दोन डोळे जमिनीत व एक जमिनीवर राहील अशा पद्धतीने लागवड करावी. दोन झाडांमध्ये 60 सें.मी. अंतर ठेवावे. एका ठिकाणी एक जोमदार ठोंब लावल्यास हेक्‍टरी 18,500 ठोंब पुरेसे होतात.

खत व्यवस्थापन

लागवडीच्या वेळी प्रति हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे, तसेच प्रत्येक कापणीनंतर 25 किलो नत्र प्रति हेक्‍टरी द्यावे.

पाणी व्यवस्थापन – संकरित नेपिअर गवताला उन्हाळी हंगामात 7 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. खरीपमध्ये गरजेनुसार 15 दिवसांचे अंतराने, हिवाळ्यात 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
आंतरमशागत – सुरवातीच्या वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या देणे आवश्‍यक आहे. त्यानंतरची खुरपणी गरजेनुसार करावी. दरवर्षी उन्हाळ्यात चाळणी (खांदणी) करून मातीची भर झाडास द्यावी. प्रत्येक वर्षी एक ठिकाणी 2 ते 3 फुटवे ठेवून इतर जादा फुटवे लागवडीकरिता नवीन ठिकाणी वापरावेत. यासाठी मर झालेले फुटवे पुंजक्‍यातून काढून टाकावेत. जोमदार 2 ते 3 फुटव्यांना वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करावे.

कापणी व उत्पादन

या गवताची हिरव्या चाऱ्यांसाठी पहिली कापणी 60 ते 65 दिवसांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारण 15 ते 20 सें.मी. उंचीवर केल्यास फुटवे चांगले फुटण्यास मदत होते. नंतरच्या कापण्या पीकवाढीनुसार 45 ते 50 दिवसांनी कराव्यात. अशा प्रकारे वर्षभरात 6 ते 7 कापण्या घेता येतात. 

 • कापणीस उशीर झाल्यास गवत जास्त वाढते. त्यामुळे ते जाड टणक व जास्त तंतुमय होते. पौष्टिकतेचे प्रमाण कमी होते. शिवाय कापण्यांची संख्याही कमी होते.
 • शक्‍यतो कडबा कुट्टीमध्ये गवत बारीक करून द्यावे.
 • साधारणपणे प्रतिवर्षी 100 ते 150 टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.

सुधारित वाणाविषयी अधिक माहिती

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील गवत संशोधन प्रकल्पाने संकरित नेपिअर गवताचे “फुले जयवंत’ (आर.बी.एन.-13) हे वाण विकसित केले आहे.

 • “फुले जयवंत’ वाणाच्या हिरव्या चाऱ्यात ऑक्‍झिलिक आम्लाचे प्रमाण हे 1.91 टक्के आहेत.
 • त्यात प्रथिने 10.35 टक्के, स्निग्ध पदार्थ 2.38 टक्के, खनिजे 12.32 टक्के, तसेच चाऱ्याची एकूण पचनीयता 61.8 टक्के आहे.
 • तसेच पानांवर कूस कमी प्रमाणात असल्याने जनावरे आवडीने खातात.

संपर्क – डॉ. सिनोरे, 9423732876 
(महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

शिंपल्यातून खरे मोती उत्पादन
शिंपल्यातून खरे मोती उत्पादन

मोत्यांचे तीन प्रकार

आपण जे मोत्यांचे दागिने घालतो अगर सोन्यांच्या दागिन्यात जे मोती मढवलेले असतात त्या मोत्यांचे तीन प्रकार आहेत.

१) नसर्गिक २)संवर्धित ३)कृत्रिम

यातला संवर्धित मोती हा ठराविक प्रकारच्या मोती संवर्धित करावयाच्या शिंपल्यात एक छोटीशी शस्रक्रिया करून न्युक्लीअसचे (ठराविक शिंपल्याचा एक तुकडा अगर भुकटी) रोपण करून गोड्या पाण्यात तो शिंपला ३ वर्षे ठेवला जातो. आणि त्या शिंपल्यात तयार झालेला मोती संवर्धित मोती होय.हा मोती नैसर्गिक मोत्यासारखाच असतो. तेवढयाच गुणवत्तेचा असतो.

कृत्रिम मोती मात्र काचेचे तुकडे किंवा मनी माशाच्या खावल्यांपासून बनवलेल्या द्रावणात बुडवून जो थर निर्माण होतो टो वाळवून मोती तयार केला जातो. अर्थात, या मोत्यावरचा हा थर कालांतराने फिका पडतो. थर निघून जातो. तसेच या कृत्रिम मोत्याचा आरोग्यासाठी उपयोग होत नाही. टो खोटा असतो. मात्र संवर्धित मोती हा खरा असतो. अशा मोत्याची निर्मिती करण्यासाठी गोडे पाणी, विशिष्ट प्रकारचा जिवंत शिंपला आणि ग्राफ्त टिश्यू न्युक्लीअस इ.गोष्टी आवश्यक असतात.

खऱ्या पाण्यातील कवचधारी (शिंपला) मत्स्य जीवापासून मिळणारे मोती हे उच्च गुणप्रतीचे असतात पण त्याचे संवर्धन करणे जाकीरीचे असते. गोडया पाण्यातल्या कवचधारी मत्स्याजीवापासून मोती तयार करण्याचे तंत्र करण्यासारखे असते. हे मोती हि उच्च प्रतीचे असतात. यांच्यापासून मोती निर्मिती करणे हि एक फायदेशीर आणि जमेची बाब आहे. त्यांचा गोडया पाण्यातला साठा मोठा असतो. त्यांना उपद्रव कमी असतो आणि संवर्धनाची पद्धत सोयीस्कररीत्या विकसित करता येते म्हणून गोडया पाण्यातल्या शिंपल्यापासून (कवचधारी मात्स्य्जीव) मोती मिळवणे सोपे जाते. गोडया पाण्यात एकूण ५० प्रकारचे शिंपले आहेत, पण त्यातल्या संथ आणि वाहत्या पाण्यातल्या २-३ जातीच फक्त मोत्याच्या संवर्धनासाठी उपयुक्त आहे आणि लामिलीडेंस मार्जीलेनीस आणि लामिलीडेंस कोरीआनसीस या संथ पाण्यांतल्या, तर वाहत्या पाण्यातल्या पराशिया कोरुगेटा त्यांचा मोती संवर्धनासाठी वापर करावा.

प्रत्यक्ष मोत्यांचे संवर्धन करण्यासाठी असे शिंपले गोळा करून संवर्धन करण्याच्या ठिकाणी आणावेत. न्युक्लीअस रोपण शस्रक्रियेकरिता भृण प्रत्यारोपण पद्धतीसारखेच डोनर आणि रेसिपंटची आवश्यकता असते. डोनर म्हणजे रोपणाकरिता लागणाऱ्या टिश्यूची पूर्तता करणारा शिंपला आणि रेसीपंट म्हणजे रोपण शस्रक्रिया करवून घेऊन प्रत्यक्ष मोती संवर्धन करणारा शिंपला. डोनर शिंपल्यातून विशिष्ट पद्धतीने ग्राफट टिश्यू आणि मॅटल टिश्यू मिळवण्यात येतो. हे ग्राफ्त टिश्यू आणि मॅटल टिश्यू रेसीपटमध्ये न्वूक्लीआस रोपणासाठी वापरतात. प्रत्यक्ष न्युक्लीआस रोपणासाठी करण्यासाठी तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाची थोडी फार गरज असते. प्रशिक्षण घेतल्यास न्वूक्लीआस शस्रक्रिया (वेगवेगळ्या कलम पद्धतीचे प्रशिक्षण घेतल्याप्रमाणे) करणे सोपे जाते. मार्च ते मे या दरम्यान हि न्युक्लीआस रोपण शस्रक्रिया करण्यासाठी चांगला कालावधी असतो. कारण शास्रक्रियेची जखम लवकर भरते. मोती तयार होण्याची प्रक्रिया वेगात होते.

न्युक्लीआस रोपणाच्या (शस्रक्रिया) ३ पद्धती आहेत. त्या म्हणजे १) मॅटल कॅविटी इन्सर्षण २) मॅटल टिश्यू इन्सर्षण ३) गोनाडल इन्सर्षण. या पद्धती कशा करायच्या याचे प्रशिक्षण घेणे महत्वाचे आहे.

शास्रक्रीयेद्वारे रोपण केलेले शिंपले गोडया पाण्यात २-३ वर्षे पाळावे लागतात. हे शिंपले पाण्यातील सूक्ष्म वनस्पती प्लवगांवर उपजीविका करतात. म्हणून त्याची चांगली वाढ होण्यासाठी त्या गोडया पाण्यात शेण आणि सुपर फोस्फेटचा वापर करावा. पहिल्या वर्षापेक्षा दुसर्या आणि तिसर्या वर्षी मोती तयार करण्याच्या द्रावणाचे प्रमाण चांगलेच असते म्हणून गुणवत्तेचे मोती दुसर्या वर्षापासून, तर तिसर्या वर्षी जास्त गुणवत्तेचे मोती मिळतात. पहिल्याच वर्षीच जर मोती काढून घेतले तर ते वेडेवाकडे निकृष्ठ दर्जाचे असतात. तयार झालेले मोती शिंपल्यातून काढून घेतल्यानंतरही त्याच्यावर स्वच्छ करण्याच्या, पारदर्शीपणा येण्यासाठी आणि रंगीतपणा येण्यासाठी काही प्रक्रिया कराव्या लागतात. याही प्रशिक्षणात शिकवल्या जातात. अशा तयार झालेल्या गुणवत्तेच्या खरया मोत्यांना मोठी किमतही मिळते आणि मागणी तर प्रचंड आहे.

शेती पूरक व्यवसाय – मोती संवर्धन

आतापर्यंत हा मोती संवर्धनाचा व्यवसाय खाजगी व्यक्तीपुरताच मर्यादित आहे. हा कुटीर उद्योग म्हणून शेतकऱ्यांनी, तरुण बेरोजगारांनी छोट्याश्या प्रशिक्षनानंतर सुरु करावा. कारण गोडया पाण्याची उपलब्धता खूप आहे शिवाय अत्यल्प खर्चाचा, कमी मेहनतीचा आहे. प्रचंड मागणीचा, प्रचंड पैसा मिळवून देणारा आहे. म्हणून खेड्यापाड्यात शेतीच्या इतर पूरक व्यवसायाबरोबर गोडया पाण्यात मोती संवर्धन व्यवसाय सुरु करावा हाच या पाठीमागचा उद्देश आहे.

स्त्रोत – कृषी प्रवचने, प्रल्हाद यादव

गुलाबापासून तयार करा गुलकंद
गुलाबापासून तयार करा गुलकंद

गुलकंदाला आयुर्वेदिक महत्त्व आहे. गुलकंद हा गुलाबपाकळ्या आणि खडीसाखर याचे मिश्रण करून तयार झालेला पदार्थ आहे. घरच्या घरी आपण हा पदार्थ तयार करू शकतो. 
गुलाबशेती करणाऱ्यांसाठी; तसेच महिला बचत गटांसाठीही गुलकंदनिर्मिती हा चांगला जोडधंदा आहे. गुलाब फुलांचा उपयोग हार बनविण्यासाठी होतोच, त्याच बरोबरीने गुलकंद, गुलाबपाणी, अत्तर, गुलाब तेल, उदबत्ती बनविण्यासाठी केला जातो. गुलकंद करण्यासाठी देशी जातीच्या लाल फुलांचा वापर करावा. याचबरोबरीने एव्हान, क्रिमझन ग्लोरी हार्ट थ्रॉब, ब्ल्यू मून, मॉन्टेझुमा, हैद्राबादी गुलाब या सुवासिक फुलांच्या जाती आहेत.

गुलकंद करण्याची कृती

साहित्य 1) गुलाब पाकळ्या, 2) खडी साखर, 3) प्रवाळ पिष्ठी 
1) गुलकंद करण्यासाठी देशी जातीच्या लाल फुलांचा वापर करावा. म्हणजे गुलकंदाला रंग व सुगंध चांगला येतो. देशी गुलाबांना जेवढा सुगंध असतो, त्या प्रमाणात विदेशी गुलाबांना नसतो. 
2) प्रथम पूर्ण उमललेल्या निरोगी फुलांच्या पाकळ्या वेगळ्या कराव्यात. पाकळ्यांचे बारीक तुकडे करावेत. एक किलो खडी साखर (1ः1) या प्रमाणात एक थर पाकळ्या आणि एक थर खडी साखर असे काचेच्या बरणीत भरावे. 
3) काचेची बरणी उन्हात 4 ते 5 दिवस ठेवावी. उन्हामुळे साखरेचे पाणी होते. आणि त्यात या पाकळ्या मुरतात. असा चविष्ट गुलकंद 21 ते 25 दिवसांत खाण्यासाठी तयार होतो.

गुलकंदाचे फायदे

1) एक उत्तम पाचक आहे. उष्णतेपासून होणारे विकार, ताप, रक्तपित्त, कांजिण्या, शारीरिक दौर्बल्यावर उपचारासाठी गुलकंदाचा चांगला उपयोग होतो. 
3) गुलकंद कांतिदायक तृष्णाशामक आहे. 
4) गुलकंदामध्ये 10 टक्के प्रवाळ मिसळून वाढत्या वयाची मुले आणि शारीरिक दौर्बल्य असलेल्यांना दिल्यास ते शक्तिवर्धक म्हणून काम करते.

संपर्क – सुनीता चौहान -9422304948 
(लेखिका कृषी विज्ञान केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथे कार्यरत आहेत.)

चिकूपासून जॅम, स्क्वॅश
चिकूपासून जॅम, स्क्वॅश

चिकूच्या पाकविलेल्या फोडी, जॅम, स्क्वॅश, फोडी हवाबंद करणे, भुकटी हे पदार्थ तयार करता येतात. हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली गोड फळे घ्यावीत. फळे स्वच्छ धुवावीत. साल काढावी. बिया काढून टाकाव्यात. फोडी कराव्यात.

पाकविलेल्या चिकूच्या फोडी

चिकूची व्यवस्थित पिकलेली, गोड चवीची फळे निरीक्षणपूर्वक निवडून घ्यावीत. फळे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. त्याचे चार तुकडे (लांबीप्रमाणे) करून बी पूर्णपणे काढून टाकावे. मिठाच्या दोन टक्के द्रावणामध्ये फळांचे तुकडे ३ ते ४ मिनिटे बुडवून ठेवावेत. नंतर फोडी ड्रायरमध्ये (४० अंश सेल्सिअस) किंवा सूर्यप्रकाशात पूर्ण एक दिवस वाळवाव्यात. दुसऱ्या दिवशी फळांचे तुकडे ४० अंश ब्रिक्स साखरेच्या पाकात पाच मिनिटे शिजवावेत. फोडी द्रावणातून बाहेर काढून पुन्हा सूर्यप्रकाशात अथवा ड्रायरमध्ये (४० अंश सेल्सिअस) तापमानात वाळवाव्यात. त्यापुढील दिवशी अनुक्रमे ५५ व ६५ अंश ब्रिक्स पाकामध्ये शिजवून वाळवाव्यात. नंतर फोडी चांगल्या वाळवाव्यात. कोरड्या फोडी प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून सीलबंद कराव्यात.

चिकू स्क्वॅश

चिकूच्या फोडी मिक्सर/ पल्परमध्ये घालून चांगला लगदा तयार करून घ्यावा. लगदा मलमलच्या कापडाने गाळून त्यातला रस काढून घ्यावा. एफपीओ प्रमाणीकरणानुसार (२५ टक्के रस, ४५ ते ५० टक्के एकूण विद्राव्य घटक व ०.७५ ते १ टक्का आम्ल) घटक पदार्थ घ्यावेत.

घटक पदार्थांचे प्रमाण

चिकू रस – १ किलो पाणी – १ लिटर साखर – १ किलो सायट्रिक आम्ल – ४० ग्रॅम

चिकू रस, साखर, पाणी, सायट्रिक ॲसिड यांचे एकजीव मिश्रण तयार करावे. हे मिश्रण गाळून घ्यावे. स्क्वॅश ८० ते ८२ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत गरम करावा. पोटॅशियम मेटाबाय सल्फाइट ७१० मिलिग्रॅम/ किलो स्क्वॅश किंवा सोडियम बेन्झोएट ६०० मिलिग्रॅम/ किलो स्क्वॅश या प्रमाणात थोड्या स्क्वॅशमध्ये एकजीव करून संपूर्ण स्क्वॅशमध्ये घालावे. गरम स्क्वॅश बाटल्यांमध्ये भरावा. झाकणे बसवावीत. स्क्वॅश थंड व कोरड्या जागेत ठेवावा. स्क्वॅश सहा महिने टिकतो.

चिकू भुकटी

चिकूची पक्व फळे धुऊन, साल व बी काढून घ्यावीत. फळांचे आठ तुकडे (लांबीप्रमाणे) करून सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रात (५५ – ६० अंश सेल्सिअस, पाण्याचे प्रमाण ७-८ टक्के कमी होईपर्यंत) वाळवावेत. त्यानंतर यंत्राच्या साह्याने फोडींची भुकटी करावी. भुकटी २५० गेजच्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सीलबंद साठवून ठेवावी.

या भुकटीपासून मिल्कशेक तयार करता येते. मिठाई, आइस्क्रीम तयार करण्यासाठीसुद्धा वापर करता येतो.

चिकू जॅम

चिकूची पिकलेली फळे धुऊन, साल व बी काढावे. फळाचे तुकडे करून मिक्सर/ पल्परच्या साह्याने गर तयार करावा. प्रमाणीकरणानुसार (४५ टक्के गर, ६८ अंश ब्रिक्स घनपदार्थ, १ टक्का आम्ल) घटक पदार्थ घ्यावेत.

घटक पदार्थ – प्रमाण

चिकू गर – २ किलो साखर – १.५ किलो पाणी – २५० मि.लि. सायट्रिक आम्ल – १५ ग्रॅम पेक्टीन – १० ग्रॅम

गर, साखर, पाणी एकत्र करावे. मिश्रण शिजवावे. शिजविताना हळूहळू ढवळावे. जॅम आचेवरून उतरविण्यापूर्वी सायट्रिक आम्ल व पेक्टीन (थोड्या पाण्यामध्ये मिसळवून) घालावे. मिश्रणाचे तापमान १०५ अंश सेल्सिअस, विद्राव्य घटक ६८ अंश ब्रिक्स एवढे झाल्यावर जॅम तयार होतो. इतर चाचण्या (फ्लेक चाचणी, साखरेच्या दीडपट वजन) घेऊन जॅम तयार झाल्यावर गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या बाटलीमध्ये भरावा. थंड झाल्यावर बाटली सीलबंद करावी.

चिकूच्या हवाबंद फोडी

पिकलेल्या चिकूच्या फोडी बहर साइज कॅनमध्ये (२८० ग्रॅम) किंवा ए-२.५ साइज कॅनमध्ये (५०० ते ५५० ग्रॅम) भराव्यात. उर्वरित जागा साखरेच्या ५५ अंश ब्रिक्स पाकाने भरावी. कॅनच्या तोंडापासून १.२५ सें.मी. अंतर सोडावे. डबे ८० अंश सेल्सिअस तापमानाला निर्वात करून बंद करावेत. बटर साइज कॅन (२० मिनिटे) व ए २.५ कॅन अनुक्रमे २० व २५ मिनिटे उकळत्या पाण्यामध्ये ठेवावेत. नंतर कॅन गार पाण्याने थंड करावेत. कॅन थंड व कोरड्या जागेत ठेवावेत.

चिकू शेक

चिकूपासून चांगल्या प्रतीचा शेक तयार होतो. शेक तयार करण्यासाठी चिकूचा गर अथवा फोडींचे अतिशय बारीक-बारीक तुकडे करावेत.

घटक पदार्थ

चिकूचा गर/तुकडे – १०० ग्रॅम साखर – १३६ ग्रॅम – १५० ग्रॅम दूध – ७५० – ८०० ग्रॅम

स्टीलच्या पातेल्यामध्ये दूध गरम करावे. थंड झाल्यावर साय काढावी. दुधामध्ये साखर विरघळवून घ्यावी. नंतर त्यात चिकूचा गर अथवा तुकडे टाकावेत. हे मिश्रण मिक्सरमध्ये टाकून एकजीव करावे. शेक थंड होण्यास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावा. आवडीनुसार बर्फाचा चुरा टाकून शेक पिण्यास वापरावा.

डॉ. गीता रावराणे-मोडक – ९४२२३०२८६२

(लेखिका पद्‌मभूषण वसंतदादा पाटील ॲग्रिकल्चर कॉलेज, तळेगाव दाभाडे, आंबी जि. पुणे येथे कार्यरत आहेत)

चिकूपासून पावडर, बर्फी, चटणी
चिकूपासून पावडर, बर्फी, चटणी

चिकूमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, 5.3 ते 7.4 मिलिग्रॅम तंतुमय पदार्थ आणि जीवनसत्त्व क असते. नोव्हेंबर महिन्यापासून जास्त प्रमाणात चिकू फळांची आवक होते, हे लक्षात घेऊन बाजारपेठेच्या मागणीनुसार चिकूपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करावेत.

चिकू चिप्स

साहित्य – पिकलेले चिकू

 • चांगले चिकू वेचून घ्यावेत किंवा पिकलेले चिकू घ्यावेत.
 • स्टेनलेस स्टीलच्या चाकूच्या साह्याने चिकूची साल काढून घ्यावी.
 • चिकूचे दोन भाग करून त्यातील मधला पांढरा भाग व बिया काढून घ्याव्यात.
 • त्यानंतर चिकूचे पातळ काप करावेत.
 • हे काप सोलर ड्रायर (वाळवणी यंत्रामध्ये) तीन दिवस वाळवावे.
 • कडकडीत वाळवलेले चिकू चिप्स हवाबंद डब्यात भरून ठेवावे.

चिकू पावडर

साहित्य – चिकू चिप्स

 • कडकडीत वाळवलेले चिकू चिप्स घ्यावेत.
 • त्यानंतर ग्राइंडरच्या साह्याने वाळलेल्या फोडींची भुकटी करावी.
 • तयार झालेली भुकटी 250 गेजच्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सीलबंद करून साठवून ठेवावी.
 • चिकू पावडरपासून पेय तयार करता येते. त्यासाठी चिकूची भुकटी दुधामध्ये 1ः20 या प्रमाणात मिसळून ढवळावी. त्यानंतर त्यामध्ये साखर मिसळून चिकू मिल्कशेक तयार करावा.

चिकू खोबरा बर्फी

साहित्य –
चिकूचा लगदा – 1 वाटी
खोवलेला नारळ – 1 वाटी
साखर – 1 ते 2 वाटी
दूध – 1 वाटी
तूप – 2 चमचे
कृती –

 • एक पसरट भांड्यात तूप घेऊन त्यात नारळ चांगला भाजून घ्यावा.
 • नंतर त्यात साखर व चिकूचा लगदा मिसळून ते मिश्रण चांगले घोटावे.
 • घोटत असतानाच एक वाटी सायीचे दूध त्यात मिसळावे. त्यानंतर हे मिश्रण एकजीव होऊन घट्टपणा येईल तोपर्यंत घोटत राहावे.
 • मिश्रण घट्ट झाल्यावर एका ताटाला तूप लावून त्यात तो लगदा पसरावा. चांगले थापून थोड्या वेळाने त्याच्या वड्या पाडाव्यात.
 • या वड्या चिकूच्या नैसर्गिक रंगामुळे चांगल्या दिसतात व चविष्ट लागतात.

चिकू चटणी

साहित्य-
पिकलेले चिकू – 2
हिरव्या मिरच्या – 2 ते 3
लसूण पाकळ्या – 3 ते 4
कोथिंबीर – गरजेप्रमाणे
चिंच – गरजेप्रमाणे
मीठ व जिरेपूड – चवीप्रमाणे
कृती –

 • चिकू सोलून त्याचे तुकडे करावेत. त्यातील बिया काढून घ्याव्यात.
 • वरील सर्व साहित्य चिकूमध्ये मिसळून मिक्‍सरमध्ये चटणी वाटून घ्यावी.

चिकू नारळ लाडू

साहित्य –
चिकू पावडर – 1 वाटी
सुके खोबरे – 1 वाटी
रवा – 1 वाटी
दळलेली साखर – 1 वाटी
वेलचीची पावडर – 1 लहान चमचा
तूप – दीड वाटी
चारोळी – 20 ते 25 दाणे
बेदाणे – 10 ते 15
कृती –

 • प्रथम रवा तुपात भाजून घ्यावा.
 • सुके खोबरे किसून, भाजून व वाटून घ्यावे.
 • नंतर एका भांड्यात भाजलेला रवा, भाजलेला खोबरे कीस, चिकू पावडर, साखर व इतर सर्व साहित्य एकत्र करावे. उरलेले तूप तापवून त्यात मिसळावे.
 • आपल्या आवडीप्रमाणे छोटे-मोठे लाडू बनवून घ्यावेत.
 • हे लाडू पौष्टिक असतात.

चिकू स्क्वॅश

साहित्य –
चिकू लगदा – 1 किलो (10 ते 12 फळे)
साखर – 1 किलो ( 5 मध्यम कप)
पाणी – 1 लिटर (5 मध्यम कप)
सायट्रिक आम्ल – 40 ग्रॅम
कृती –

 • चिकूच्या फोडी मिक्‍सरमध्ये घालून चांगला लगदा तयार करून घ्यावा.
 • हा लगदा जाडसर कापडात बांधून घेऊन त्यातला रस काढून घ्यावा.
 • चिकूचा लगदा, साखर, पाणी व सायट्रिक आम्ल हे सर्व घटक एकत्र करून त्यांचे चांगले घोटून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे.
 • तयार झालेल्या मिश्रणात पोटॅशियम मेटाबायसल्फेट 600 मिलिग्रॅम प्रति किलो किंवा सोडियम बेंझोएट 710 मिलिग्रॅम प्रति किलो प्रमाणात मिसळावे किंवा तयार स्क्वॅश 80 ते 82 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत 25 मिनिटे गरम करून साठवावा.
 • तयार स्क्वॅश भरलेले कॅन किंवा बाटल्या साध्या पाण्याखाली धरून थंड कराव्यात. बाटल्यांमध्ये साठविलेला स्क्वॅश थंड कोरड्या जागेत ठेवावा, म्हणजे स्क्वॅश 6 महिन्यांहून अधिक काळ टिकतो.

चिकू जॅम

साहित्य –

चिकू लगदा – 2 किलो (25 फळे)

साखर – 2 किलो (6 ते 8 मध्यम कप)
पाणी – 250 मिलि (1 मध्यम कप)
सायट्रिक आम्ल – 15 ते 18 मिलिग्रॅम
कृती –

 • चिकू स्क्वॅशच्या कृतीप्रमाणे फळांची निवड करून त्यांचे तुकडे करावेत. जॅमसाठी लागणारे सर्व घटक एकत्र करून ठराविक घट्टपणा येईपर्यंत शिजवावेत. * शिजविताना मिश्रण हळूहळू ढवळावे.
 • शिजलेले मिश्रण म्हणजे जॅम गरम असतानाच कॅनमध्ये किंवा भांड्यामध्ये भरावा.
 • चांगली पक्व फळे घेऊनही जॅम घट्ट झाला नाही तर त्यात थोडी पेक्‍टिनची पावडर टाकावी.

संपर्क – रूपाली देशमुख – 8698701177
(लेखिका कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, ता. डहाणू, जि. पालघर येथे कार्यरत आहेत.)

ज्वारी प्रक्रिया उद्योग
ज्वारी प्रक्रिया उद्योग

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत भरडधान्याचे उत्पादन वाढवून त्याचा दर्जा उंचावण्यासाठी “भरडधन्य विकास कार्यक्रम” राज्यात राबविला जात आहे.

यवतमाळ येथील कृषि विज्ञान केंद्र, (डॉ.पं.दे.कृ.वी.) येथे शासनाच्या कृषि आयुक्तालया मार्फत नुकतेच ज्वारी प्रकीया प्रात्यक्षिक युनिट सुरु झालेले आहे.

यवतमाळ जिल्ह्याचे वातावरण ज्वारी या पिकास अत्यंत पोषक आहे. खरीप व रबी या दोन्ही हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकरी ज्वारी पिक घेऊ शकतात.

मध्यंतरी ज्वारी या अतिशय पौष्टिक मुल्य असलेल्या पिकाकडे थोडे दुर्लक्ष झाले होते. मात्र भरडधान्य विकास कार्यक्रमाचे निमित्ताने ज्वारीचे महत्व पुन्हा वाढते आहे.

ज्वारी प्रक्रिया युनिटमध्ये एकूण चार यंत्रांचा समावेश होतो.

डी-स्टोनर

या यंत्रांद्वारे ज्वारीतील खडे, माती काडीकचरा निघून ज्वारी व ग्रेडिंग होते म्हणजेच जाड व बारीक दाणे वेगवेगळे होतात.  प्रतवारी मुळे ज्वारीची गुणवत्ता सुधारते शेतक-याला चांगली किंमत मिळते. प्रती तासाला पाचशे किलो (१/२ क्विंटल) धान्य स्वच्छ करण्याची या यंत्राची क्षमता आहे.

डी-हलर

या यंत्रांद्वारे ज्वारीला पॉलिश केले जाते.  खरीप ज्वारीला पावसामुळे  कधी कधी काजळी येते.

अशा ज्वारीला बाजार भाव एकदम कमी मिळtoतो व खाण्या करिता वापरल्यास बुरशीमुळे आरोग्यास अपाय होतो.

डीहलर मधून काळ्या व बेरंग ज्वारीवरील काळपट कवच घासून काढले जाते पांढरी स्वच्छ

ज्वारी मिळते.  परिणामी बाजारभाव चांगला मिळतो.

पल्वरायझर

हे पिठाच्या गिरणी सारखे यंत्र असून त्यात स्वच्छ पॉलिश केलेली ज्वारी टाकुन त्याचे वेगवेगळ्या जाडीचे पीठ तयार केले जाते.  तसेच ज्वारीची सोजी किंवा दलीया ज्वारीचा रवा, पीठ इ. आवश्ककते नुसार ज्वारी दळण्या करिता एक अॅडजस्टेबल हँडल यामध्ये आहे.

शिफ्टर

पल्वरायझर मधून दळून काढलेला भरडा या शिफ्टर मध्ये टाकला जातो.  याला दोन बाजूला रवा व पीठ वेगवेगळे करण्याचीसुविधा असते.  पीठ गाळून, उत्तम गुणवत्तेचा ज्वारीचा रवा यातून वेगळा होतो.  मिळालेला उत्तम गुणवत्तेचा रवा पॅकिंग मशीनने प्लॅस्टिक पिशवीत भरून लेबलिंग केले जाते.

ज्वारीच्या पिठापासून भाकरी, पापड, धापोडे, पळीपापड ई. पदार्थच आमच्या गृहिणींना माहिती होते.  परंतु या वेगवेगळ्या मशिनच्या सहाय्याने मिळणा-या जाड व बारीक पिठापासून इडली मिक्स, चकली मिक्स, ढोकळा, उतप्पा, ज्वारीच्या शेवया इ. नवीन पदार्थ तयार करता येतात.  उत्तम प्रतिचा रवा, दलिया यांचेही चांगले मार्केटिंग करता येते.

आरोग्याप्रती जागरूक असण्यासाठी व मधुमेह, रक्तदाब, कँन्सर, अतिजाड

या वर्गात येणा-या व्यक्तींकरिता आहारातील ज्वारीचे अनन्यसाधारण महत्व आहे.  ज्वारीतील पौष्टिक गुणधर्मा बद्दल मुख:त्वे त्यातील उच्च दर्जाच्या डायटरी फायबर्स ला कुठलाही पर्याय नाही.

ज्वारीमध्ये ७२% कर्बोदके ११.६% प्रथिने व १.९% मेदाचे प्रमाण आहे.  तसेच प्रथीनामध्ये अल्ब्युमीन, ग्लोंब्युलीन, प्रोलॅमीन व ग्लाटेलीन इ. या समावेश आहे.  डायटरी फायबर्स मुळे व प्रथिनांमुळे नर्व्हस सिस्टीम सशक्त होण्यास व चयापचयाची प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.  मलबद्धता व

मलावरोध यासारखे आजार उद्भभवत नाही.  सर्व प्रकारची पौष्टिक मुल्ये जसे जीवनसत्वे, खनिजे व डायटरी फायबर्स ज्वारीमधून संतुलित प्रमाणात मिळतात.

बचत गटांकरिता या ज्वारी प्रक्रिया युनिटद्वारे रोजगाराची नवीन संधी उपलब्ध झाली आहे.  काळी ज्वारी पॉलिश करून देणे, ज्वारीचे ग्रेडिंग करून देणे, ज्वारीचे वेगवेगळे जाडीचे पीठ तयार करून व्यवस्थीत व आकर्षक पॅकिंग केल्यास उत्तम व्यवसाय उदयाल येऊ शकतात.

तसे ‘रेडी टू यूज’ व ‘ इंस्टंट मिक्स ‘ इ. प्रक्रिया पदार्थ ज्वारीपासून तयार करता येतील.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे ज्वारी प्रक्रिया केंद्रात शेतकरी गट, शेतकरी महिला व ग्रामीण युवक युक्तिंकरीता या विषयावर प्रशिक्षण देण्याची व्यवस्था उपलब्ध आहे.

संपर्क :- डॉ. प्रमोद यादगीरवार , कार्यक्रम समन्वयक किंवा प्रा. नीलिमा पाटील ,विषय विशेषज्ञ दूरध्वनी क्र.(०७२३२) २४८२३५

पनीर तयार करा
पनीर तयार करा

पनीर तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. त्यासाठी नवनवीन यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. परंतु या महागड्या यंत्रांशिवाय सुद्धा घरच्या घरी पनीर तयार करता येऊ शकते. पनीरसाठी म्हशीचे दूध उत्तम असते. कारण त्यात स्निग्धांशाचे प्रमाण गाईच्या दुधाच्या तुलनेने अधिक असते. पनीरपासून अनेक उपपदार्थ उदा. पालक पनीर, मटार पनीर, आलू पनीर, पनीर टिक्का इ. तयार करता येऊ शकतातदूध हा अतिशय शीघ्रपणे खराब होणारा पदार्थ आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे दूध लवकरात लवकर बाजारात जाणे, त्यासोबतच ग्राहकांपर्यंत पोचणे आवश्‍यक असते. यामुळेच दुग्धोत्पादकाची दूधदराबाबत क्रयशक्ती शिथिल होते आणि बहुतांश वेळी मिळेल त्या दरात दूध विकणे क्रमप्राप्त ठरते. जेथे शीतकरण यंत्राची सुविधा आहे, सरकारी तत्त्वाखाली दुग्ध संस्थेमार्फत प्रामाणिकपणे राबत असलेली शाश्‍वत बाजारपेठ आहे, तेथे हा प्रश्‍न नाही; परंतु बहुतांश महाराष्ट्रात अशाश्‍वत बाजारभाव, ग्रामस्तरावर शीतकरण सुविधेचा अभाव, वाहन व्यवस्थेचा अभाव हे दुग्ध व्यवसायाकडे अनाकर्षक करणारे ठळक मुद्दे आहेत. उत्पादित झालेल्या दुधाचा टिकविण्याचा काळ वाढविण्यासाठी दूध उत्पादकांनी दुधापासून तयार होणारे मूल्यवर्धित पदार्थ उदा. पनीर, खवा, चीज, तूप इत्यादी तयार करणे या आवश्‍यक आहे. दुधापासून घरच्या घरी पनीर कसे करता येईल याबाबत माहिती करून घेऊ.

पनीर म्हणजे काय?

दुधाचे आम्ल साकळीत (रलळव लेरर्सीश्ररींशव) करून त्यातील जलतत्त्वाचे प्रमाण दाब देऊन कमी केलेला पदार्थ म्हणजे पनीर होय. पनीर हे सामान्य दुधापेक्षा जास्त काळ टिकून राहते म्हणून बाजारात पनीरला भरपूर मागणी आहे. शाकाहारी व्यक्तींना प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून पनीर देशात अतिशय प्रसिद्ध आहे. पनीरपासून अनेक उपपदार्थ तयार करता येऊ शकतात. उदाहरणार्थ पालक पनीर, मटार पनीर, आलू पनीर, पनीर टिक्का इ. पनीर तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. त्यासाठी नवनवीन यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत; परंतु पशुपालक या महागड्या यंत्राशिवाय सुद्धा घरच्या घरी पनीर तयार करू शकतो. पनीरसाठी म्हशीचे दूध उत्तम असते. कारण त्यात स्निग्धांशाचे प्रमाण गाईच्या दुधाच्या तुलनेने अधिक असते.

लाकडी पेटी तयार करणे (पनीर दाब पेटी)

यासाठी सर्वसाधारणपणे 45 सें.मी. लांब, 25 सें.मी. रुंद आणि 25 सें.मी उंच या आकाराची लाकडी पेटी तयार करावी, या पेटीसाठी वापरलेल्या लाकडी फळीला चारही बाजूने बारीक बारीक छिद्रे असावेत. पनीर तयार करताना दुधातील पाणी (व्हे) निघण्यासाठी ही छिद्रे आवश्‍यक असतात.

पनीर बनविण्याची पद्धत

एका स्वच्छ पातेल्यामध्ये स्वच्छ, निर्भेळ आणि ताजे सहा ते आठ लिटर विशेषतः म्हशीचे दूध घ्यावे. हे दूध 82 अंश से. तापमानावर पाच ते आठ मिनिटे तापवावे. त्यानंतर दुधाचे तापमान 70 अंश से.पर्यंत कमी करावे. या तापमानावर दुधात एक किंवा दोन टक्के तीव्रता असलेले सायट्रिक आम्ल बारीक धारेने सोडावे. सायट्रिक आम्लाऐवजी लिंबाचासुद्धा उपयोग करता येतो. सायट्रिक आम्लामुळे दूध लगेच नासते. अशा फाटलेल्या किंवा नासलेल्या दुधातून बाहेर येणारे हिरवट निळसर पाणी जेव्हा दिसू लागेल, त्याक्षणी सायट्रिक आम्ल टाकणे बंद करावे. नंतर दुसऱ्या एका स्वच्छ पातेल्याच्या तोंडावर तलम किंवा मखमलीचे कापड बांधावे. त्यावर पहिल्या पातेल्यातील दूध ओतावे. कापडावर छन्ना (पाणी वगळता उरलेले घनपदार्थ) जमा होईल. वेगळा केलेला छन्ना लगेच लाकडी पेटीत (पनीर दाब पेटी) कापडासहित ठेवावा. त्यानंतर लाकडी पेटी वर हळूहळू 25 ते 30 किलोग्रॅम वजन 15 ते 20 मिनिटे ठेवावे. त्यानंतर तयार झालेले पनीर बाहेर काढून पाच ते आठ अंश से. तापमान असलेल्या थंड पाण्यात तीन ते चार तास ठेवावे. थंड पाण्यातून काढून लाकडी फळीवर पाणी निघण्यासाठी थोडा वेळ ठेवावे. म्हशीच्या दुधापासून (सरासरी स्निग्धांश सहा टक्के) दुधाच्या 20 ते 22 टक्के पनीर तयार होते. गाईच्या दुधापासून (सरासरी स्निग्धांश 3.5 ते 4 टक्के) सरासरी 16 ते 18 टक्के पनीर तयार होते, परंतु गाईच्या दुधापासून तयार केलेले पनीर मऊ असते, त्यामुळे त्या पनीरला बाजारात म्हशीच्या दुधापासून तयार केलेल्या पनीरच्या तुलनेत कमी मागणी असते.

लेखक – डॉ. रजिउद्दिन, 7588062558
– डॉ. खोडे, 9421727911
(लेखक पशुजन्य पदार्थ प्रौद्योगिकी विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि.लातूर येथे कार्यरत आहेत.)

आल्यापासून सुंठनिर्मितीची माहिती
आल्यापासून सुंठनिर्मितीची माहिती

भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. आल्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी आल्याचे कंद स्वच्छ धुऊन मातीपासून वेगळे करावेत आणि उन्हात चांगले वाळवावेत. आल्याच्या कंदापासून खारे आले, आलेपाक, आल्याचे सरबत, वाळलेले आले आणि आल्याचे लोणचे बनवितात. सुंठ तयार करावयास वापरावयाच्या आले पिकाची काढणी परिपक्व झाल्यानंतर करावी. ते पूर्ण वाढलेले, निरोगी असावे. सुंठीसाठी वापरायचे आले अधिक तंतुमय असू नये. रिओडी जानेरो, माहीम यांसारख्या कमी तंतुमय असणाऱ्या जातींचा वापर करावा. यापासून उत्तम प्रतीची सुंठ तयार होऊन चांगला बाजारभाव मिळतो.

सुंठ तयार करण्याच्या पद्धती

मलबार पद्धती

या पद्धतीत आले स्वच्छ निवडून आठ-दहा तास पाण्यात भिजत ठेवतात. त्यानंतर त्याची साल काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा-सात तास भिजत ठेवतात. त्यानंतर द्रावणातून काढून हे आले छोट्याशा व बंद खोलीत पसरून ठेवतात. बंद खोलीत आल्याच्या कंदाला 12 तास गंधकाची धुरी देतात. थोडक्‍यात, बंद खोलीत गंधक जळत ठेवतात. त्यानंतर कंद बाहेर काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा तास भिजत ठेवतात व परत 12 तास गंधकाची धुरी देतात. अशाप्रकारे ही प्रक्रिया तीन वेळा करावी लागते, त्यामुळे आल्याच्या कंदांस पांढराशुभ्र रंग येतो. हे प्रक्रिया केलेले आले सूर्यप्रकाशामध्ये वाळवले जाते व गोणपाटामध्ये घालून स्वच्छ केले जाते. हेच आले सुंठ म्हणून बाजारात पाठविले जाते.

सोडा व खास मिश्रण पद्धती

या पद्धतीने सुंठ तयार करण्यासाठी आले सर्वप्रथम स्वच्छ निवडून घ्यावे. त्यानंतर आठ ते दहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याची साल काढून घ्यावी. त्यानंतर दीड x दोन फूट आकाराच्या हाताने उचलेल इतक्‍या क्षमतेच्या गॅल्व्हनाइज्ड जाळीच्या पिंजऱ्यामध्ये आले भरून घ्यावे. तीन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये सोडिअम हायड्रॉक्‍साईड (कॉस्टिक सोडा)ची 20 टक्के, 25 टक्के आणि 50 टक्के तीव्रतेची द्रावणे तयार करून उकळून घ्यावीत. या द्रावणांमध्ये कंदाने भिजलेला पिंजरा 20 टक्के द्रावणामध्ये पाच मिनिटे, 25 टक्के द्रावणामध्ये एक मिनीट आणि 50 टक्के द्रावणामध्ये अर्धा मिनीट धरावा. त्यानंतर पिंजऱ्यातील आले चार टक्के सायट्रिक ऍसिडच्या द्रावणात दोन तास बुडवून ठेवावे. त्यानंतर चांगले निथळून स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळत घालावे. चांगले वाळल्यानंतर थोडीफार राहिलेली साल चोळून काढावी. अशा पद्धतीने चांगली सुंठ तयार होते. प्रक्रिया करण्यापूर्वी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे आवश्‍यक आहे. 

संपर्क – प्रा. हेमंत शिंदे, 9822615174 
भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ऑईस्‍टर मशरूमचे उत्‍पादन
ऑईस्‍टर मशरूमचे उत्‍पादन

हंगाम आणि विविधता

संपूर्ण वर्षभर लागवड घरांतर्गत असते आणि याला मशरूम गृहाची गरज असते.
पांढरे ऑईस्टर (Co-1) आणि राखाडी रंगाचे ऑईस्टर (M-2) तामिळनाडुसाठी योग्य आहेत.मशरूम गृह16 स्क्वे.मी. चे शाकारलेले छप्पर आवश्यक आहे. स्पॉन रूम आणि पैदास गृह असे शेडचे विभाजन करा. स्पॉन रूम: 25-30 डि.से. तापमान राखा, वायुवीजन पुरवा, प्रकाशाची गरज नाही.पैदास/उपज गृह: 25-30 डि.से. तापमान राखा, 75-80 टक्केच्या वर RH,पुरेसा प्रकाश आणि वायुवीजन राखा.(डिजिटल थर्मामीटर आणि आर्द्रता मीटर बाजारात उपलब्ध आहेत)

स्पॉन (मशरूमचे बीजन)
योग्य थर: ज्वार/चवळी/शलगम, बाजरी, गव्हासारखी धान्येस्पॉन तयार करणे: धान्ये अर्धवट शिजवा, वा-यावर वाळवा, कॅल्शियम कार्बोनेटच्या भुकटीत 2 टक्के प्रमाणात मिसळा, धान्ये ग्लुकोजच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरा, कापसाने बंद करा आणि कुकरमध्ये 2 तास निर्जंतुक करण्यासाठी ठेवा. बुरशीचे शुध्द कल्चर (शेती विभाग/शेती विश्वविद्यालयातील उत्पादन) घाला आणि खोलीच्या तापमानावर 15 दिवस ठेवा.

स्पॉनिंगसाठी 15 ते 18 दिवसांचे जुने स्पॉन वापरा.मशरूम बेड तयार करणेयोग्य थर: तांदूळ/गव्हाचे वाळलेले गवत/उसाचे वाळलेले अवशेष, ज्वारीचे वाळलेले तूस थर शिजविणे: 5 सें.मी.चे तुकडे करा, पाण्यात 5 तास भिजवा, पाणी एक तास उकळा, पाणी काढून टाका, वा-यावर 65 टक्के आर्द्रतेसह वाळवा (हातांनी पिळल्यावर पाणी निथळता कामा नये).पिशव्या तयार करणे:- 60 x 30 सें.मी. पॉलिथिनच्या पिशव्या (दोन्ही बाजू उघड्या).- पिशवीचे एक तोंड बांधा आणि मध्यभागी 1 सें.मी.व्यासाचे भोक पाडा. – पिशवीमध्ये 5 से.मी. उंचीवर शिजलेले वाळलेले गवत टाका; 25 ग्राम स्पॉन शिंपडा. – गवताचा 25 से;मी. उंचीचा थर घाला.

पुन्हा असेच करा आणि या प्रकारे स्पॉनचे चार थर आणि गवताचे पाच थर करा. – तोंड बांधून टाका आणि बेडचे टायर स्पॉन रनिंग रूममध्ये तयार करा. – 15-20 दिवसांनी, पिशव्यांची तोंड उघडा आणि हे बेड क्रॉपिंग रूममध्ये ठेवा. – थोड्या-थोड्या वेळाने पाणी शिंपडून हे बेड ओलसर ठेवा.कापणी मशरूमची टोके बेड उघडल्यानंतर तिस-या दिवशी दिसतात आणि 3 दिवसांनी पिकतात. पाणी शिंपडण्या आधी, परिपक्व मशरूमची कापणी रोज किंवा एक दिवसाआड करा.दुसरी व तिसरी कापणी पहिल्या व दुस-या कापणीनंतर बेडचे पृष्ठभाग खरवडून मिळवू शकता.

कवठापासून तयार करा जेली, जॅम
कवठापासून तयार करा जेली, जॅम

जेली

 • जेली तयार करण्यासाठी पूर्ण वाढ झालेली, मोठ्या आकाराची व अर्धवट पिकलेली कवठे घ्यावीत.
 • प्रथम ती स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यावीत. त्यानंतर ती फोडून स्टीलच्या सुरीने गर काढून घ्यावा.
 • स्टीलच्या पातेल्यामध्ये जेवढा गर तेवढेच पाणी मिसळून प्रतिकिलो गरास 1.5 ग्रॅम या प्रमाणात सायट्रिक आम्ल मिसळावे.
 • पातेले शेगडीवरती मंद आचेवर ठेवावे. मिश्रण शिजवत असताना ते पातेल्यास चिकटू नये यासाठी ते अधूनमधून पळीने हलवत राहावे.
 • मिश्रणास उकळी आल्यानंतर ते अर्धा तास शिजवावे. नंतर पातेले खाली उतरून मिश्रण थंड झाल्यानंतर थोडे थोडे मलमल कापडावर टाकून हाताने हळुवारपणे दाबून त्याचा रस काढावा.
 • फडक्‍यात राहिलेला चोथा वेगळा करावा. गाळून घेतलेला रस स्टीलच्या उभट भांड्यामध्ये एकत्र करून तो 24 तास एका ठिकाणी स्थिर ठेवावा.
 • दुसऱ्या दिवशी उभट भांडे हळुवारपणे तिरके करून निवडलेला रस दुसऱ्या स्टीलच्या भांड्यात काढून घ्यावा. भांड्याच्या तळाला साठलेला साका रसात येणार नाही याची काळजी घ्यावी.
 • निवळलेला रस जेली तयार करण्यासाठी वापरावा.
 • जेली तयार करण्यासाठी पेक्‍टिनचे परीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रसातील पेक्‍टिनच्या प्रतीवरून त्यासाठी वापरावयाचे साखरेचे प्रमाण ठरवावे.
 • काचेच्या पेल्यात एक चमचा रस घेऊन त्यामध्ये दीड चमचा मिथिलेटेड अल्कोहोल (रेक्‍टिफाईड स्पिरिट) मिसळून मिश्रण हलवावे. थोड्या वेळाने त्याचे परीक्षण करावे.
 • मिश्रणाची एकच घट्ट गुठळी तयार झाल्यास अशा रसामध्ये पेक्‍टिनचे प्रमाण आहे असे समजावे. अशा रसासाठी एकास एक साखरेचे प्रमाण वापरावे. जर मिश्रणामध्ये लहान गुठळ्या झाल्या, तर त्यामध्ये पेक्‍टिनचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे असते.

घटक पदार्थांचे प्रमाण

साहित्य 
कवठाचा रस – 1 लिटर, साखर- मध्यम पेक्‍टिन- 750 ग्रॅम, जास्त पेक्‍टिन- एक किलो. 
कृती

 • स्टीलच्या पातेल्यामध्ये रस मोजून घ्यावा. वापरावयाची साखर वजन करून त्यामध्ये मिसळावी. साखर पळीच्या सहायाने हलवून शक्‍य होईल तेवढी विरघळवून घ्यावी.
 • नंतर पातेले शेगडीवर मंद आचेवर ठेवावे. मिश्रणातील साखर पूर्ण विरघळेपर्यंत पळीने सतत हलवावे. हे मिश्रण उकळी येईपर्यंत शिजवावे.
 • मिश्रणाचे तापमान 105 अंश सेल्सिअस आल्यावर त्याचे परीक्षण करावे. यासाठी एका चमच्यामध्ये थोडी जेली घेऊन ती थोडी थंड झाल्यानंतर चमचा हळूवारपणे तिरपा करावा. मिश्रण एकसंघ खाली पडले तर जेली तयार झाली असे समजावे किंवा मिश्रणाचा ब्रिक्‍स 70 डिग्री आल्यास जेली तयार झाली असे समजून शेगडीवरून पातेले खाली उतरून घ्यावे.
 • पातेले दोन ते तीन मिनिटे स्थिर ठेवावे. या कालावधीत जेलीवर आलेली मळी स्टील झाऱ्याने अलगद काढून टाकावी.
 • निर्जंतुक केलेल्या बाटल्यामध्ये जेली भरून पूर्ण थंड होईपर्यंत त्या उघड्यावर ठेवाव्यात. त्यांना निर्जंतुक केलेली झाकणे बसवावीत. बाटल्या हवाबंद करून त्यांची साठवण थंड व कोरड्या ठिकाणी करावी.

जॅम

 • जॅम करण्यासाठी पूर्ण पिकलेली मोठ्या आकाराची कवठे घ्यावीत. कवठ फोडून स्टीलच्या सुरीने गर काढून घ्यावा.
 • एका पातेल्यामध्ये एक किलो गरास 200 मि.लि. पाणी मिसळून गर हाताने कुस्करून लगदा करावा.
 • लगदा स्टीलच्या चाळणीत घेऊन तो हाताने दाबून त्याचा गर पातेल्यात काढून घ्यावा. तयार गर जॅम करण्यासाठी वापरावा.
 • घटक पदार्थ –
 • साहित्य – कवठाचा गर- 1 किलो, साखर- 1 किलो, सायट्रिक आम्ल- 2 ग्रॅम.
 • कृती
 • जॅम करण्यासाठी पातेल्यामध्ये गर आणि साखर एकत्र करून शेगडीवर ठेवावे.
 • पहिल्या उकळीनंतर त्यात सायट्रिक ऍसिड मिसळावे.
 • गर घट्ट होत आल्यानंतर त्याचा ब्रिक्‍स मोजावा. 68 डिग्री ब्रिक्‍स येईपर्यंत जॅम शिजवावा.
 • जॅम घरी तयार करत असताना एका प्लेटमध्ये पाणी घेऊन शिजवलेले मिश्रण चमच्याने थोडे घेऊन पाण्यामध्ये टाकावे.
 • जर मिश्रण पाण्यामध्ये पसरले तर अजून शिजविण्याची गरज आहे असे समजावे. जर मिश्रण न पसरता गोळी तयार झाली तर जाम तयार झाला असे समजावे.
 • तयार जॅम निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरावा. जॅमची दीर्घकाळ साठवण करायची असल्यास जॅमवर वितळलेल्या मेणाचा पातळ थर देऊन झाकण घट्ट लावावे.

कांडीकोळसा
कांडीकोळसा

कापसाच्या पऱ्हाट्यापासून तयार करा कांडीकोळसा

कापूस वेचणी झाल्यावर शेतकऱ्यांपुढील सर्वांत मोठा प्रश्‍न हा पऱ्हाट्यांचा असतो. अनेकजण या पऱ्हाट्या इंधन म्हणून वापरतात किंवा शेतात जाळून टाकतात. शेताच्या कडेला पऱ्हाट्या साठवल्या तर त्यावरील कीड व रोगाचा प्रादुर्भाव पुढील हंगामातील पिकामध्ये होऊ शकतो. अशा पऱ्हाट्यांपासून कांडीकोळसा तयार करून वाया जाणाऱ्या पऱ्हाट्यांवर उत्तर शोधता येते. एका एकरामध्ये सहा क्विंटल पऱ्हाट्या मिळतात. या पऱ्हाट्या वापरून किमान चार ते पाच महिने कांडीकोळसा तयार करता येतो. याव्यतिरिक्त इतर पिकांच्या काडीकचऱ्याचाही वापर करून वर्षभर कांडीकोळसा उद्योग चालवता येणे शक्‍य आहे.

कांडीकोळसा प्रक्रिया तंत्रज्ञान

भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेतील तज्ज्ञांनी शेतातील काडीकचरा वापरून कांडीकोळसा तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये कोळसा तयार करण्यासाठी लागणारी भट्टी तसेच कांडीकोळसा बनविण्याचे यंत्र आणि चूल तयार केली आहे.

कोळसा तयार करण्याची भट्टी :

ही एक लोखंडी पिंपासारखी भट्टी असून, तिला मधोमध एक झडप असते. कोळसा तयार करण्यासाठी यात पऱ्हाट्या बारीक करून आतमध्ये टाकतात. निम्म्यापेक्षा जास्त भरल्यावर तो पेटवून देऊन झडप बंद करतात. त्यामुळे भट्टीत जितका ऑक्‍सिजन आहे, तोपर्यंत पऱ्हाट्या जळून कोळसा तयार होतो. म्हणजेच ऑक्‍सिजनचा अपुरा पुरवठा केला तर कोळसा तयार होतो. भट्टी पेटवल्यानंतर पाच तासांनी झडप उघडून कोळसा बाहेर काढावा. 
—————— 
एकूण लांबी +1100 मि.मी. 
एकूण व्यास +800 मि.मी. 
क्षमता कि./दिवस +80 कि.ग्रॅ. 
रूपांतर क्षमता +40 टक्के 
मजूर +2 
——————–

कांडी कोळसा तयार करण्याचे यंत्र :

भट्टीत तयार झालेल्या कोळसा शेणामध्ये कालवून हे मिश्रण यंत्रामध्ये टाकतात. हे यंत्र स्क्रू प्रेस तंत्रज्ञानावर चालते. कोळसा व शेण एकत्र केलेले मिश्रण स्क्रूच्या साह्याने यंत्रामध्ये पुढे ढकलले जाते. यंत्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या गोलाकार नळीतून प्रेस होऊन कांडी कोळसा बाहेर येतो. मानके
——————- 
क्षमता +60-65 कि./ता. 
रूपांतरण क्षमता +85 टक्के 
मजूर +2 
——————

चूल :

तयार झालेला कांडीकोळसा हा आपण चुलीत जाळू शकतो; परंतु तो एकूण क्षमतेने जाळावा व जास्त उष्णता प्राप्त करून घेण्यासाठी विशिष्ट चूल तयार करण्यात आली आहे. या चुलीमध्ये दोन जाळ्या बसवलेल्या असून, त्या जाळ्यांमध्ये हा कोळसा भरतात. या चुलीखाली कागद पेटवून ठेवतात. त्यामुळे कोळसा पेट घेतो. कोळसा पेटल्यावर लाल निळसर रंगाची ज्योत मिळते. चार माणसांचा स्वयंपाक बनविण्यासाठी सरासरी 400 ते 500 ग्रॅम कोळसा लागतो. 
—————— 
एकूण आकारमान मि.मी. +230 x 145 
वजन +2 कि.ग्रॅ. 
क्षमता +400-500 ग्रॅम 
कार्यक्षमता +23-25 टक्के 
———————

फायदे :

1) पऱ्हाट्यांची योग्यरीत्या विल्हेवाट लावता येते. 
2) कापसाच्या पऱ्हाट्या जाळल्याने होणारे वायूप्रदूषण कमी करता येते. 
3) स्वस्त, सोपे आणि पर्यावरणासाठी हानिकारक नसलेले जैविक इंधन ग्रामीण भागात सहज तयार करता येते. 
4) ग्रामीण भागात रोजगाराची संधी. 
———————

काडीकचऱ्याची प्रतिवर्षी मोसमी उपलब्धता :

पीक +जानेवारी +फेब्रुवारी +मार्च +एप्रिल +मे +जून +जुलै +ऑगस्ट +सप्टेंबर +ऑक्‍टोबर +नोव्हेंबर +डिसेंबर 
मका 
कापूस 
भात 
भुईमुगाची टरफले 
तूर 
तीळ

पारंपरिक दुग्धपदार्थ
पारंपरिक दुग्धपदार्थ

वेगवेगळ्या राज्यातील अनेक मिठाया, उदा.- खवा जिलबी, पयासम, कुल्फी, पंतुआ, लालमोहन, कलाकंद अजूनही अनेक भागांतील लोकांना माहीत नाहीत. असे पदार्थ जेथे प्रचलित नाहीत, तेथे “नवीन’ पदार्थ म्हणून विकता येतील किंवा या पदार्थांत स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करून एखादा वेगळा पदार्थ ग्राहकांना देता येईल. तसेच चांगले, पौष्टिक, पारंपरिक दुग्धपदार्थ टिकून राहतील.

भारतातील अनेक राज्यांत विविध भागांत दुधापासूनच्या अनेक प्रकारच्या मिठाई प्रसिद्ध आहेत. या काही मिठाई त्या त्या भागात प्रसिद्ध असून, त्या संपूर्ण भारतात क्वचितच लोकप्रिय आहेत. हा एक मोठा पारंपरिक खजिनाच आपल्या जवळ आहे. अशा काही मिठाया, उदा. दक्षिण भारतातले पयासम (त्याचे प्रकार उदा. पलाड पयासम, खसखस पयासम, विविध डाळींपासूनचे पयासम), दहीभात, कढी, कलान इत्यादी पदार्थ. उत्तर भारतातील पूर्व राज्यांतील अनेक मिठाया, मिष्टी दही किंवा छन्नापासून बनविण्यात येणारा राजभोग, चमचम, संदेश, छन्ना मुरकी, खीरमोहन इत्यादी मिठाया अजूनही अनेक भागांतील लोकांना माहीत नाहीत. तसेच गुलाबजामूनसारखेच असणारे, परंतु थोडे वेगळे प्रकार उदा. पंतुआ, लालमोहन, कालाजामून, खवा जिलबी, छन्ना जिलेबी, छन्नाबारा, सीताभोग इत्यादी पदार्थ, ओडिशात प्रचलित असलेला छन्ना पोडो, कर्नाटकात खव्यासारखाच, पण थोडा वेगळा पदार्थ कुंदा, इत्यादी अनेक दुग्धपदार्थांची तोंडओळख होणे गरजेचे आहे. वरील सर्व पदार्थ जेथे प्रचलित नाहीत, तेथे “नवीन’ पदार्थ म्हणून विकता येतील किंवा वरील पदार्थांत स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करून एखादा वेगळा पदार्थ ग्राहकांना देता येईल. असे झाल्यास अनेक प्रकारचे वैविध्य जपता येईल व चांगले, पौष्टिक, पारंपरिक दुग्धपदार्थ टिकून राहतील.

खवा जिलेबी

जिलेबी हा सर्व स्तरांतील लोकांना ज्ञात असलेला, वेगवेगळ्या प्रसंगी खाल्ला जाणारा पदार्थ आहे. कमी किमतीतील गोड, खुसखुशीत अंगबांधणी असलेला पदार्थ बहुतांशी सगळ्यांना आवडतो. खवा जिलेबी महाराष्ट्रातील अनेक शहरांत बनवली जाते. दोन किंवा चार वेटोळे असलेली, तपकिरी रंगाची, (किंचित) ओलसर अशी असते.

 • खवा जिलेबीसाठी खवा थोडा ओलसर करून घेतात.
 • त्यात कधी कधी थोडे तूप घालून खवा आणखी मऊ करून घेतात.
 • खवा जिलेबीसाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घट्ट, सैलसर मिश्रण यासाठी खवा, अरारूट पावडर आणि टोकीर पावडर घेऊन वरील मिश्रण बनवतात.
 • काही हलवाई थोडे दही आणि साखरही टाकतात. खवा हा मुख्य कच्चा माल म्हणून व अरारूट पावडर इतर घटकांना बांधून ठेवणारा पदार्थ म्हणून, तर टोकीर पावडर साखरेचा पाक जिलबीमध्ये धरून ठेवण्यास मदत करतो.

आर्द्रता ः 17.46 – 34.04%
फॅट ः 9.86 – 18.36%
प्रथिने ः 5.50 – 9.76%
लॅक्‍टोज ः 10.56 – 13.9%
(दुधातील साखर)
सुक्रोज ः 18.56 – 27.4%

कृती :

खवा एकजीव करून मऊ करून घेणे
थोडे तूप घालून खवा मऊ करून घेणे
अरारूट पावडर टाकणे
मळणे
टोकीर पावडर पेस्ट करून टाकणे
मळणे, एकत्र करणे, ——–घट्ट, सैलसर मिश्रण तयार करणे
छिद्र असलेल्या कापडातून जिलेबी मिश्रण तुपात तळण्यासाठी सोडणे
साखरेच्या पाकात जिलेबी टाकणे

पयासम :

 • दक्षिण भारतातील हा पारंपरिक दुग्धपदार्थ असून, तो लग्न, सण, विविध समारंभांदरम्यान तयार केला जात असतो.
 • बनवण्याच्या पारंपरिक पद्धतीनुसार, भागानुसार पयासमचे बरेच प्रकार आहेत. त्यामुळे यातील घटकांच्या प्रमाणात खूप तफावत आहे. एकूण घनता 30.9 ते 51.9 टक्के इतकी, तर सुक्रोज 17.7 ते 32 टक्के आढळते.
 • पयासम 25-30 अंश सेल्सिअस तापमानास एक ते दोन दिवसच टिकू शकते.
 • पाश्‍चराईझ केलेले टोन्ड दुधामध्ये (तीन टक्के फॅट आणि आठ टक्के एस.एन.एफ.) साखर टाकून आटवून घेतले जाते.
 • तांदळापासून बनविलेले लहान तुकडे (फ्लेक्‍स) 90 अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात दहा मिनिटे ठेवून नंतर धुऊन घेतात. गरम करून पाऊचमध्ये आटविलेल्या दुधासकट भरतात.

कुल्फी :

कुल्फी हा दुग्धपदार्थ उन्हाळ्यात सर्व स्तरांतील लोकांमध्ये आवडता आहे. उन्हाळ्यात कुल्फीचा खप मोठ्या प्रमाणात वाढतो. काही प्रेक्षणीय स्थळांवर कुल्फीला वर्षभर मागणी असते.

कृती :

दूध (चार टक्के फॅट आणि 20 टक्के एस.एन.एफ.)
साखर टाकणे (दुधाच्या सहा टक्के)
स्टॅबिलायझर आणि इमल्सिफायर (0.5 टक्का) टाकणे
पाश्‍चराईझ करणे (80 अंश से.तापमानाला 25 सेकंदांपेक्षा जास्त वेळ)
आटवणे (50 टक्के)
थंड करणे आणि एजिंग करणे (दोन ते चार तास, 15 ते 20 अंश से.)
रंग व सुगंध टाकणे (कोनमध्ये भरतेवेळी)
कोन भरणे व गव्हाच्या पिठाने बंद करणे
फ्रीजिंग आणि हार्डनिंग करणे (4ः1 या प्रमाणात बर्फ व मिठाचे मिश्रण)
कुल्फी तयार होते

कुल्फीमध्ये काजू, बदामाचे काप, रंग, सुगंध टाकून त्याची आकर्षकता वाढवता येईल. फळांचा गर, रसाचादेखील वापर करता येईल.

पंतुआ :

 • मूळचा भारताच्या पूर्व भागातून आलेला हा पदार्थ आहे. पंतुआ ही मिठाई जवळपास गुलाबजामून सारखीच बनवतात.
 • पंतुआसाठी खवा (40 टक्के आर्द्रता) आणि छन्ना (58 टक्के आर्द्रता), मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र करून कणीक बनवतात. या पुढील कृती गुलाबजामून बनवताना करतात तशीच करतात.
 • पंतुआ बनवताना दुसऱ्या पद्धतीत छन्ना (50 टक्के), खवा (40 टक्के), मैदा (तीन टक्के), अरारूट पावडर (तीन टक्के), रवा (तीन टक्के), पिठीसाखर (0.6 टक्का) आणि बेकिंग पावडर (0.3 टक्का) घेऊन, एकत्र करून मळून कणीक बनवतात.
 • या कणकेपासून 12 ग्रॅम वजनाचे गोळे (गोलाकार) बनवून तुपातून तळून घेतात. जेव्हा गोळे तांबड्या रंगाचे होतात, त्यानंतर हे गोळे साखरेच्या पाकात (60 अंश से.) टाकतात.
 • पंतुआ या मिठाईची अंगबांधणी ही गुलाबजामूनपेक्षा मऊ असते. खव्याच्या जागी मऊ छन्ना टाकल्यामुळे पंतुआची अंगबांधणी मऊ होते.

लालमोहन :

 • गुलाबजामूनसारखाच हा पदार्थ आहे; परंतु हा खव्यापासून न बनवता छन्नापासून बनवतात.
 • लालमोहन या मिठाईचा रंग हा हलकासा तांबूस असतो.
 • या मिठाईत छन्ना, दोन-तीन टक्के गव्हाच्या पिठाबरोबर मळून घेऊन कणीक बनवतात.
 • कणकेपासून लहान गोळे बनवून तुपातून तळून घेतात. हलकासा तांबूस रंग येईपर्यंत लालमोहन तळतात.
 • यानंतर हे गोळे 60 टक्के साखरेच्या पाकात काही तास मुरण्यासाठी ठेवून देतात.

पंतुआतील घटक :

एकूण घनता – 59.7 टक्के
फॅट – 15.5 टक्के
प्रथिने – 8.7 टक्के
ऍश (राख) – 0.67 टक्के
सुक्रोज – 27.1

कलाकंद :

किंचित गोड आंबट अशी मिश्रित चव असणारा अस्सल देशी पदार्थ आजही ग्रामीण भागात आपला प्रभाव टिकवून आहे.
दूध उकळावे
दूध जवळपास अर्धे आटवल्यानंतर दुधात सायट्रिक ऍसिड टाकणे (0.1 टक्का)
दूध कढईत ढवळणे
दूध थोड्या प्रमाणात साकळेल
दूध कढईला लागू न देता उकळणे
साखर टाकणे (दुधाच्या सात टक्के)
दाणेदार खव्यासारखे घट्ट ओलसर अंगबांधणी झाल्यावर गॅस बंद करावा
थोडे तूप पसरवलेल्या ताटात कलाकंद पसरवून घ्यावे
काजू, बदाम काप, चांदीचा वर्ख लावणे

(टीप : दूध उकळल्यानंतर सायट्रिक ऍसिड टाकल्यास शेवटी कलाकंद ओलसर दिसते. म्हणून दूध थोडे आटविल्यानंतर सायट्रिक ऍसिड टाकल्यास कलाकंदची अंगबांधणी उत्तम व चांगली होते.)

संपर्क: डॉ. धीरज कंखरे, 9405794668
(लेखक कृषी महाविद्यालय, धुळे येथे कार्यरत आहेत.)

केळी-खोडापासून धागे
केळी-खोडापासून धागे

केळीचा घड काढल्यानंतर केळीच्या खोडापासून धागानिर्मिती करणे शक्‍य आहे. त्यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळू शकेल.

केळीचे खोड लवकर कुजत नसल्यामुळे आंतरमशागतीसाठी अडचणी येतात. मात्र, खोडापासून धागानिर्मितीमुळे ही अडचण दूर होण्यासोबत उत्पन्नही मिळू शकते.

केळी खोडापासून धागानिर्मितीसाठी आवश्‍यक बाबी

केळी खोडापासून धागा काढणारे यंत्र

कापलेल्या केळीझाडांचे खोड

तीन पुरुष मजूर व २ स्त्री मजूर प्रतिदिवस

विद्युत पुरवठा

केळी खोडापासून धागानिर्मितीची प्रक्रिया

केळी खोडापासून उत्कृष्ट प्रतीचा धागा काढण्यासाठी लाल केळी, नेंद्रन, रस्थाली ह्या जातींचा वापर करतात. महाराष्ट्रात लागवडीखाली असलेल्या अर्धापुरी, ग्रॅन्ड नैन, श्रीमंती, महालक्ष्मी ह्या जातींपासूनही चांगल्या प्रतीचा धागा काढता येतो. धागा काढण्यासाठी फक्त खोडाचाच वापर करता येतो असे नाही, तर घडाच्या दांड्याचा तसेच पानाच्या शिरेचाही करता येतो. परंतु, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर धागा फक्त खोडापासून बनू शकतो. धागा काढण्यासाठी खोडाचा वापर झाड कापल्यापासून चोवीस तासांच्या आत करावा.

धागा काढणीसाठी तीन माणसांची गरज असते. एक माणूस खोड उभे चिरून त्याचे चार तुकडे करतो. त्यासाठी गुजरात येथील नवसारी कृषी विद्यापीठामध्ये केळीचे खोड कापणी यंत्र तयार केले आहे. हे यंत्र खोडाचे दोन ते चार उभे काप करते. दुसरी व्यक्ती प्रत्यक्ष यंत्रावर धागा काढणीचे काम करते. तिसरी व्यक्ती काढलेला धागा पिळण्याची प्रक्रिया करून धागा दोरीवर वाळत घालते. तसेच प्रक्रियेदरम्यान निघालेले पाणी व लगदा वेगळे करते. दोन स्त्री मजुरांचा वापर सहाय्यक म्हणून होतो.

सुकवलेला धागा मोठ्या दाताच्या फणीने विंचरून घेतल्यास धाग्याची प्रत चांगली मिळते. कुशल कारागीराद्वारे आठ तासांमध्ये २० ते २५ किलो धागा मिळू शकतो. या यंत्राची किंमत अश्‍वशक्तीनुसार ७० हजार ते १ लाख ७५ हजार रुपये अशी असते. केळी खोडापासून काढलेला धागा एकूण ३ (पहिली, दुसरी व तिसरी) प्रतीत विभागला जातो. यंत्रामधून काढलेले सूत सहसा तिसऱ्या प्रतवारीचे असते. त्याला विंचरून घेतल्यास ते दुसऱ्या प्रतिपर्यंत जाऊ शकते. त्यानंतर लाकडी पाटीने त्यास पॉलिश करून पांढरे शुभ्र झाल्यास पहिल्या प्रतिपर्यंत जाऊ शकते.

धाग्याचा दर

पांढरा शुभ्र धागा – १०० ते १२० प्रतिकिलो

सिल्व्हर शाईन धागा – ८० ते १०० प्रतिकिलो

पिग्मेंट युक्त धागा – ८० रु. किलो

धाग्याची उपयुक्तता

धाग्यापासून बारीक दोरी, दोरखंड, पिशव्या, पाय पुसणी, चटई, आकर्षक टोप्या, कापड, साड्या, शोभेच्या वस्तू, क्राफ्ट पेपर, टिश्‍यू पेपर, फिल्टर पेपर, पृष्ठ, फाईलसाठी जाड कागद, सुटकेस, डिनरसेट, बुटांचे सोल, चप्पल इत्यादी वस्तू बनविता येतात.

केळी खोडापासून धागा निर्मितीचे फायदे

केळी बागेतील न कुजणारे अवशेष जाळले जातात. त्यामुळे पर्यावरणाच्या ऱ्हासासोबतच जमिनीतील उपयुक्त जिवाणूही नष्ट होतात. त्याचा फटका उत्पादकतेला बसतो.

बागेच्या स्वच्छतेसाठी लागणारी अनुत्पादक मजुरी वाचते.

दुष्काळामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे घडनिर्मिती न झाल्यास उर्वरीत उभ्या खोडापासून काही प्रमाणात आर्थिक लाभ होऊ शकतो.

केळी खोडापासून धागेनिर्मिती यंत्र व कार्यपद्धती

या यंत्रात दोन रिजिड पाइप बसवले असून, गायडिंग रोलर असतात. या रोलरमुळे केळी खोड आत सरकते. खोडाच्या आकारमानानुसार दोन रिजिड पाइपमधील अंतर कमी-जास्त करता येते. रोलर फिरविण्यासाठी बेल्ट पुली यंत्रणा बसवलेली असते. यासाठी एक एचपी क्षमतेची सिंगल फेज विद्युत मोटर पुरेशी होते.

यंत्राच्या दुसऱ्या बाजूने निघालेले धागे पिळून त्यातील पाणी बाहेर काढले जाते. धागे तारांवर एक दिवस वाळवतात. कोरड्या धाग्यांमध्ये विशिष्ठ प्रकारची फणी फिरवून ते एकमेकांपासून वेगळे करतात.

शेतातून खोडाची वाहतूक, उभे चिरून त्याचे चार तुकडे करणे, यंत्रात भरणे व धागे पिळून काढणे या कामांसाठी पुरुष मजूर लागतात. धाग्यांतून फणी फिरविणे, ते वाळत घालणे या कामांसाठी महिला मजूर लागतात.

केळीपासून स्वादिष्ट पदार्थ
केळीपासून स्वादिष्ट पदार्थ

केळी हे शक्तिवर्धक व स्वस्त फळ आहे. त्यामध्ये साखर, प्रथिने, स्निग्धांशाचे प्रमाण जास्त आहे. चुना, लोह, स्फुरद ही खनिजे आणि क व अ ही जीवनसत्चे केळीमध्ये आहेत. केळी हे पचायला सोपे फळ असून त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. केळीच्या फळाचे अनेक टिकाऊ पदार्थ व लगेच खाण्याचे पदार्थ तयार होऊ शकतात. हे पदार्थ

विविध घरगुती पदार्थ

चिप्प्स

पूर्ण वाढ झालेली १० टक्के परिपक अशी केळी निवडावीत. ही केळी स्वच्छ पाण्याने धुऊन किंवा ओल्या स्वच्छ फडक्याने पुसून घ्यावीत. स्टीलच्या चाकूने फळांची साल काढावी. केळी सोलण्याचे मशीन विकसित करण्यात आले आहे. या मशीनची ताशी ४५० (८० टक्के परिपक्र असलेली) केळी एका दिवसात सोलण्याची क्षमता आहे. मशीनच्या सहाय्याने ०.३ ते ०.५ मि.मी. जाडीच्या चकत्या कापान्यात. मशीन उपलब्ध नसल्यास स्टीलच्या चाकूने गोल, पातळ काप करावेत. साध्या चाकूने काप केल्यास ते काळे पडतात. काप काळसर पडून नयेत व ते पांढरेशुभ्र होण्यासाठी ०.१ टका सायट्रिक अॅसिड किंवा पोटेंशियम मेटबाय सल्फाइडच्या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुड़नून ठेवावेत.

नंतर चकत्या उकळत्या पाण्थात ४ ते ५ मिनिटे थंड करून प्रतिकेिली चकत्यास ४ ग्रॅम या प्रमाणात गंधक घेऊन त्याची धुरी द्याची. या चकत्या उन्हात किंवा ड्रायरमध्ये सुकवाव्यात. जर ड्रायरमध्ये चकत्या सुकवायच्या असतील, तर ड्रायरमधील तापमान ५० ते ५५ अंश एवढे ठेवावे. चकत्या ह्याताने दाबल्या असता मोडल्यास त्या तयार झाल्या आहेत, असे समजाचे व सुकविण्याचे काम थांबवावे. विक्रीसाठी केिंचा जास्त दिवस टिकविण्यासाठी है वेफर्स हाथ डेन्सिटी पॉलिथीन पिशव्यात घालून हवाबंद डब्यात साठवाव्यात.

भुकटी

केळीच्या भुकटीला परदेशात भरपूर मागणी आहे. यापासून आपणास परकीय चलनही मिळू शकते. यासाठी पूर्ण पिकलेली केळी वापरतात. प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुऊन घेतात. केळीची साल काढून पल्पर यंत्राच्या सहाय्याने लगदा करून घेतात. केळीच्या गराच्या लगद्याची भुकटी स्प्रे ड्रायर किंवा ड्रम ड्रायर किंचा फोम मेंट ड्रायरच्या सहाय्याने करतात. तयार झालेली भुकटी निर्जतुक हवाबंद डब्यात साठवून कोरड्या व थंड जागी साठवितात. त्याचा वापर लहान मुलांच्या आहारात केला जातो. बिस्किटे व बेकरीमध्ये तसेच आइस्क्रोममध्ये केळीच्या भुकटीचा वापर केला जातो.

पीठ

केळीचे पीठ तयार करण्यासाठी कच्ची केळी वापरली जातात.

एक केिलो पीठ तयार करण्यासाठी साधारणपणे साडेतीन केिली गर लागतो. यासाठी प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुऊन, साल काढून त्याच्या चकत्या किंवा बारीक तुकडे करून सुकवतात. सुकविण्यासाठी सूर्याच्या उष्णतेचा किंवा वाळवणी यंत्राचा वापर करतात. केळीच्या चकत्या वाळवून त्याच्यातील पाण्याचे प्रमाण आठ टक्क्यांपेक्षाही कमी आणले जाते. नंतर या चकत्यांपासून दळणी यंत्राचा वापर करून पीठ तयार करतात. हे पीठ जर काळे पडत असेल, तर पोटॅशिअम मेटाबाथसल्फाईडच्या 0.०५ तें 0.0६ टका तीव्रतेच्या द्रावणात ३० ते ४५ मिनिटे केळ्याच्या चकत्या बुडवून वाळवतात व नंतर पीठ तयार करतात. तयार झालेले पीठ प्लॅस्टिकच्या पिशव्यांत भरून कोरड्या व थंड जागी साठवितात. केळीच्या पिठामध्ये ७o ते ८० टक्के स्टार्च असतें. त्याचप्रमाणे शैव, चकली, गुलाबजाम इत्यादी उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.

जेली

५० टक्के पक्र फळाचा गर पाण्यात एकजीव करून १५ ते २0 मिनिटे गरम करावा. गरगाळून घ्यावा. गाळलेल्या गरात समप्रमाणात साखर, ०.५ टक्के सायट्रेिक आम्ल व पेक्टीन टाकून उकळी येईपर्यंत शिजवावे. या वेळी मिश्रणाचे तापमान साधारणपणे १०४ अंश से.असते. तयार जेलीमध्ये एकूण घन पदार्थाचे प्रमाण ७० डिग्री ब्रिक्स इतके असते. जेली गरम असतानाच निर्जतुक बाटल्यांमध्ये भरावी. पेरूच्या जेलीपेक्षा केळीची जेली पारदर्शक व स्वादिष्ट असते.

जॅम

कोणत्याही जातीच्या पूर्ण पिकलेल्या केळीचा वापर जॅम तयार करण्यासाठी करता येतो. गराच्या वजनाएवढी साखर मिसळून गर मंद अग्रीवर शिजवावा. साखर पूर्णपणे विरघळल्यावर ०.५ टक्के पेक्टीन, ०.३ टक्के सायट्रेिक आम्ल व रंग टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. मिश्रणाचा ब्रिक्स ६८ ते ७0 डिग्री झाल्यावर जॅम तयार झाला, असे समजावे. तयार जॅम कोरड्या व निर्जतुक बाटल्यांमध्ये भरावा. ह्या पदार्थ एक वर्षापर्यंत टिकू शकतो.

बनाना प्युरी

प्युरी म्हणजे पिकलेल्या ताज्या फळातील गर, रुस किंवा लगद्यावर विशिष्ट प्रक्रिया करुन सॉसप्रमाणे त्याचे स्वरुप बदलवले जाते. त्यामध्ये ताज्या फळांचा मूळ स्वाद, रंग, सुगंध कायम राहील, याची दक्षता घेतली जाते. प्युरीचा वापर मिल्कशेक, आइस्क्रीम, फळांचा रस इत्यादी विविध पदार्थात केला जातो. पिकलेल्या केळ्याचा गर पल्पर मशीनमधून काढून लगदा हवाविरहित करतात व निर्जतुकीकरण करून हवाबंद डब्यात भरुन ठेवतात. गर टिकविण्यासाठी त्यात कोणत्याही प्रकारच्या रसायनाचा अथवा साखरेचा वापर केला जात नाही. हे निर्याताभिमुख उत्पादन एका वर्षापर्यंत साठवून ठेवता येते.

कच्च्या केळीचे वडे

वडे बनविण्यासाठी ४-५ कची केळी, ४ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, मोहरी, मीठ, तेल लागते. वडे बनविताना प्रथम केळी सोलून लहान तुकडे करून पाणी न घालता वाफवून घेऊन त्यामध्ये लगदा परतावा. गार झाल्यावर हिरव्या मिरच्या व आले जाडसर वाटून घाला. बटाटेवडे बनविताना डाळीचे पीठ भिजवतो त्याप्रमाणे भिजवा. केळाच्या मिश्रणाचे वडे बनवून बेसनात बुडवून तळून घ्या. तयार झालेले वडे खोब-याच्या चटणीबरोबर खाण्यास वापरावे.

ज्यूस

या प्रक्रियेत पूर्ण पक्र केळ्याचा पल्पर मशीनचे गर काढतात. गर घट्ट असल्याने सर्वसाधारण स्वरुपात रस काढता येत नाही. त्याकरिता पाच मि.लि. प्रतिकिलो या प्रमाणात पेक्टीनेज एन्झाइम मिसळून दोन तास ठेवल्यानंतर स्वच्छ रस सहज मिळतो. या रसाची गोडी २४ ते २६ डिग्री ब्रिक्स असते. या रसात दीड पट पाणी मिसळून, आवश्यकतेनुसार सायट्रिक आम्ल टाकून आरटीएस बनविता येते. त्याची गोडी १५ डिग्री ब्रिक्स व आम्लता o.३ टक्के असते. हे पेय ८५ अंश से. तापमानाला पाश्चराइज्ड करून निर्जतुक बाटल्यांमध्ये भरावे. हा पदार्थ सहा महिन्यांपर्यंत टिकू शकतो. केळीपासून ८८ टक्के रसाचे प्रमाण मिळते.

केळ्याचे सुके अंजीर

पूर्ण पिकलेली केळी सोलून, पोटॅशियम मेटाबायसल्फाईडच्या १ टक्के द्रावणात बुडवून घ्या. नंतर त्याचे २.५ मि.मी. काप बनवून उन्हात वाळवा किंवा ५० अंश से. तापमानाला २४ तास ओव्हनमध्ये किंवा ड्रायरमध्ये ठेवून वाळवा. पॉलिथीनच्या पेिशव्यांमध्ये हवाबंद करून ठेवल्यास ४ ते ६ महिने सहज टिकतात. सुक्या अंजिराप्रमाणे ही अंजीर अत्यंत चविष्ट लागतात.

केळी बिस्कीट

केळी पिठात ३० टक्के मैदा मिसळून त्यामध्ये साखर, वनस्पती, तूप, बेकिंग पावडर, दूध पावडर, इसेन्स गरजेप्रमाणे मिसळ. योग्य प्रमाणात पाणी घेऊन त्याचा लगदा करा. हा लगदा साच्यात टाकून ओव्हनमध्ये ठेवून द्या. ही बिस्किटे अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असतात.

व्हिनेगर

अतिपक्र व खाण्यास योग्य नसलेल्या केळीपासून व्हिनेगर तयार करता येतो. केळीचा गर पाण्यात मिसळून घ्यावा. त्यात यीस्ट टाकून ४८ तास मिश्रण स्थिर ठेवा. त्यात माल्ट व्हिनेगरचे मुरवण २o ते ३o मि.लि. प्रति लिटर या प्रमाणात मिसळावे. हे मिश्रण ३o अंश से.तापमानात आांबवण्यास ठेवावे. ही रासायनिक किंवा (अॅसिडीफिकेशन) दोन ते तीन अठवड्यात पूर्ण होते. नंतर सेंट्रेिफ्यूज करून व्हिनेगर वेगळे करतात व निर्जतुक केलेल्या स्वच्छ बाटल्यांत भरून हवाबंद साठवितात

कच्च्या केळीची भाजी

भाजीची ३ कची केळी, ३-४ हिरव्या मिरच्या, १ नारळ, ५-६ छोटे कांदे, १ चमचा जिरे, २ कडीलिंबाचे डहाळे, १ डाव तेल, चवीनुसार मीठ केळीची साले काढून प्रत्येक केळ्याचे १६ तुकडे करावेत व ते थोड्या पाण्यात मीठ घालून त्यात केळीच्या फोडी टाकून मंदाग्रीवर त्या शिजवून घ्याव्यात. सर्व पाणी आटून केळ्याच्या फोडी कोरड्या कराव्यात. १/२ नारळ व जिरे बारीक वाटून केळांवर घालावे. सतत हळद, मोहरी घालून फोडणी करावी. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा गुलाबी रंगावर आला, की त्यात खोबरे खवून घालावे व जरा परतावे. त्यात शिजलेली केळी टाकून पुन्हा जरा परतावे व उतरवावे. आता ही भाजी तयार झाली.

केळीचे आणखी काही रुचकर पदार्थ

खमंग बनाना शेव

साहित्य : पाव पेला तांदळाचे पीठ, अर्धा पेला बेसन, १ कचे वाफवलेले केळे, २ चमचे आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा बेकिंग पावडर, मीठ, तेल. कृती : तांदळाचे पीठ, बेसन व सोडा एकत्र चाळणीने चाळून घ्या. त्यात उकडलेले केळे सोलून मिसळा. आले, लसूण-मिरची पेस्ट, मीठ व एक चमचा तेल टाकून मिसळा. कढईत तेल गरम करा. शेव गाळण्याच्या यंत्राने बारीक शेव पाडून तळा.

केळ्याचे गुलाबजाम

साहित्य : एक पेला रवा, अर्धा पेला दूध, २ लहान चमचे पनीर, १ पिकलेले केळे, १ पेला साखर, थोडे, तेल कृती : एक चमचा दुधात केशर भिजवा, रवा परतून घ्या. एका डिशमध्ये पनीर, रवा दूध व केळे घालून मळून घ्या. लिंबाच्या आकाराचे गोळे बनवा. कढईत तेल गरम करून सोनेरी रंगावर तळून घ्या. एका भांड्यात १ पेला साखर व १ पेला पाणी उकळून पाक तयार करा. पाकात केशर घाला. कळ्याच गुलाबजाम पाकात घालून लगेच खाण्यास द्या.

केळ्याची बाकरवडी साहित्य

६ कची केळी, २ लहान चमचे आले मिरची पेस्ट, एका लिंबाचा रस, २ पेले मैदा, २ लहान चमचे चिरलेली कोथिंबीर, २ चमचे तेल, चवीला मीठ, तळण्यासाठी तेल. कृती : केळी वाफवून घ्या. त्यानंतर ती सोलून कुस्करा. त्यात आले मिरची पेस्ट लिंबाचा रस मीठ, कोथिंबीर घालून मळून घ्या व दोन भाग करा. मैद्यात मीठ व तेल मिसळून व मळून घ्या. याचेही दोन भाग करा, एक भाग चपातीप्रमाणे लाटा व केळ्याचे मिश्रण त्यावर पसरून गुंडाळी करा व कडा बंद करा. आता या रोलचे स्लाइस करा व गरम तेलात तळून घ्या.

स्त्रोत – कृषी विभाग महाराष्ट्र शासन

कैरीपासून चटणी, आमचूर, मुरांबा
कैरीपासून चटणी, आमचूर, मुरांबा

चटणी

कैरीची गोड चटणी करण्यासाठी कैरी स्वच्छ धुऊन त्याची साल काढावी.कैरीचा गर तुकडे करून किंवा किसून काढावा किंवा कैरी शिजवून त्यांचा गर काढावा.कैरीच्या एक किलो गराची चटणी करताना एक किलो साखर, 20 ग्रॅम मीठ, 90 मि.लि. व्हिनेगर मिसळावे.एका मलमलच्या कापडात 30 ग्रॅम वेलची + दालचिनी, 15 ग्रॅम मिरची पूड, 15 ग्रॅम आले, 60 ग्रॅम बारीक कांदा, 15 ग्रॅम लसूण बांधून ही पुरचुंडी गर शिजवताना त्यात सोडावी. साधारणपणे 20 मिनिटांनी मसाल्याच्या पदार्थाची पुरचुंडी पिळून बाहेर काढून चोथा फेकून द्यावा. हे मिश्रण शिजवून जॅम सारखे घट्ट झाल्यानंतर गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या बरणीमध्ये भरून ठेवावे.

आमचूर

 • ज्या कैऱ्या कमी प्रतीच्या आहेत किंवा मार लागलेल्या आहेत, वादळात पडलेल्या आहेत किंवा पिकल्यानंतर आंब्याची प्रत चांगली येणार नसेल, तसेच गावरान व पूर्ण वाढ झालेल्या आंबट कैऱ्या आमचूर बनविण्यासाठी निवडाव्यात.
 • प्रथम कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुऊन तीक्ष्ण चाकूच्या साहाय्याने गराच्या फोडी कराव्यात. या फोडी नंतर उन्हात किंवा वाळवणी यंत्रात सुकवाव्यात. त्या नंतर ग्राइंडर मशिनमधून त्याची पावडर करावी.

स्क्वॅश

 • निवडक कैऱ्या शिजवाव्यात. त्याचा गर काढावा. कैरीचा गर 25 टक्के (250 ग्रॅम) साखर 45 टक्के (275 ते 300 ग्रॅम), सायट्रिक आम्ल 1.2 टक्का (चार ते पाच ग्रॅम) व पाणी 30 टक्के (300 मि.लि.) एकत्र करावे.
 • स्क्वॅश तयार झाल्यानंतर एक मि.मी.च्या चाळणीतून गाळावा. त्यामध्ये 610 मिलिग्रॅम पोटॅशिअम मेटाबायसल्फाईट प्रति किलो स्क्वॅश या प्रमाणात मिसळावे.
 • स्क्वॅश भरलेल्या बाटल्यांचे उकळत्या पाण्यात (100 अंश सेल्सिअस तापमान) 30 मिनिटे पाश्‍चरीकरण करावे. नंतर बाटल्या बंद करून थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात. स्क्वॅशचा स्वाद घेण्यापूर्वी त्यात 1ः3 प्रमाणात पाणी मिसळावे.

मुरांबा

 • मुरांबा तयार करण्यासाठी कैरी मगसदार, कमी रेषा असलेली गोडसर, परंतु अपक्व असावी.
 • प्रथम कैरीची साल काढावी. त्यानंतर आवडीप्रमाणे फोडी किंवा किस (एक किलो) तयार करावा. हा कीस वाफवून घ्यावा.
 • फोडीच्या वजनाच्या प्रमाणात साखर (एक किलो) व पाणी (1.5 लिटर) घेऊन साखरेचा (40 अंश ब्रिक्‍स)पर्यंत पाक करावा.
 • पाक थंड करण्यासाठी ठेवावा नंतर त्यात वाफवलेल्या आंब्याच्या फोडी घालाव्यात. हे मिश्रण एक दिवस तसेच ठेवावे.
 • दुसऱ्या दिवशी पाकातील फोडी वेगळ्या काढून उरलेल्या पाकातील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण 50 अंश ब्रिक्‍स होईपर्यंत पाक उकळावा. पुन्हा हे मिश्रण एक दिवस तसेच ठेवावे. तिसऱ्या दिवशी पाकातील फोडी वेगळ्या काढून उरलेला पाक 72 अंश ब्रिक्‍स होईपर्यंत उकळावा. थंड झाल्यावर आंब्याच्या फोडी घालाव्यात. तयार मुरांबा काचेच्या बरणीत भरून ठेवावा.

पन्हे

 • पूर्ण वाढ झालेली कैरी चांगली शिजवावी. कैरी थंड झाल्यावर त्याचा गर काढावा. त्यामध्ये पुढील घटक मिसळून पन्हे तयार करावे. एक किलो आंबा पन्हे तयार करण्यासाठी 20 ग्रॅम कैरीचा गर, 150 ते 175 ग्रॅम साखर आणि 625 ते 650 मि.लि. पाणी मिसळावे.
 • हे मिश्रण एक मि.मी.च्या चाळणीतून गाळून घ्यावे. पन्हे जास्त काळ टिकावे म्हणून प्रति किलो पन्हात 140 मिलिग्रॅम पोटॅशियम मेटाबायल्फाईट हे परिरक्षक मिसळावे. हे पन्हे गरम असताना निर्जंतुक केलेल्या बाटल्यांत भरावे.

कु. निवेदिता डावखर – 02132-282080
(लेखिका कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, जि.पुणे येथे गृहविज्ञान विषयतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

द्राक्षापासून बेदाणा
द्राक्षापासून बेदाणा

चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार करावयाचा असेल, तर बेदाणे तयार करतेवेळी एकसारख्या आकाराचे, रंगाचे घड बागेतून तोडावेत. घड काढण्यापूर्वी मण्यामध्ये साखरेची गोडी उतरली आहे याची खात्री करून घ्यावी, कारण चांगल्या प्रतीचा बेदाणा म्हटल्यास त्यात गोडी जास्त असावी लागते. काढलेली द्राक्षे शक्‍यतो सुरवातीला स्वच्छ पाण्यातून काढून घ्यावी. त्यानंतर ही द्राक्षे 25 ग्रॅम पोटॅशिअम कार्बोनेट अधिक 15 मि.लि. ईथाइल ओलिएट (डीपिंग ऑइल) प्रति लिटरच्या द्रावणात दोन ते चार मिनिटे बुडवून ठेवावीत. या द्रावणाचा सामू 11 पर्यंत असावा. तद्‌नंतर द्रावणातून काढलेली द्राक्षे सावलीमध्ये जाळीवर सुकवावीत.

वातावरणातील तापमानानुसार 15 ते 22 दिवसांत चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार होऊ शकतो. चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार करायचा असेल, तर जास्त तापमान (35-40 अंश से.) व कमी आर्द्रता (30 टक्केपेक्षा कमी) असल्यास त्याचे परिणाम चांगले मिळतात. वाऱ्याचा वेग कसा आहे, यावरसुद्धा बेदाण्याची प्रत अवलंबून असते. हवा खेळती असल्यास कमी वेळेत चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार होतो. अधिक माहिती हवी असल्यास तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे.

– 020 – 26914245
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे

डाळ मिल
डाळ मिल

पीकेव्ही मिनी डाळ मिलची क्षमता दर दिवसाला (आठ तास) तुरीकरिता 8 ते 10 क्विंटल (72 टक्के उतारा), मूग- उडिदाकरिता 10 ते 12 क्विंटल (82 टक्के उतारा) अशी आहे. या यंत्रामध्ये भुसा आणि पावडर, चुरी, डाळ, गोटा आणि डाळ अशा चार भागांत यांत्रिकतेने विभाजन करण्याची सोय आहे. यामध्ये तेल तसेच पाण्याच्या प्रक्रियेची सोय आहे. काळ्या ज्वारीला चकाकी आणण्यासाठी, पावसामुळे अंशतः खराब झालेल्या मुगाला स्वच्छ करून चकाकी आणण्याकरिता, गहू स्वच्छ करण्याकरिता पीकेव्ही मिनी डाळ मिलमध्ये लेदर रोलरचा वापर करता येतो.

संपर्क – 0724- 2258462
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

ज्वारीपासून पापड, बिस्किटे
ज्वारीपासून पापड, बिस्किटे

भाकरीतील प्रथिनांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय घटक (रेझिस्टंट स्टार्च), शर्करा आणि खनिजद्रव्ये अधिकतम आढळतात. ज्वारीच्या दाण्यातील गुणप्रत अनेक भौतिक, रासायनिक व प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या बाबीवरती अवलंबून असते. आपल्याकडे प्रामुख्याने ज्वारीचा उपयोग ज्वारीची भाकरी म्हणूनच मोठ्या प्रमाणात करतात. तसेच काही वाणांचा उपयोग लाह्या, हुरडा, पापड, बिस्किटे अशा खाद्य पदार्थांसाठी होऊ शकतो.

ज्वारीचे विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी प्रथम त्याचे बारीक पिठामध्ये रूपांतर केले जाते. ज्वारीच्या दाण्यामध्ये लायसीन हे अमिनो आम्ल अतिशय कमी प्रमाणात असल्यामुळे ज्वारीच्या प्रथिनांची प्रत कमी दर्जाची समजली जाते, तसेच पिठास खरबरीतपणा अधिक (कोर्स) असल्यामुळे लोकांची पसंती कमी असते. या अडचणीवर मात करण्यासाठी, उपलब्ध ज्वारीची उपयोगिता किंवा मूल्यवर्धन वाढविण्यासाठी ज्वारीच्या पिठात ज्वारीचेच माल्ट किंवा आंबविलेले पीठ वापरणे फायद्याचे ठरते.

ज्वारीमध्ये लायसीन आणि मिथिओनाईन ही अत्यावश्‍यक अमिनो आम्ले तसेच ज्वारीच्या पिठाची पौष्टिक मूल्ये ज्वारीला मोड आणून किंवा त्याच्या पिठाचे आंबविणे करून (फर्मिनटेशन) वाढविता येतात. ज्वारी दाणे दहा तास पाण्यात भिजवून नंतर 24 तास मोड येण्यास ठेवले असता चांगले माल्टिंग होते.

ज्वारीच्या पिठामध्ये सोयाबीनचे माल्टयुक्त पीठ, नाचणीचे माल्टयुक्त पीठ मिसळून त्यापासून पदार्थ बनविल्यास मानवी शरीरास आवश्‍यक असणारी सर्व अमिनो आम्ले आणि इतर घटक पदार्थ विपुल प्रमाणात उपलब्ध होतात. मूल्यवर्धन करून तयार केलेले ज्वारीचे पीठ चांगल्या प्रकारे व्हॅक्‍यूम पॅक केले असता त्याची साठवणक्षमता सहा महिन्यांपर्यंत अत्यंत चांगली राहते. अशा पिठापासून आपणास केव्हाही भाकरी, पराठे, थालीपीठ, वडे किंवा इतर पदार्थ तयार करता येतात. अशा प्रकारच्या पिठापासून बनविलेल्या पदार्थांपासून त्वरित ऊर्जा, प्रथिने व इतर जीवनसत्त्वे उपलब्ध होऊन पचनक्रियेस वेळ न लागता शरीरास लवकर उपलब्ध होतात.

हुरडा

रब्बी हंगामात थंडीच्या मोसमात ज्वारीचे दाणे हिरवट, परंतु दुधाळ अवस्थेच्या पुढे जाऊन पक्व होण्याच्या अगोदरच्या अवस्थेत (सॉफ्ट डफ) असतात, त्या वेळेला भाजलेल्या (होरपळलेल्या) अवस्थेत अतिशय चवदार, मऊ व गोडसर लागतात, त्यास ज्वारीचा हुरडा असे म्हणतात. हिरव्या दाण्यांचा हुरडा अतिशय चांगला लागतो, कारण त्या वेळेला त्या दाण्यांमध्ये मुक्त अमिनो आम्ले, साखर, विद्राव्य प्रथिने, जीवनसत्त्वे यांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे असे दाणे गोवऱ्यांच्या उष्णतेवरती भाजले असता दाण्यांतील विविध रासायनिक घटकांची विशिष्ट रासायनिक प्रक्रिया होऊन “कॅरमलायझेशन’मुळे दाण्यांस एक प्रकारची स्वादिष्ट चव प्राप्त होते.

हुरड्यामध्ये लिंबू, मीठ, साखर, तिखट, मसाला यांसारखे पदार्थ वापरून त्याची चव द्विगुणित करता येते. खास हुरड्यासाठी गोडसर, रसाळ आणि भरपूर दाणे असणाऱ्या फुले उत्तरा या वाणाची शिफारस संशोधन केंद्रामार्फत करण्यात आलेली आहे. सध्या ज्वारीच्या हुरड्याची लोकप्रियता वाढत चाललेली आहे.

लाह्या

ज्वारीपासून लाह्या बनविण्यासाठी प्रामुख्याने त्या ज्वारीच्या दाण्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण अधिक असणे गरजेचे आहे. कारण अशा प्रकारचे दाणे अति उच्च तापमानात एकदम गरम केले असता दाण्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते दाण्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे दाण्यातील स्टार्च फुलला जाऊन त्याचा बस्ट होतो व पुढे त्याची लाही तयार होते.

जेवढ्या प्रमाणात स्टार्च दाण्यामध्ये अधिक असेल, त्या प्रमाणात लाहीचे आकारमान होते. त्यासाठी उच्च तापमानाची आवश्‍यकता असते. लाह्यांसाठी वॅक्‌सी ज्वारीच्या वाणाची निवड करावी, कारण त्यापासून मोठ्या आकारमानाच्या पांढऱ्या शुभ्र लाह्या मिळतात. ज्वारीच्या लाह्या सध्या “लोकॅलरी हाय फायबर स्नॅक फूड’ म्हणून लोकप्रिय आहेत. या लाह्या अधिक चवदार होण्यासाठी विविध मसाल्यांचे पदार्थ वापरून चविष्ट लाह्या तयार करणे, तसेच या लाह्या अधिक काळ चांगल्या कुरकुरीत चवदार राहण्यासाठी व्हॅक्‍यूम पॅकेजिंग तंत्राचा वापर करण्याचे प्रयोग चालू आहेत. काही भागामध्ये ज्वारीच्या लाह्यांचे पीठ करून ते ताकाबरोबर खाण्याची प्रथा आहे. मक्‍याच्या लाह्यांप्रमाणेच ज्वारीच्या लाह्या करून वर्षभर विकण्याचा व्यवसाय करणे शक्‍य होऊ शकते

पापड, भातवडी

ज्वारीमधील आहारमूल्यांचा उपयोग मानवी शरीरास होण्यासाठी ज्वारीचे उत्कृष्ट पौष्टिक पापड किंवा भातवडी बाजारात आणणे गरजेचे आहे. ज्वारीच्या माल्टयुक्त पिठापासून, तसेच नाचणीच्या, सोयाबीनच्या माल्टयुक्त पिठापासून पापड किंवा भातवडी तयार केली असता त्यापासून भरपूर प्रमाणात आहारमूल्ये मिळू शकतात. खेडेगावात ज्वारीचे दाणे आंबवून त्यापासून चीक तयार करून त्यामध्ये आवश्‍यकतेनुसार मीठ टाकून शिजवतात आणि नंतर पातळ कापडावर किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर पातळ थर देऊन पापडाच्या आकाराच्या भातवड्या तयार केल्या जातात. या भातवड्या भाजून किंवा तेलात तळून स्नॅक फूड म्हणून वापरल्या जातात. याप्रमाणेच ज्वारीचे पापड तयार करताना पापडखार आणि इतर मसाल्याचे पदार्थ वापरून लहान-मोठ्या आकाराचे पापड तयार करतात. हाय फायबर, लो कॅलरीज, हाय प्रोटिनयुक्त माल्टच्या पापडांचा किंवा भातवड्यांचा आरोग्याच्या दृष्टीने निश्‍चितच चांगला फायदा होऊन त्यास चांगली मागणी मिळू शकेल.

बिस्कीट आणि कुकीज

बिस्कीट आणि कुकीजची निर्मिती प्रामुख्याने गव्हाच्या मैद्यापासून केली जाते; परंतु काही प्रयोगाअंती असे दिसून आले आहे, की मैद्यामध्ये साधारणतः 20 टक्‍क्‍यांपर्यंत आपण ज्वारीचे पीठ वापरून बिस्किटे व कुकीज चांगल्या प्रतीची करू शकतो. मधुमेह पेशंटसाठी हाय फायबर, लो कॅलरीज बिस्कीट किंवा कुकीज बनविण्यासाठी साखरविरहित, क्रीमविरहित, प्रथिनयुक्त असे घटक पदार्थ वापरता येतील, तसेच त्याची पौष्टिक मूल्ये वाढविण्यासाठी नाचणी, सोयाबीन, ज्वारीच्या माल्ट पिठाचा वापर करता येईल. अशा प्रकारच्या बिस्किटांची निर्मिती करून ज्वारीचे मूल्यवर्धित पदार्थांत रूपांतर करता येईल.
ः डॉ. उत्तम चव्हाण, 02426- 243253

'शेतकरी आठवडी बाजार' संकल्पना
'शेतकरी आठवडी बाजार' संकल्पना

प्रस्तावना

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करता यावा याकरिता पुणे शहरामध्ये शेतकरी आठवडी बाजाराची संकल्पना सुरु केली असुन याअंतर्गत पुणे व पिंपरी शहरांमध्ये एकुण 10 ते 12 शेतकरी आठवडी बाजार व राज्यातील प्रमुख शहरांमध्ये 40 शेतकरी आठवडी बाजार पहिल्या टप्प्यामध्ये सुरु करण्याचे नियोजन केले आहे.

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये सन 2006 मध्ये सुधारणा करुन त्यामध्ये खाजगी बाजार, थेट पणन, शेतकरी ग्राहक बाजार व कंत्राटी शेती, इ. पर्याय उपलब्ध करुन शेतकऱ्याला आपला कृषि माल विकण्यासाठीचे विविध पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत. याअंतर्गत राज्यामध्ये खाजगी बाजार व थेट पणन यांचे मोठया प्रमाणात परवाने देण्यात आले आहेत.तथापि, शेतकरी ग्राहक बाजार या कायद्यातील तरतुदीअंतर्गत अद्याप राज्यामध्ये एकही शेतकरी ग्राहक बाजार सुरु करण्यात आलेला नाही.महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील कलम 5 (ड) मध्ये थेट पणन, खाजगी बाजार व शेतकरी ग्राहक बाजार यांची स्थापना करण्याची तरतुद आहे. शेतकरी ग्राहक बाजाराच्या परवान्यासाठी राज्याचे पणन संचालक यांच्याकडी विहित नमुन्यात अर्ज करुन परवानगी घेऊन सदरचे बाजार सुरु करण्याची अधिनियमामध्ये तरतुद आहे. तसेच महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) नियम 1967 मधील नियम 4 (ड) मध्ये शेतकरी ग्राहक बाजाराची स्थापना करण्यासाठी परवाना घेण्याकरिता काही अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत.

अटी व शर्ती

 1. मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या बाजार क्षेत्राच्या आत शेतकरी ग्राहक बाजार स्थापन करता न येणे
 2. शेतकरी ग्राहक बाजार पूर्ण मालकी हक्क असलेल्या किंवा कमीत कमी 30 वर्षांच्या कालावधीकरिता निर्विवाद ताबा धारण करण्यासाठी भाडेपट्टा कराराअन्वये भाडेपट्ट्याने घेतलेल्या किमान एक एकर एवढया जमिनीवर स्थापन करता येईल.
 3. अर्जदाराची जमीन किंवा शहरी एकुण गुंतवणुक 10/- लाख रुपयांपेक्षा कमी नसेल इतकी गुंतवणुक करुन लिलावगृह, निवारा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रसाधनगृह, अंतर्गत रस्ते, इ. पायाभूत सुविधा निर्माण करता येतील.
 4. शेतकरी ग्राहक बाजाराची स्थापना करण्यासाठी परवाना फी रु.10,000/- एवढी असेल.
 5. शेतकरी ग्राहक बाजार स्थापन करण्याच्या परवान्यासाठी अर्ज करताना रु.1/- लाख एवढया किंमतीची बँक हमी मा.संचालक, पणन यांच्याकडे जमा करणे.
 6. शेतकरी ग्राहक बाजारात शेतकऱ्यास एका ग्राहकाला 10 किलोग्रॅमपेक्षा अधिक फळे किंवा भाजीपाला किंवा अन्य नाशवंत कृषि उत्पन्न आणि 50 किलोग्रॅमपेक्षा अधिक अन्नधान्ये किंवा अनाशिवंत कृषि उत्पन्न विकण्यास परवानगी देण्यात येणार नाही.
 7. शेतकरी ग्राहक बाजारातील खरेदीवर नियम 4 (ह) नुसार बाजार फी आकारण्याची तरतुद आहे. तसेच नियम 4 (आय) नुसार सदर बाजार मालकाने शासनाकडे देखरेख शुल्क भरण्याची तरतुद आहे.
 8. शेतकरी ग्राह्क बाजारात परवानाधारक लिलावगृह, छपऱ्या, गोदाम, शीतगृह, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, इ. साठी मुलभूत पायाभूत सोयीसुविधांची उभारणी करता येईल, इ. तरतुदी या कायद्यामध्ये व नियमांमध्ये आहेत.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मालाला अधिकाधिक दर मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील असुन शेतकऱ्यांमध्ये व्यावसायिकता आणण्यासाठी शेतकरी गट, शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करित आहे. या अंतर्गत राज्यात आतापर्यंत सुमारे 550 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झालेल्या असुन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात गट कार्यरत आहेत.सदर गट/ कंपन्या शेतकऱ्यांना उत्पादनाबाबत मार्गदर्शन, आवश्यक निविष्ठांचा पुरवठा आणि उत्पादित कृषि मालाचे विक्री व्यवस्थापन याबाबत कार्यरत आहेत. या गट/कंपन्यांना थेट ग्राहकांना कृषि मालाच्या विक्रीच्या संधी उपलब्ध करुन दिल्यास मध्यस्थांना मिळणारी रक्कम शेतकऱ्यांना मिळेल, शेतमाल विक्री खर्च कमी होईल तसेच शेतमालाची हाताळणी कमी होऊन कृषि मालाचे काढणीपश्चात होणारे नुकसान कमी होईल. तसेच वाहतुक खर्चात मोठया प्रमाणात बचत होईल.

राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत शहरी भागासाठी भाजीपाला पुरवठा योजना राज्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या 4 शहरांमध्ये राबविण्यात येत आहे.यापैकी मुंबई, पुणे व नागपूर या तीन शहरांसाठी सदर योजनेच्या अंमलबजावणीचे काम हे महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडे असुन औरंगाबादसाठीचे कामकाज हे कृषि विभागाकडे आहे. शहरी भागासाठी भाजीपाला पुरवठा योजनेअंतर्गत संकलन व प्रतवारी केंद्रांची उभारणी करणे, मोटराईज्ड वेंडींग कार्ट, वातावरण नियंत्रीत विक्री केंद्र, स्थायी/फिरते विक्री केंद्र या चार घटकाअंतर्गत अनुदान देण्याची तरतुद आहे. या योजनेअंतर्गत स्थायी/फिरते विक्री केंद्र व वातावरण नियंत्रीत विक्री केंद्र या घटकाअंतर्गत मर्यादित स्वरुपातील प्रतिसाद या योजनेस मिळालेला आहे. मोटराईज्ड वेंडींग कार्ट या घटकासाठी पुणे शहरामध्ये मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला व या वाहनांद्वारे सहकारी गृहरचना संस्था तसेच हौसिंग कॉंम्प्लेक्स या ठिकाणी भाजीपाल्याची विक्री थेट ग्राहकांना करण्यात येत आहे. तथापि, या ठिकाणी मिळणारा प्रतिसाद तसेच भाजीपाला शिल्लक राहण्याबाबत शेतकऱ्यांकडुन अडचणी विषद करण्यात येत आहेत. कृषि पणन मंडळाने सदर योजनेची अंमलबजावणी सुरु केल्यानंतर शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना भाजीपाला विक्री करता यावा, याकरिता पुणे शहरामध्ये दि.29 जुन 2014 रोजी गांधी भवन, कोथरुड या ठिकाणी पहिला शेतकरी आठवडी बाजार सुरु केला. शेतकरी आठवडी बाजाराचे स्वरुप हे आठवडयातुन एकाच वारी व साधारणपणे 3 ते 4 तासांकरिता शेतकऱ्यांनी आपला माल आणुन थेट ग्राहकांना विक्री करावा, अशा प्रकारची अत्यंत मर्यादित सुविधा उपलब्ध करुन देणे, अशा स्वरुपाची असुन जागेचे भाडे, टेबल, खुर्च्या, साफसफाई, बाजार व्यवस्थापन, इ. साठी शेतकऱ्यांकडुन नाममात्र शुल्क घेऊन शेतकऱ्यांना या शेतकरी आठवडी बाजारामध्ये थेट विक्री सुविधा दिली जाते. सदर उपक्रमास पुणे शहरामध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असुन आतापर्यंत सात शेतकरी आठवडी बाजार वेगवेगळया वारी, वेगवेगळया ठिकाणी नियमीतपणे सुरु आहेत. तसेच या शेतकरी आठवडी बाजाराच्या आयोजनासाठी स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडुन जागा मिळवुन पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये एकुण 10 ते 12 शेतकरी आठवडी बाजार सुरु करण्याचे तसेच राज्यामध्ये एकुण 50 शेतकरी आठवडी बाजार सुरु करण्याचा कृषि पणन मंडळाचा मानस आहे. तथापि, कायद्याच्या दृष्टीकोनातुन विचार करता अशा प्रकारचे बाजार हे फक्त कृषि पणन मंडळामार्फत आयोजीत होवू शकतात.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाची स्थापना ही महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील कलम 39 (अ) नुसार झालेली असुन कलम 39 (जे) अंतर्गत कृषि पणन मंडळाची कर्तव्ये व अधिकार आहेत, त्यामध्ये
1) कृषि विषयक खरेदी विक्रीसंबंधात सर्वसाधारण हिताच्या असतील अशा गोष्टी करणे.
2) कृषि उत्पन्नाच्या खरेदी विक्रीच्या विकासाच्या बाबतीत कार्यसत्रे, चर्चासत्रे, प्रदर्शने यांचे आयोजन करणे किंवा त्याची व्यवस्था ठेवणे.

या बाबींची तरतुद आहे.त्यानुसार कृषि पणन मंडळ शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि उत्पादकांच्या सहकारी संस्था यांच्या मदतीने शेतकरी आठवडे बाजार आयोजीत करित आहे.तसेच या बाबतची सर्वसाधारण नियमावली कृषि पणन मंडळाने तयार केली आहे.

कृषि पणन मंडळातर्फे आयोजीत करण्यात येत असलेल्या शेतकरी आठवडे बाजारांना कायदेशीर संरक्षण मिळावे तसेच त्यांचे कायदेशीररित्या आयोजन करणे, त्याचबरोबर आयोजकांना अशा बाजाराच्या आयोजनासाठी कायदेशीर संरक्षण आणि अधिकार/परवानगी असणे, या बाबी आवश्यक आहेत. शेतकरी आठवडे बाजारामध्ये शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विना मध्यस्थ विकता येतो.तसेच यामध्ये शेतकऱ्यांना येणारा शेतमाल विक्री खर्च अत्यंत माफक स्वरुपाचा आहे.शेतकरी आठवडी बाजार हे शेतकऱ्यांकरिता अत्यंत फायदेशीर ठरत आहेत. तसेच ग्राहकांनाही इलेक्ट्रॉनिक वजन काटयांवर मोजमाप केले जाऊन उच्च दर्जाचा माल हा माफक दरामध्ये उपलब्ध होत असल्याकारणाने ग्राहकांचाही या बाजारांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांना आपल्या मालाला जास्तीत जास्त बाजारभाव मिळवुन देण्यासाठी सदर शेतकरी आठवडे बाजार हे यशस्वी होत आहेत.सदर संकल्पना राज्यामध्ये विविध शहरांमध्ये राबविणे हे शेतकऱ्यांच्या व ग्राहकांच्या फायद्याच्या दृष्टीकोनातुन अत्यंत महत्वाचे आहे.सदर बाबींचा विचार करुन शेतकरी आठवडे बाजारांना आवश्यक कायदेशीर संरक्षण देणे गरजेचे वाटते. कृषि पणन मंडळाने सद्यस्थितीत शेतकरी आठवडे बाजारांकरिता तयार केलेली शेतकरी आठवडी बाजाराची संकल्पना, शेतकरी आठवडे बाजाराचे शेतकरी आणि ग्राहकांना फायदे, शेतकरी आठवडे बाजारासाठी कृषि पणन मंडळातर्फे सुरु करण्यात येत असलेले उपक्रम, शेतकरी आठवडी बाजारासाठी नियमावली यामध्ये आयोजकांसाठी नियम/शर्ती/अटी आणि शेतकरी/शेतकरी गट/ शेतकरी उत्पादक कंपनी/उत्पादक सहकारी संस्था यांचेसाठी नियमावली (जबाबदारी) याबाबतचा तपशील खालील प्रमाणे.

शेतकरी आठवडी बाजार संकल्पना

 • शेतकरी तसेच ग्रामिण महिला बचत गट यांनी उत्पादित केलेल्या मालाला थेट बाजार पेठ उपलब्ध करून देणे
 • सर्व प्रकारचा भाजीपाला एकाच ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध करून देणे
 • शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि उत्पादक सहकारी संस्था यांचा शेतमाल त्यांनी पुरस्कृत केलेल्या गटांमार्फत/ प्रतिनिधींमार्फत विक्री
 • मध्यस्थ नसल्यामुळे ग्राहक अदा करीत असलेली रक्कम थेट शेतकऱ्यांस उपलब्ध
 • मालाची हाताळणी कमी होत असल्याकारणाने सुगीपश्चात नुकसान कमी तसेच मालाचा दर्जा उत्तम राहतो
 • शेतकरी आठवडे बाजाराची वेळ व ठिकाण निश्चित असल्याकारणाने शेतमाल काढणीचे आणि विक्रीचे नियोजन करणे शेतकऱ्यांना शक्य
 • इलेक्ट्रॉनिक वजन काट्यामार्फत शेतमालाचे वजन. त्यामुळे ग्राहकांमध्ये वजनाबाबत विश्वास निर्माण करणे
 • बाजार पेठेचा अंदाज येत असल्याने बाजारात आणावयाच्या मालाबाबत नियोजन करणे शक्य
 • शंभर टक्के रोखीने व्यवहार • कोणत्याही प्रकारच्या परवान्यांची आवश्यकता नाही
 • ग्रामिण भागातील युवकांना चांगल्या अर्थार्जनाचा रोजगार उपलब्ध
 • वाजवी भावामध्ये ग्राहकांना भाजीपाला उपलब्ध

शेतकरी आठवडी बाजाराचे फायदे

शेतकरी

 • शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि उत्पादक सहकारी संस्था यांचेमार्फत थेट ग्राहकांना शेतमाल विक्रीची संधी
 • कृषि माल शेतातून थेट बाजारात येत असल्याकारणाने काढणी नंतरच्या होणाऱ्या नुकसानीत मोठी घट
 • रोख स्वरूपात 100 टक्के मालाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या हातात
 • आपल्या मालाचा बाजार भाव ठरविण्याचा शेतकऱ्याला अधिकार
 • अत्यंत कमी शेतमाल विक्री खर्च
 • ग्राहक आणि शेतकरी यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण होते
 • ग्राहकांच्या मागणीनुसार मालाचा पुरवठा
 • थेट विक्रीमुळे मध्यस्थांना मिळणारी रक्कम थेट शेतकऱ्याला प्राप्त
 • बाजारात विक्री होणाऱ्या मालाचा अंदाज आल्याने भाजीपाला शिल्लक रहात नाही.

ग्राहक

 • ताजा स्वच्छ शेतमाल थेट शेतकऱ्यांकडून उपलब्ध
 • शेतकरी विक्री करीत असल्याकारणाने मालाच्या प्रती बाबत खात्री
 • थेट शेतकऱ्यांशी संवाद होत असल्याकारणाने ग्राहक आपली गरज शेतकऱ्याला सांगू शकतात.
 • थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदीचे ग्राहकांना समाधान
 • घराजवळ भाजीपाला बाजार पेठ उपलब्ध
 • भाजीपाला खरेदीचे आठवड्याचे नियोजन करता येते
 • एकाच छताखाली भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य, दुध, डाळी, प्रक्रिया उत्पादने, ग्रामिण उत्पादने ग्राहकांना उपलब्ध
 • शेतमालाचे वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्यामार्फत होत असल्याने ग्राहकांना वजनाबाबत विश्वास


पुणे शहरामध्ये सुमारे 10 शेतकरी आठवडी बाजार सुरू करण्याचा कृषि पणन मंडळाचा मानस असून शेतकऱ्यांना प्रत्येक वारी वेगवेगळ्या ठिकाणी भाजीपाला विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आठवड्याच्या प्रत्येक वारी पुणे शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये शेतकरी आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात येणार आहे.तसेच राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किमान एक शेतकरी आठवडी बाजार सुरू करण्याचा प्रयत्न कृषि पणन मंडळ करणार आहे.अशा प्रकारे राज्यात पहिल्या टप्यात सुमारे 50 शेतकरी आठवडी बाजार उभे राहतील अशी अपेक्षा आहे.

शेतकरी आठवडी बाजार सुरू करतांना प्रथमत: त्या भागाची पाहणी करण्यात येते. त्या भागामध्ये सद्यस्थितीत असलेला भाजीपाल्याचा व्यवसाय कशा पद्धतीने चालतो, परिसरात राहणाऱ्या लोकांना कोणत्या वारी आणि कोणत्या वेळी बाजार सोईचा ठरू शकतो इ. बाबी विचारात घेवून योग्य जागेची निवड करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जागा निवडीनंतर त्यासाठीच्या आवश्यक परवानग्या तसेच बाजाराचा वार आणि वेळ निश्चित झाल्यानंतर त्या परिसरातील लोकांशी वॉट्सॲप, एसएमएस मार्फत तसेच परिसरामध्ये फ्लेक्स लावून आणि वृत्तपत्रांमध्ये माहिती पत्रके टाकून लोकांपर्यंत शेतकरी बाजाराबाबतची माहिती पोहोचविण्यात येते. तसेच बाजाराच्या उद्घाटनाच्या दिवशी विविध वृत्तपत्रांमध्ये बाजाराबाबतच्या बातम्या छापून येतील यासाठी आवश्यक कार्यवाही कृषि पणन मंडळातर्फे करण्यात येते.

शेतकरी आठवडे बाजारामध्ये बाजार भावांबाबत कोणतेही नियंत्रण कृषि पणन मंडळातर्फे ठेवण्यात येत नाही. तथापि, बाजारामध्ये चांगल्या दर्जाचा भाजीपाला आणि फळे ग्राहकांना उपलब्ध असावीत, इलेक्ट्रॉनिक वजन काट्याचा वापर व्हावा, स्वच्छता पाळण्यात यावी, शेतकरी बाजारामध्ये कचरा होवू नये, शेतकरी बाजारामुळे ट्रॅफिक जाम होवू नये, पार्किंग निट व्हावे इ. बाबत शेतकऱ्यांशी वेळोवेळी बैठका घेवून मार्गदर्शन करण्यात येते. प्रामुख्याने शेतकरी बाजारामध्ये येणारा कृषि माल उच्च दर्जाचा असावा, जास्त पक्व झालेला, किडका, सडलेला, रोगट, फुटलेला म्हणजेच जो माल ग्राहक खरेदी करणार नाही किंवा जो माल ग्राहकांसाठी खाण्यायोग्य नाही अशा प्रकारच्या मालाची शेतकरी आठवडे बाजारामध्ये आवक होवू नये यासाठी आवश्यक मार्गदर्शक सुचना शेतकऱ्यांना वेळोवेळी देण्यात येतात.

शेतकरी आठवडी बाजारासाठी कृषि पणन मंडळातर्फे सुरू करण्यात येत असलेले उपक्रम

 • शेतकरी आठवडे बाजारात सहभागी होत असलेले शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि उत्पादक सहकारी संस्था यांची तपशीलासह यादी कृषि पणन मंडळाच्या www.msamb.com या वेब साईटवर टाकणे.
 • शेतकरी आठवडे बाजारामध्ये विक्री होणाऱ्या शेतमालाचे अंदाजे बाजार भाव हे www.msamb.com या वेबसाईटवर प्रसिद्ध करणे.
 • शेतकरी आठवडे बाजारामध्ये येणाऱ्या ग्राहकांना आपण विकत घेत असलेला भाजीपाला कोठून येत आहे याबाबतची माहिती मिळण्यासाठी ग्राहकांच्या सहली शेतकऱ्यांच्या शेतावर आयोजित करणे.
 • शेतकरी आठवडे बाजारांचे आयोजन हे शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या अथवा उत्पादक सहकारी संस्था यांचेमार्फत करण्यात येत आहे. राज्यामध्ये जिल्ह्यांच्या ठिकाणी जे शेतकरी गट शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्यासाठी पुढे येतील त्यांच्या पुण्यातील शेतकरी आठवडे बाजारांना भेटी आयोजित करणे, त्यांना शेतकरी आठवडे बाजार आयोजनासंदर्भात करावयाची पूर्व तयारी तसेच आयोजन याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल.
 • शेतकरी आठवडे बाजारामध्ये शेतमाल विक्रीसाठी येणारे शेतकरी/शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपन्या/उत्पादक सहकारी संस्था यांची नोंदणी कृषि पणन मंडळामध्ये करण्यात येवून त्यांना शेतकरी आठवडे बाजारात शेतमाल विक्रीसाठी परवानगी देण्याची प्रक्रिया निश्चित करणे.
 • शेतकरी आठवडे बाजारांमध्ये व्यापाऱ्यांचा शिरकाव होणार नाही याबाबत खबरदारी घेणे.
 • शेतकरी आठवडे बाजारामध्ये शेतमाल विक्रीसाठी येणारे शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि उत्पादक सहकारी संस्था यांच्यामार्फत शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना ओळखपत्र देणे. यामुळे शेतकरी आठवडे बाजारावर नियंत्रण ठेवणे सोईचे असेल.
 • शेतकरी आणि ग्राहक यांचेशी सतत संपर्क ठेवून शेतकरी आठवडे बाजार अधिकाधिक ग्राहक आणि शेतकरीभिमूख होतील यासाठी तसेच शेतकरी आठवडे बाजारातील व्यवहार अधिक पारदर्शक करणेसाठी पणन मंडळ प्रयत्नशिल आहे.

शेतकरी आठवडे बाजार नियमावली

आयोजकांसाठी नियम / अटी / शर्ती

 • शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांनी कोणाचा माल किती कालावधीसाठी विक्री करणार याबाबतचा तपशील शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांच्या /सभासदांच्या सद्याच्या 7/12 च्या उताऱ्यासह पणन मंडळास तसेच शेतकरी आठवडे बाजार आयोजकास शेतकरी आठवडे बाजारामध्ये विक्रीसाठी परवानगी मिळण्यासाठीच्या अर्जासोबत दाखल करावा. तसेच शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांच्या नोंदणीचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावे.
 • फक्त शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांच्या सभासदांचाच माल थेट ग्राहकांना वाजवी दरात विक्री करण्यात येईल असे हमीपत्र अर्जासोबत देणे आवश्यक राहील. विक्रेत्यावर उत्कृष्ठ प्रकारचा माल विक्रीचे बंधन असेल. याबाबतचा उल्लेख हमीपत्रात करावा लागेल.
 • शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था हे आपला / सभासदांचा उत्पादित माल शेतकरी आठवडे बाजारात विक्री करतील. येथील विक्री थेट ग्राहकांनाच असेल. शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था शेतमालाची खरेदी विक्री आपआपसात शेतकरी आठवडे बाजारात करणार नाहीत.
 • शेतकरी आठवडे बाजारात विक्रीसाठी पणन मंडळाची पूर्वपरवानगी आवश्यक राहील. आयोजकांना परवानगी नसलेल्या शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांना परस्पर विक्रीसाठी परवानगी देता येणार नाही. काही अपरिहार्य परिस्थितीत आयोजकांना विक्रीसाठी परवानगी द्यावी लागल्यास याबाबतची माहिती पणन मंडळास देवून पुढील वेळी परवानगीशिवाय संबंधितांना विक्रीसाठी परवानगी देवू नये.
 • प्रत्येक शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांना सर्वांना समान तत्वावर जागा वाटप करण्याची जबाबदारी आयोजकांची राहील. एका शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांना विक्रीसाठी एकच गाळा / जागा देण्यात येईल.
 • शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांच्या जागा बदलविण्याचे अधिकार आयोजकास असतील. तथापि, सर्व शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था या सर्वांसाठी जागा बदलविण्याचे नियम व अटी या सारख्याच असतील. प्रथम येणाऱ्यास (शेतमालासह) प्रथम प्राधान्य अथवा चिठ्ठी पद्धतीने अथवा रोटेशन पद्धतीने स्टॉल / जागेचे वाटप करणे आयोजकांवर बंधनकारक राहील. जागेचे न्याय्य वाटप करण्याची जबाबदारी आयोजकांवर राहील.
 • शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांनी आठवड्यातील किती शेतकरी बाजारात शेतमालाची विक्री करावी याबाबत (शेतकरी बाजार संख्या/स्थळ) पणन मंडळ शहरांनुसार बाजारांची संख्या निश्चित करून देईल. जास्तित जास्त शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांना शेतकरी आठवडे बाजारात माल विक्रीची संधी देण्याचे धोरण राबविण्यात येईल.
 • योजकांनी जागेचे भाडे, टेबल, खुर्च्या, पिण्याचे पाणी, लाईट व्यवस्था, कचरा निर्मूलन, जागेची साफसफाई, अभ्यांगत, पार्किंग नियोजन, सुरक्षा, प्रचार, प्रसिद्धी इ. च्या खर्चासाठी शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था तसेच इतर विक्रेते यांचेकडून वाजवी रक्कम आकारावी. प्रत्येक आठवड्यात आयोजित शेतकरी आठवडे बाजाराचा जमा आणि खर्चांच्या रक्कमांचा हिशेब आयोजकांनी ठेवणे बंधनकारक राहील. कृषि पणन मंडळास सदर हिशेब आठ दिवसांच्या आत सादर करण्याची जबाबदारी आयोजकांवर राहील. तसेच सहभागी विक्रेत्यांनी मागणी केल्यास सदर हिशेब संबंधितांना देणे बंधनकारक असेल. आयोजक प्राप्त रक्कमेमधून सेवाशुल्क म्हणून एकूण प्राप्त रक्कमेपैकी 20 टक्के रक्कम ठेवू शकतील
 • कोणत्याही परिस्थितीत खाजगी व्यापारी / किरकोळ विक्रेते शेतकरी बाजारात विक्रीसाठी येणार नाहीत याची जबाबदारी आयोजकांची राहील.
 • शेतकरी आठवडे बाजारात जास्तित जास्त 50 स्टॉल्स असावेत. त्यापैकी सुमारे 40 स्टॉल्स (80 टक्के) हे शेतमालाच्या (भाजीपाला/फळे/डाळी/कडधान्य/दुध) विक्रीसाठी असणे आवश्यक राहील. सुमारे 10 स्टॉल्स (एकूण स्टॉलच्या संख्येच्या 20 टक्के) खाद्यपदार्थ/पापड/ लोणचे/मसाले/दुग्धजन्य पदार्थ/प्रक्रियायुक्त पदार्थ इ. मालाच्या विक्रीसाठी देता येतील. तथापि, सदस स्टॉल्सची संख्या एकूण स्टॉल्सच्या संख्येच्या 20 टक्के पेक्षा जास्त ठेवता येणार नाही.
 • शेतकरी आठवडे बाजार आयोजक म्हणून शेतकरी गट / उत्पादक कंपन्या / उत्पादक सहकारी संस्था कामकाज करू शकतील. खाजगी व्यक्ती / बचत गट / एन.जी.ओ. तसेच इतर संस्थांना अथवा वैयक्तिकरित्या शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्यास पणन मंडळातर्फे मान्यता देण्यात येणार नाही.
 • “शेतकरी आठवडे बाजार” सुरू करण्यासाठी शेतकरी गट / उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांनी शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्याची परवानगी मागतांना शेतकरी आठवडे बाजारात विक्रीसाठी येणारे शेतकरी / शेतकरी गट / कंपन्या यांची संमती पत्र नोंदणीच्या प्रमाणपत्रासह तसेच इतर आवश्यक कागदपत्रांसह कृषि पणन मंडळास सादर करणे बंधनकारक राहील.
 • शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांनी ग्राहकांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करावेत. ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही / ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची जबाबदारी विक्रेत्यांची राहील. शेतकरी आठवडे बाजार परिसरात धूम्रपान / मद्यपान करू नये तसेच ग्राहकांशी कोणत्याही प्रकारे गैरवर्तन करू नये. याबाबत तक्रारी आल्यास त्यावर प्राधान्याने आयोजकांनी कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीबाबत पणन मंडळास कळवावे.
 • प्रत्येक शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांनी स्टॉलवर आपला/संस्थेचा फलक / फ्लेक्स लावणे बंधनकारक राहील. फलकावर शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांच्या प्रमुखाचे नाव आणि मोबाईल नंबर टाकावा. तसेच शेतमालाच्या बाजार भावाचा फलक स्टॉलमध्ये दर्शनिय ठिकाणी लावणे बंधनकारक राहील.
 • शेतकरी आठवडे बाजारामध्ये सहभागी शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांची यादी त्यांच्या शेतमालाच्या विक्रीसह तसेच अंदाजित किंमतींसह कृषि पणन मंडळाच्या वेबसाईटवर टाकण्यात येईल. सदर माहिती कृषि पणन मंडळास ईमेलद्वारे पुरविणे आयोजकांवर बंधनकारक असेल.
 • जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा कृषि पणन अधिकारी आणि कृषि पणन तज्ञ यांच्या मदतीने विविध शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांचा शेतमाल विक्रीतील सहभाग वाढविणेची जबाबदारी तसेच जास्तित जास्त शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था थेट शेतमाल विक्रीत सहभागी करण्याची जबाबदारी आयोजकांची राहील.
 • आयोजक शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांचेकडून शेतकरी आठवडे बाजाराच्या मुळ संकल्पनेस बाधा पोहोचत असल्याचे लक्षात आल्यास संबंधित आयोजकांकडून शेतकरी आठवडे बाजाराचे कामकाज काढून घेण्याचा अधिकार कृषि पणन मंडळास राहील.
 • काही मुलभूत शेतमालाच्या किंमती शेतकरी आठवडे बाजारातील सहभागी शेतकऱ्यांच्या सहमतीने निश्चित करण्याचा अधिकार आयोजकास राहील.
 • आयोजकांनी शेतकरी आठवडे बाजारामध्ये महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचा फ्लेक्स लावणे बंधनकारक राहील. फ्लेक्सवर कृषि पणन मंडळाचा पत्ता,फोन नं., इ- मेल,संपर्क अधिका-याचे, मोबाईल नं., इ मेल इ. चा तपशिल द्यावा. शेतकरी आठवडे बाजाराच्या संदर्भातील सूचना, तक्रारी, तसेच ग्राहकांचे म्हणणे यांची नोंद ठेवण्याची जबाबदारी आयोजकांची राहील.
 • ग्राहक/शेतकरी/ शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपन्या/ उत्पादकांच्या सहकारी संस्था तसेच इतर शेतकरी आठवडे बाजाराशी संबंधित घटक यांनी त्यांच्या शेतकरी आठवडे बाजारा संदर्भातील सूचना /तक्रारी आयोजकांकडे द्याव्यात. तसेच याबाबत कृषि पणन मंडळाकडेही संपर्क साधावा.

शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांचेसाठी नियमावली (जबाबदारी) –

 • शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांनी आपला/आपल्या सभासदांचाच शेतमाल शेतकरी आठवडे बाजारामध्ये विक्रीसाठी आणणे बंधनकारक राहील.
 • कृषि उत्पन्न बाजार समिती अथवा इतर ठिकाणांहून खरेदी केलेला शेतमाल शेतकरी आठवडे बाजारात विक्री करता येणार नाही. तसे आढळून आल्यास संबंधिताची परवानगी रद्द करण्यात येईल.
 • शेतकरी आठवडे बाजारात फक्त ग्राहकांनाच मालाची विक्री करणे शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांना बंधनकारक राहील. शेतकरी आठवडे बाजारात शेतमालाची घाऊक विक्री करता येणार नाही.
 • शेतमालासोबत येणारा काडी/कचरा/घाण/शिल्लक माल शेतकरी बाजारातून परत नेण्याची जबाबदारी शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांची राहील. शेतमाल विक्रीनंतर कचरा शेतकरी बाजारात टाकून गेल्याचे आढळल्यास दंड आकारण्याचे अथवा शेतमाल विक्रीसाठी देण्यात आलेली परवानगी रद्द करण्याचे अधिकार आयोजकास राहतील.
 • शेतकरी आठवडे बाजारात शेतमालाचे वजन करणेसाठी इलेक्टॉनिक वजन काट्याचा वापर करणे विक्रेत्यांवर बंधनकारक राहील.
 • शेतकरी आठवडे बाजारात किरकोळ विक्रेत्यांपेक्षा कमी दराने शेतमालाची विक्री होणे आवश्यक आहे. शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था वाजवी दराने शेतमालाची विक्री करीत नसल्याचे आढळून आल्यास त्यांची विक्रीसाठीची परवानगी रद्द करण्यात येईल.
 • शेतकरी आठवडे बाजारात उत्कृष्ठ दर्जाचा माल विक्री होणे आवश्यक आहे. कच्चा, अती पक्व, किडलेला, रोगग्रस्त, फुटलेला (ग्राहक खरेदी करू शकणार नाही असा माल) असा शेतीमाल विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणू नये. असा शेतमाल विक्रीसाठी आणलेला आढळल्यास सदर मालाची विक्री थांबविण्यात येईल. तसेच संबंधित विक्रेत्याची शेतकरी आठवडे बाजाराची परवानगी रद्द करण्यात येईल.
 • शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांनी शेतमाल विक्रीचे व्यवहार रोखीने करणे बंधनकारक राहील. उधारीने व्यवहार केल्यास आणि नंतर रक्कमेची वसूली न झाल्यास त्यास आयोजक अथवा कृषि पणन मंडळ जबाबदार राहणार नाही.
 • विक्री अभावी शिल्लक राहिलेल्या शेतमालाची जबाबदारी ही संबंधित शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांची राहील. आयोजक अथवा कृषि पणन मंडळ शिल्लक मालास जबाबदार नसतील.
 • परदेशातून आयात केलेल्या शेतमालाच्या विक्रीसाठी (फळे/भाजीपाला) स्वतंत्र परवानगी घेणे शेतकरी आठवडी बाजारातील विक्रेत्यांवर बंधनकारक राहील.
 • शेतकरी आठवडे बाजारासंदर्भात काही अडचणी/सूचना/तक्रारी असल्यास त्याबाबतचा महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचा निर्णय अंतिम राहील.

स्रोत : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ

मधमाशी पालन
मधमाशी पालन

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशा पालन उद्योग राबविला जातो. योजना अंमलबजावणी मध्ये अहमदनगर जिल्हयात अकोले व संगमनेर ही दोन तालुके पश्चिमघाट विकास कार्यक्रमांतर्गत राबाविली जातात. मधमाशा पालन हा उद्योग शेतीपुरक व्यवसाय असून व्यवसाय सुरु करु इच्छिणा-या शेतक-यास जागा, इमारत, वीज, पाणी यासाठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण देशी तंत्रज्ञ व लहानापासून थोरापर्यन्त सर्वांना हा व्यवसाय करता येतो. त्यामुळे इतर कोणत्याही उद्योगाशी स्पर्धा न करणारा हा एकमेव उद्योग आहे.

मधमाशा मध तयार करतात. मध हे एक अत्यंत शक्तीदायक व पौष्टीक अन्न व औषध आहे. मधमाशा मेण देतात हे सौदर्य प्रसाधने, औद्योगिक उत्पादनाचा घटक आहे. मधमाशा पासून मिळणारे राजान्न (रॉयल जेली, दंश, विष, व्हिनम) पराग (पोलन) रोंगणे (प्रो पॉलीस) पदार्थांना उच्चप्रतीचे औषधमुल्य आहे. परागी भवनाव्दारे शेती, पिके, फळबागायती पिकांच्या उत्पादनात भरीव वाढीस मदत होते.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व नैसर्गिक संपत्तीचे जनत करण्यासाठी त्याचा फायदा होतो. जमिनीची होणारी धुप आणि काही ठिकाणी शेतीत पाण्याचा अतिरिक्त वापर या गोष्टीमुळे जमिनीचा पोत कमी होणे आणि बी-बियाणे, खताच्या वाढत्या किंमती, रोजमजूरी, वाढते दर या सा-या खर्चामुळे शेती उत्पादन आणि होणारा खर्च याचे व्यस्त होत चाललेले प्रमाण या दृष्टीने मधमाशा पालन हा उद्योग कमी खर्चात, शेतीपुरक व्यवसाय ज्यातुन शेती उत्पादन वाढ या दृष्टीने उपयुक्त उद्योग म्हणून मधमाशा पालन उद्योगाकडे पहावे लागेल.

अहमदनगर जिल्हयात पश्चिमघाट विकास कार्यक्रमांतर्गत अकोले व संगमनेर या दोन तालुक्याचा समावेश आहे. तथापि जिल्हयातील अन्य बारा तालुक्यातील शेतकरीही या उद्योगाचे फायदे मिळावेत या दृष्टीने जिल्हा वार्षिक योजनेतून मधपाळासाठी फायदे मिळवून देण्यात येणार आहेत. या संदर्भात शेतक-यांनी त्याचे शेतीशी जोडधंदा म्हणून उद्योग करावयाचे ठरविल्यास त्यास मधपाळाचे 10 दिवसाचे प्रशिक्षण मधसंचालनालय महाबळेश्वर येथे दिले जाते. त्यानंतर त्यास मध उद्योगासाठी आवश्यक असलेली साहित्य मधपेट्या (वसाहतीसह) मधयंत्र व अन्य साहित्य रु 42700/- पुरविण्यात येते. यात प्रशिक्षण विनामूल्य तसेच साहित्य खरेदीवर 10,000/- पर्यन्तचे अनुदान पश्चिमघाट विकास योजना/ जिल्हा वार्षिक योजना यांचे माध्यमातून दिले जाते. शिवाय शेतक-यास मधासाठी हमी भाव रु. 120/- प्रति किलो निर्धा?रीत केला असून मंडळाकडून मध खरेदी केला जातो.

तेव्हा ज्या शेतक-यांना मधमाशा पालन उद्योग सुरु करावयाचा आहे त्यांनी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा कार्यालय, अहमदनगर (व्दारा- जिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर) यांचेकडे अथवा तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा. या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0241-2353410 असा आहे.

फलोत्पादन मालाचे संकलन प्रतवारी व पेकिंग गृह उभारणी
फलोत्पादन मालाचे संकलन प्रतवारी व पेकिंग गृह उभारणी

नाव

फलोत्पादन मालाचे संकलन प्रतवारी व पेकिंग गृह उभारणी (कृषी विभाग महाराष्ट्र शासन )

योजना काय आहे

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान / संरक्षित उत्पादन

अनुदान स्वरूप

सर्व साधारण क्षेत्रासाठी ४० % किवा कमाल ६ लाख आणि डोंगराळ व अधिसूचित भागासाठी ५५ % किवा कमाल ८.२५ लाख या पैकी कमी  असेल ती रक्कम देण्यात येईल .

अनुदान कोणाला भेटनार

वयक्तिक शेतकरी शेतकरी समूह , संस्था , कंपनी , बचत गट , सहकारी संस्था , महामंडळ , स्थानिक स्वराज्य संस्था , कृषी विज्ञान केंद्र , कृषी उत्पन्न बझार समिती .

अनुदान मिळवण्याचे नियम

बँक कर्जाशी निगडीत , बँक अप्रयजल जोडणे बंधनकारक , आर्थिक दृष्ट्या सक्षम असणे बंधनकारक इत्यादी .

कोणती प्रमाणपत्र लागणार

७/१२ ८-अ उतारा , प्रकल्प अहवाल , बँक कर्ज मंजुरी पत्र , ओलिताची शास्वत सोय इत्यादी .

कोणाशी भेटावयास  लागेल

तालुका कृषी अधिकारी , उप विभागीय कृषी अधिकारी , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना
मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना

आंबा, कांदा, कडधान्य व तेलबियांवर मोठ्या प्रमाणावर अन्न प्रक्रिया, द्राक्ष, संत्रा, डाळिंब, काजू, स्टॉबेरी, टॉमेटो, ऊस, दुग्धोत्पादन, मासेमारी, कुक्कटपालन यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पादन ही महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्रात अन्नाची नासाडी टाळण्यासाठी तसेच प्रक्रिया उद्योगास चालना देण्यासाठी राज्य पुरस्कृत ‘मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना’ आणि केंद्र पुरस्कृत ‘प्रधानमंत्री किसान संपदा योजना’ लागू केल्या आहेत.

शेतीमालाचे मुल्यवर्धन करण्याकरिता शेतकऱ्यांच्या सहभागाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहन देणे. उत्पादित अन्न पदार्थांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, उर्जेची बचत व्हावी, यासाठीच्या प्रकल्पांच्या आधुनिकीकरणास प्रोत्साहन देणे, अन्न प्रक्रियेद्वारे उत्पादित मालाची ग्राहकांमध्ये पसंती निर्माण करणे, बाजारपेठ निर्माण करणे व निर्यातीस प्रोत्साहन देणे, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रियेकरिता प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मिती करणे, ग्रामीण भागात लघु व मध्यम अन्न प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य देणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे अशी या योजनेची उद्दिष्टे आहेत.

शासन निर्णय दिनांक 20 जून 2017 नुसार सन 2017-18 या आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षाकरिता ‘मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना’ लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत कृषी व अन्न प्रक्रिया प्रस्थापना, स्तरवृद्धी व आधुनिकीकरण, शीतसाखळी योजना, मनुष्यबळ निर्मिती व विकास योजना आणि राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियानांतर्गत मंजूर परंतु प्रलंबित प्रकल्पांकरिता देय उर्वरित अनुदानाची रक्कम मंजूर करणे या चार उपघटकांकरिता अर्थसहाय्य देय राहणार आहे.

कृषी व अन्न प्रक्रिया प्रस्थापना, स्तरवृद्धी व आधुनिकीकरण आणि शीतसाखळी योजना

याअंतर्गत फळे, भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया उत्पादने इत्यादींवर आधारित प्रक्रिया उद्योग पात्र आहेत. यासाठी पुढीलप्रमाणे पात्र संस्था असतील – फळे, भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया उत्पादने इत्यादींवर आधारित प्रक्रिया प्रकल्प चालविणारे किंवा स्थापित करीत असलेले शासकीय / सार्वजनिक उद्योग, सक्षम शेतकरी उत्पादक कंपनी / गट, महिला स्वयंसहाय्यता गट, खाजगी उद्योग क्षेत्र, ग्रामीण बेरोजगार युवक, सहकारी संस्था अशा अन्न प्रक्रिया प्रकल्पांपैकी फळे व भाजीपाला यासारख्या नाशवंत शेतमालाच्या प्रक्रियेच्या प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येईल.

अर्थसहाय्य –

प्रकल्प उभारणीसाठी बांधकाम व यंत्रे यांच्या खर्चाचा 30 टक्के व कमाल 50 लाख रूपये अनुदान देण्यात येईल. अनुदान क्रेडीट लिंक्ड बँक एन्डेड सबसिडी या तत्त्वांनुसार दोन समान वार्षिक हप्त्यात येईल. यासाठी मंजूर अनुदानाच्या रकमेपेक्षा कर्जाची रक्कम किमान दीडपट असावी.

मनुष्यबळ निर्मिती व विकास योजनेंतर्गत अन्न प्रक्रियाकरिता उद्योग पात्र असून प्रशिक्षण शुल्काच्या 50 टक्के अर्थसहाय्य आहे.

राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियानांतर्गत मंजूर, भौतिकदृष्ट्या उत्पादन सुरू असलेल्या तथापि अनुदान प्रलंबित असलेल्या प्रकल्पांकरिता देय उर्वरित अनुदानाची रक्कम त्या योजनेचे प्रचलित निकषाप्रमाणे मंजूर करणे या अंतर्गत अनुदान प्रलंबित असलेले प्रकल्प उद्योग पात्र आहेत. उर्वरित अनुदानाची रक्कम त्या योजनेच्या प्रचलित निकषाप्रमाणे मंजूर करणे असे अर्थसहाय्य आहे.

अधिक माहितीसाठी मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. या योजनेच्या माध्यमातून अन्नाची नासाडी टाळण्याबरोबरच प्रक्रिया उद्योगास चालना मिळणार आहे, हे मात्र निश्चित !

– संप्रदा द. बीडकर

परसबाग कुक्कुटपालन योजना
परसबाग कुक्कुटपालन योजना

महाराष्ट्र शासनाने लहान स्तरावरील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची ही अडचण लक्षात घेऊन परसातील कुक्कुटपालनास चालना देतील, अशा स्वरूपाच्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करता येतो.

एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम

ही योजना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबविण्यात येते, तसेच ही योजना सर्वसाधारण गटातील सर्व लाभार्थींकरिता उपलब्ध आहे. या योजनेत दोन पर्याय उपलब्ध आहेत.

अ) तलंगा गटवाटप

या कार्यक्रमांतर्गत सर्व प्रवर्गातील लाभार्थींना ५० टक्के अनुदानावर ८ ते १० आठवडे वयाच्या तलंगाच्या २५ माद्या आणि तीन नर याप्रमाणे गटाचे वाटप करण्यात येते.
तलंगाच्या एका गटाची (२५ माद्या + ३ नर) एकूण किंमत ६००० रुपये मंजूर करण्यात आली आहे.

तलंगाच्या एका गटाचा खर्चाचा तपशील

पक्षी किंमत (२५ माद्या + ३ नर) ३००० रु.
खाद्यावरील खर्च १४०० रु
वाहतूक खर्च १५० रु.
औषधे ५० रु.
रात्रीचा निवारा १००० रु.
खाद्याची भांडी ४०० रु
एकूण ६००० रु.

यापैकी ५० टक्के खर्च म्हणजेच ३००० रुपये मर्यादेत प्रति लाभार्थी एका गटाचा पुरवठा करण्यात येतो. उर्वरित ५० टक्के रक्कम म्हणजेच ३००० रुपये लाभाने स्वतः उभारून त्यातून तलंगाच्या गटासाठी लागणारा निवारा, वाहतुकीवरील खर्च, खाद्यावरील खर्च, औषधी, पाण्याची भांडी, खाद्याची भांडी इत्यादीवरील खर्च करणे अपेक्षित आहे.

ब) एकदिवसीय सुधारित कुक्कुट पक्ष्यांच्या पिलांचे गटवाटप

या कार्यक्रमांतर्गत सर्व प्रवर्गांतील लाभार्थींना ५० टक्के अनुदानावर प्रति लाभार्थी एकदिवसीय सुधारित कुक्कुट पक्ष्यांच्या (आरआयआर, ब्लॅक ॲस्ट्रॉलॉर्प, गिरिराज, वनराज, कडकनाथ व इतर शासनमान्य जातीचे पक्षी) १०० पिलांचे गटवाटप करण्यात येते. एका गटाची (१०० एकदिवसी पिलांची) एकूण किंमत १६,००० रुपये मंजूर करण्यात आली आहे.

एका गटाच्या खर्चाचा तपशील –

एकदिवसीय १०० पिलांची किंमत २,००० रु.
प्रत्येक गटाबरोबर द्यावयाचे खाद्य ८०० किलो १२,४०० रु
वाहतूक खर्च १०० रु.
औषधे १५० रु.
रात्रीचा निवारा १,००० रु.
खाद्याची भांडी ३५०  रु
एकूण १६,००० रु.

 • यापैकी ५० टक्के अनुदानातून ८००० रुपये मर्यादेच्या प्रति लाभार्थी एकदिवसीय १०० पिले किंमत २००० रुपये आणि खाद्य ( ६००० रूपये किमतीच्या मर्यादेत) पुरवठा करण्यात येतो.
 • उर्वरित ५० टक्के रक्कम म्हणजेच ८००० रुपये लाभाने स्वतः उभारून त्यातून एकदिवसीय १०० पिलांच्या गटासाठी लागणारा निवारा, वाहतुकीवरील खर्च, उर्वरित खाद्यावरील खर्च, औषधी, पाण्याची भांडी, खाद्याची भांडी इत्यादींवरील खर्च करणे अपेक्षित आहे.
 • सदर योजनेचा लाभ कोणत्याही गटातील लाभार्थी घेऊ शकतील. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ देण्यात येतो.
 • अंमलबजावणी अधिकाऱ्याने योजनेस व्यापक प्रसिद्धी देऊन अर्ज मागविण्यात येतात.
 • योजनेचे अर्ज तालुका पशुसंवर्धन कार्यालयात, जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात, जिल्हाधिकारी कार्यालय व वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
 • लाभार्थी निवडताना ३० टक्के महिला लाभार्थी निवडण्याबाबत प्राधान्य देण्यात येते.
 • दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, भूमिहीन शेतमजूर, मागासवर्गीय, अल्प व अत्यल्प भूधारक यांना प्राधान्य देण्यात येते.
 • ज्या जिल्ह्यात मध्यवर्ती अंडी ऊबवणी केंद्र किंवा सघन कुक्कुट विकास गट नाहीत अशा ठिकाणी नजीकच्या मध्यवर्ती अंडी ऊबवणी केंद्र किंवा सघन कुक्कुट विकास गटच्या कार्यान्ययन अधिकाऱ्याची नेमणूक सदस्य म्हणून करण्यात येते.
 • एका तलंगाच्या गटास प्रतिलाभार्थी अनुदानाची ५० टक्के रक्कम ३००० रूपये इतकी निश्‍चित करण्यात आली आहे.
 • तलंग गट वाटपाचा खर्च गटाच्या निर्धारित किमतीपेक्षा जास्त झाल्यास सदरचा वाढीव खर्च लाभार्थ्याने स्वतः करणे अपेक्षित आहे.
 • एकदिवसीय पिले/तलंगा गट वाटप करताना विशेषतः मरेक्स, राणीखेत आर.डी. आणि देवी रोगांवरील लसीकरण झाले आहे याची दक्षता घ्यावी. या सुविधा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत उपलब्ध करून देण्यात येतात.
 • एकदिवसीय १०० पिलांसाठी प्रति लाभार्थी अनुदानाची ५० टक्के रक्कम ८००० रूपये इतकी निश्‍चित करण्यात आली आहे.
 • एकदिवसीय १०० पिलांचा गटाचा खर्च गटाच्या निर्धारित किमतीपेक्षा जास्त झाल्यास सदरचा वाढीव खर्च लाभार्थीने स्वतः करणे अपेक्षित आहे.
 • या योजनेमध्ये लाभ दिलेल्या लाभार्थ्याने दिलेल्या गटापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची नोंद ठेवावी.
 • पक्ष्यांचे अंड्यावर येण्याचे वय, त्यांच्यापासून मिळालेले एकूण व सरासरी अंडी उत्पादन इत्यादींबाबतच्या नोंदी नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेकडे ठेवाव्यात.
 • या योजनेअंतर्गत एकदा लाभार्थ्याची निवड झाल्यावर त्या लाभार्थ्याच्या या योजनेकरिता किमान पुढील पाच वर्षे पुनःश्‍च विचार करण्यात येत नाही.

राज्यामध्ये राज्यस्तरीय योजनेअंतर्गत १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे

१००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे ही नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय योजना राज्यात गेल्या तीन वर्षांपासून लागू करण्यात आली आहे. तथापि, २०१२-१३ या वर्षी सदर योजना राज्य मानव विकास अहवाल २००२ मधील मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या गडचिरोली, यवतमाळ, जालना, नंदुरबार, वाशीम व धुळे या जिल्ह्यांमध्येच ही योजना राबविण्यात येत आहे.

१००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे या राज्यस्तरीय योजनेअंतर्गत एका युनिटद्वारे (प्रतिलाभार्थी) १००० मांसल पक्षी संगोपनाचा बाबनिहाय खर्चाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र तपशील लाभार्थी/शासन सहभाग एकूण अंदाजीत किंमत
१. जमीन लाभार्थी स्वतःची/ भाडेपट्टीवर घेतलेली
२. पक्षीगृह (१००० स्क्वे. फूट) स्टोअर रूम, पाण्याची टाकी, निवासाची सोय, विद्युतीकरण इ. लाभार्थी/शासन २,००,०००/-
३. उपकरणे, खाद्याची/ पाण्याची भांडी, ब्रुडर इ. लाभार्थी/शासन २५,०००/-
एकूण २,२५,०००/-

 • या योजनेअंतर्गत वर नमूद केल्याप्रमाणे पक्षी संगोपनासाठी पक्षीगृह व इतर मूलभूत सुविधा उभारण्याकरिता सर्वसाधारण योजनेतून खुल्या प्रवर्गातील लाभार्थींना प्रतियुनिट २,२५,००० रूपये प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के म्हणजेच १,१२,५०० रूपये या मर्यादेत शासकीय अनुदान देण्यात येते.
 • अनुसूचित जाती उपयोजना (विघयो) व आदिवासी उपयोजनेतून अनुक्रमे अनुसूचित जाती/ जमातीच्या लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या ७५ टक्के म्हणजेच १,६८,७५० रूपये मर्यादेपर्यंत शासकीय अनुदान देय आहे.
 • प्रकल्पासाठी शासकीय अनुदानाव्यतिरिक्त खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांनी उर्वरित ५० टक्के रक्कम म्हणजेच १,१२,५०० रूपये व अनुसूचित जाती/ जमातीच्या लाभार्थ्यांना २५ टक्के रक्कम म्हणजेच ५६,२५० रूपये स्वतः अथवा बँक/ वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभारावयाची आहे.
 • बँक/ वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी किमान १० टक्के स्वहिस्सा व उर्वरित ४० टक्के बँकेचे कर्ज त्याचप्रमाणे अनुसूचित जाती/ जमातीच्या लाभार्थ्यांसाठी किमान पाच टक्के स्वहिस्सा व उर्वरित २० टक्के बँकेचे कर्ज याप्रमाणे रक्कम लाभार्थ्यांना उभारावयाची आहे.
 • याव्यतिरिक्त लाभार्थीकरिता १००० पक्ष्यांच्या संगोपनाकरिता येणारा अंदाजे आवर्ती खर्च ज्यामध्ये एकदिवसीय पिलांची किंमत, पक्षी खाद्य, लस, औषधे, तुस, विद्युत व पाणी इत्यादी बाबींवर होणारा खर्च हा लाभार्थींनी स्वतः करावयाचा आहे किंवा लाभार्थीस खासगी कंपनीसोबत करार करण्याची मुभा राहील.
 • कोणत्याही परिस्थितीत सदर शेडचा उपयोग कुक्कुटपालनाचे पक्षी संगोपनासाठी करणे बंधनकारक राहील.

लाभार्थी निवडीचे निकष

सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांची निवड खालील प्राधान्यक्रमानुसार करण्यात येते.
१) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टरपर्यंतचे भूधारक)
२) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टरपर्यंतचे भूधारक)
३) सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)
४) महिला बचत गटातील लाभार्थी/ वैयक्तिक महिला लाभार्थी (अ. क्र. १ ते ३ मधील)

 • योजनेअंतर्गत अंमलबजावणी अधिकारी या योजनेस व्यापक प्रसिद्धी देऊन लाभार्थींकडून अर्ज मागवितात. लाभार्थी निवडताना ३० टक्के महिला व तीन टक्के विकलांग लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येते.
 • जिल्हा स्तरावर लाभार्थी निवड समितीने निवड केलेल्या लाभार्थींची यादी प्रसिद्ध करते. योजनेअंतर्गत बांधावयाच्या पक्षीगृहाचा आराखडा निश्‍चित करण्यात आला आहे. सदरचा आराखडा सर्व संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. सदर आराखड्याप्रमाणेच जिल्ह्यातील पक्षीगृहाचे बांधकाम लाभार्थ्याने करावे.
 • या योजनेअंतर्गत निवड केलेल्या लाभार्थ्यास सर्वप्रथम स्वहिश्‍श्‍याच्या रकमेतून पक्षीगृहाचे बांधकाम व इतर मूलभूत सुविधा उभाराव्यात.
 • लाभार्थीने केलेले पक्षीगृह बांधकाम उभारलेली मूलभूत सुविधाची प्रत्यक्ष तपासणी व मूल्यांकन संबंधित तालुक्यांचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयातील सहायक आयुक्त पशुसंवर्धन व बँकेचे प्रतिनिधी (कर्जप्रकरणी) यांनी करून त्याप्रमाणे तसा अहवाल जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्याकडे सादर केल्यानंतर सदर अहवालानुसार जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त हे उर्वरित कामासाठी शासकीय अनुदानाची रक्कम बँकेकडे (कर्जप्रकरणी) अथवा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये (लाभार्थी हिस्सा प्रकरणी) जमा करतात.
 • संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी लाभार्थ्याने केलेले पक्षीगृहाचे बांधकाम व प्रकल्पासाठी उभारलेल्या मूलभूत सुविधांचे मूल्यांकन करून त्यानुसार लाभार्थ्यास देय अनुदानाची रक्कम निश्‍चित करून अदा करतात.
 • या योजनेअंतर्गत निवड केलेल्या लाभार्थ्यांना प्रतिवर्षी पाच ते सात बॅचेसमध्ये मांसल कुक्कुट पक्ष्यांचे संगोपन करावयाचे अाहे. त्यासाठी आवश्‍यक निविष्ठा (प्रत्येक बॅचसाठी १००० मांसल कुक्कुट पक्षी, त्यासाठी आवश्‍यक पक्षी खाद्य, औषधे इत्यादी) स्वखर्चाने उपलब्ध करून घेऊन सदर पक्ष्यांची विक्रीची व्यवस्था लाभार्थ्यांनी स्वतः करणे अपेक्षित आहे.

केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील परसातील कुक्कुटपालनास चालना देणे

केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रामध्ये परसातील कुक्कुटपालन व्यवसायास चालना देणे याबाबीस मान्यता दिलेली आहे. ही योजना २०११-२०१२ पासून राज्यात राबविण्यास राज्य शासनाची प्रशासकीय व वित्तीय मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत एकदिवसी पिले खरेदी, त्यांचे संगोपन व अानुषंगिक बाबी १०० टक्के अनुदानावर लाभार्थींना पुरविण्याकरिता राज्य शासनाचे पूरक अनुदान खाली नमूद तपशिलानुसार मंजूर करण्यात आले आहे :
एकदिवसीय पिलांची किंमत —- २० रुपये
प्रतिपक्षी ४ आठवडे वयापर्यंत संगोपनाअंतर्गत खाद्यावरील खर्च —- १५ रुपये
लसीकरण, औषध, वीज, पाणी, मजुरी इत्यादी प्रतिपक्षी —- १५ रुपये

 • केंद्र शासनाच्या मंजूर योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना मदर युनिटच्या माध्यमातून प्रतिलाभार्थी एकूण ४५ कुक्कुटपक्षी (चार आठवडे वयाचे) १०० टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येतात.
 • याअंतर्गत एकदिवसीय कुक्कुटपिलांची किंमत व त्यांच्या चार आठवडे वयापर्यंत संगोपनाचा खर्च मिळून एकूण खर्च प्रतिपक्षी ३० रुपये एवढा केंद्र शासनाने निर्धारित केला असून, प्रत्यक्षात एकदिवसीय पिलांची किंमत व त्याचा चार आठवडे वयापर्यंत संगोपनावरील (खाद्य, व्यवस्थापन, मजुरी, विद्युत इत्यादी) खर्च सद्यःस्थितीत प्रतिपक्षी ५० रुपये एवढा येतो. यापैकी केंद्र शासनाने मंजूर केलेले अनुदान ३० रुपये (प्रतिपक्षी) विचारात घेता, एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम या जिल्हास्तरीय योजनेच्या निधीतून उर्वरित अनुदान प्रतिपक्षी २० रुपये या दराने वा त्यापेक्षा प्रत्यक्ष खर्च कमी असल्यास त्या दराने एकदिवसीय कुक्कुटपिलांचे चार आठवडे वयापर्यंत संगोपन करण्यासाठी पूरक अनुदान म्हणून उपलब्ध करून देण्यास शासनाची प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
 • सदर योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी निवडण्यात येणारे सर्व लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असावेत. त्याचप्रमाणे सदरच्या लाभार्थीची टक्केवारी अनुसूचित जाती १६.२ टक्के, अनुसूचित जमाती ८ टक्के, विकलांग ३ टक्के व महिला ३० टक्के याप्रमाणे असणे अपेक्षित आहे.
 • लाभार्थीने पक्ष्यांचे लसीकरण करून घेणे आवश्‍यक आहे.
 • राज्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या हॅचर कम सेटर धारक लाभार्थीस निश्‍चित उत्पन्नाचे साधन प्राप्त व्हावे म्हणून या हॅचर सेटरमधून निर्मिती झालेल्या पिलांची प्राधान्याने मदर युनिटधारकांनी खरेदी करावी.
 • सदर योजनेत लाभार्थींना देय असणारे अनुदान हे पक्षी खरेदीसाठी देय असल्याने ते मदर युनिटधारकास त्यांच्याकडून योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या चार आठवडे वयाच्या पक्ष्यांच्या मोबदल्याच्या स्वरूपात देण्यात येते.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महिला बचत गट/ वैयक्तिक लाभार्थीस हॅचर कम सेटर संयंत्रांचे वाटप

 • परसातील कुक्कुटपालनास उपयुक्त अशा केंद्रीय पक्षी अनुसंधान केंद्र, बरेली या संस्थेच्या मान्यताप्राप्त गिरिराज, वनराज, कडकनाथ इत्यादी जातीच्या पिलांची निर्मिती लहान व मध्यम शेतकऱ्यास त्यांच्या ठिकाणीच करणे शक्य व्हावे, याकरिता महिला बचत गट/ वैयक्तिक लाभार्थीस या योजनेअंतर्गत हॅचर कम सेटर संयंत्रांचे अनुदानावर वाटप करण्यात येते.
 • योजनेतून खुल्या प्रवर्गातील लाभार्थींना प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के मर्यादेत शासकीय अनुदान देण्यात येते, तर अनुसूचित जाती/ जमातीच्या लाभार्थींना प्रकल्प खर्चाच्या ७५ टक्के मर्यादेपर्यंत शासकीय अनुदान मिळते.

लेखक: डॉ. धनंजय परकाळे
संपर्क: ०२० – २५६९०४८०
(लेखक पशुसंवर्धन आयुक्त कार्यालय, पुणे येथे उपआयुक्त पशुसंवर्धन (नियोजन व अंदाज) म्हणून कार्यरत आहेत.)

तुती रेशीम उद्योग
तुती रेशीम उद्योग

कृषिप्रधान भारतामधील महाराष्ट्राचे ग्रामीण भागात शेतीशी निगडीत असलेल्या रेशीम उद्योगातून अनेक शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावले आहे. या उद्योगातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन शहरांकडे जाणारा लोंढा थांबविण्यात काही अंशी मदत झालेली आहे. आज काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी एकात्मिक शेतीचा विचार करणे गरजेचे झाले आहे. यामध्ये इतर पिकांबरोबरच रेशीम उद्योगासारख्या महिन्याला उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेती उद्योगाचा विचार करणे व अंमलात आणणे आवश्यक आहे.

रेशमाचे प्रकार – अळीच्या खाद्य प्रकारावरून रेशमाचे 4 प्रकार पडलेले आहेत. तुती रेशीम, टसर रेशीम, मुगा रेशीम व एरी रेशीम हे ते 4 प्रकार. एकूण रेशीम उत्पादनाचे 90 ते 95 टक्के तुती रेशीमचे उत्पादन घेतले जाते. तसेच रेशमाच्या चारही प्रकारात हे उच्च दर्जाचे गणले जाते. महाराष्ट्रामध्ये तुती रेशीम व टसर रेशीम या दोन प्रकारचे रेशीम उत्पादन घेतले जाते. तुती रेशीम हे पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागातील 24 जिल्ह्यांमध्ये तर टसर रेशीम हे पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या 4 जिल्ह्यांमध्ये घेतले जाते. तुती रेशीम उद्योगासाठी लागणारे अंडीपूंजाचे उत्पादन गडहिंग्लज येथे करण्यात येते.

• तुती रेशीम उद्योग – राज्यातील भौगोलिक परिस्थिती व हवामान रेशीम उद्योगासाठी पूरक आहे. उन्हाळ्यातील काही महिने वगळता राज्यातील हवामान तुतीची वाढ जोमाने होण्यास पोषक आहे. यासाठी पर्जन्यमान 600 ते 2500 मि.मि./ वार्षिक तसेच पावसाळ्यात दहा दिवसांतून एकदा 50 मि.मि. पाऊस झाल्यास तुतीची चांगली वाढ होते. यासाठी जमीन ही खोल पाण्याचा योग्य निचरा होणारी, चांगल्या प्रकारे ओलावा टिकवून ठेवणारी व भुसभुशीत असावी. तसेच तापमान 13 ते 40 अंश सेल्सिअस, पाच ते दहा तास सूर्यप्रकाश या बाबी तुती वाढीस पोषक ठरतात.

• तुती रेशीम उद्योगाचे फायदे-

1. रेशीम उद्योगापासून नियमित शाश्वत उत्पन्न मिळू शकते.

2. एकदा तुती लागवड केली की 12 ते 15 वर्ष लागवडीचा खर्च येत नाही. तसेच एकदा किटक संगोपन गृह बांधले व साहित्य खरेदी केली की पुन्हा खर्च येत नाही.

3. तुती रोपांची लागवड केल्यापासून 3 ते 4 महिन्यात तुती बाग किटक संगोपनासाठी योग्य होते. त्यामुळे इतर व्यापारी पिके अथवा फळ बागेच्या तुलनेत तुती लागवडीपासून उत्पादन कमी कालावधीत सुरू होते.

4. कमी पाण्यातही तुती जगत असल्यामुळे उन्हाळ्यात अथवा दुष्काळात दोन महिने पाणी नसतानाही तद्नंतर मिळालेल्या पाण्यावर बागा पुन्हा उगवून येते.

5. किड व रोग तसेच नैसर्गिक आपत्ती जसे अवकाळी पाऊस, गारपीट पासून बागेस विशेष नुकसान होत नाही.

6. इतर बागायती पिकांच्या तुलनेत तुतीच्या झाडांना पाणी कमी लागते.

7. रेशीम अळ्यांच्या संगोपनासाठी पाला वापरला जात असल्याने तुती बागेस किटकनाशके बुरशीनाशके इत्यादी फवारणी खर्च येत नाही.

8. किटक संगोपन संपल्यावर तुती बागेत उरलेला पाला तसेच अळ्यांनी खाऊन राहिलेला पाला जनावरांना दिल्यास त्यांच्या दुधाच्या प्रमाणात व फॅटसच्या प्रमाणामध्ये वाढ होते. रेशीम उद्योग व शेळीपालन किंवा रेशीम उद्योग व दुध व्यवसाय यासारख्या जोड उद्योगांमध्ये शेतकरी चांगला जम बसवू शकतात.

9. संगोपानातील कचरा, काड्या, अळ्यांची विष्ठा, खाऊन राहिलेला पाला हे कुजवून चांगले खत तयार होते व हा काडीकचरा गांडुळास दिल्यास अतिशय चांगल्या प्रकारचे गांडूळ खत यापासून मिळते.

10.घरातील स्त्रीया, ज्येष्ठ माणसे आपली कामे सांभाळून हा उद्योग करु शकतात तसेच घरातील व्यक्तीद्वारे सहज व सुशिक्षित बेरोजगार यांना करण्यासारखा व 50 ते 60 टक्के महिलांचा सहभाग असणारा उद्योग आहे.

11. रेशीम अळ्यांचे योग्य संगोपन, अळ्यांना पुरेशी जागा व पोषक खाद्य दिल्याने 100 अंडीपुंजाला कमीत –कमी 60 किलो कोष उत्पादन होते.

12. उत्पादित केलेल्या कोषास शासनाचा हमीभाव रु. 178.50 प्रति किलो आहेच परंतु बाजारात त्याची किंमत सरासरी 300 रुपये प्रतिकिलो पेक्षा जास्त आहे. त्यामुळे 100 अंडीपुंजाचे पीक घेतले तर 18000 रुपये तर 200 अंडीपुंजाचे पीक घेतले तर 36000 रुपये एका पिकास 30 दिवसात मिळतात.

13. एका एकर बागेमधून वर्षाला कमीत कमी 4 पिके तर जास्तीत जासत 6 पिके घेता येतात. यावरुन वर्षाला कमीत कमी 1 लाख 20 हजार रुपये उत्पादन मिळते.

14. कोषापासून धागा काढून त्यापासून कापड तयार करणे हा मुख्य भाग असला तरीही याशिवाय कमी प्रतिच्या कोषापासून फुले, बुके, हार, तोरण, वॉल पिस या बाबी तयार करता येतात.

15. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला व्यवसाय.

• तुती रेशीम सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी –

1. शेतकऱ्यांकडे किमान अर्धा ते एक एकर पाण्याचा निचरा होणारी व आठमाही पाण्याची सोय असलेली जमीन

2. एक एकर तुती लागवडीसाठी 500 रुपये शासकीय नोंदणी फी जमा करावी लागते.

3. नोंदणीसाठी शेतीचा 7/12, 8 अ उतारा, आधार कार्ड, निवडणूक कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते व पासपोर्ट साईजचे दोन फोटो, मनरेगा करीता जॉब कार्ड आवश्यक आहे.

4. तुती लागवड करणे, किटक संगोपन साहित्य खरेदी व आदश्र किटक संगोपन गृह बांधकामाची क्षमता

5. रेशीम उद्योग करण्यासाठी मानसिक तयारी

• रेशीम उद्योगासाठी मिळणाऱ्या सोयी सवलती-

1. शासनामार्फत रेशीम उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, वेळोवेळी प्रत्यक्ष बागेस भेट देऊन तसेच मेळावे, चर्चासत्र, कार्यशाळा आयोजित करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यात येते.

2. मोफत प्रशिक्षण व अभ्यास दौरे आयोजित करुन शेतकऱ्यांना रेशीम उद्योग विषयी माहिती करुन दिली जाते.

3. म.गा.रो.ग्रा.ह. योजनेमध्ये किटक संगोपन गृह बांधकामासाठी 1000 स्क्वे. फुटासाठी 91863 रुपये, 600 स्क्वे. फुटासाठी 60229 रुपये तर 225 स्क्वे. फुटासाठी 33370 अनुदान देण्यात येते.

4. योजनेअंतर्गत गट रेशीम करिता तुती गट लागवड व किटक संगोपन करिता कुशल व अकुशल कामासाठी तीन वर्षात एकूण 1 लाख 98 हजार 812 रुपये देण्याची तरतूद आहे.

• केंद्र व राज्य शासनाच्या येाजना-

1. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजना :

या योजनेअंतर्गत शासन निर्णय क्रमांक मग्रारो 2014/प्र.क्र.79/रोहयो-5, दिनांक 31 मार्च 2016 अन्वये संपूर्ण राज्यात रेशीम उद्योग विकास योजना राबविणे व रेशीम किटक संगोपन गृह बांधकाम या दोन्ही योजना संयुक्तपणे राबविण्यास मान्यता दिली असून या योजनेमध्ये तुती लागवड, जोपासना, नर्सरी, कोष काढणे याबरोबरच किटक संगोपन गृह बांधकामासाठी अकुशल व कुशल कामाकरिता मोबदला देण्यात येतो. या योजनेमध्ये मिळणाऱ्या अनुदानाचा तपशील पुढील प्रमाणे..

मनरेगा अंतर्गत तुती लागवडीसाठी तीन वर्षात दिले जाणारे अनुदान तपशिल एकक: प्रती लाभार्थी एक एकर (रक्कम रुपयात)

अ.क्र. वर्ष मजुरी अकुशल सामुग्री कुशल एकूण रुपये
1 प्रथम 56682 32160 88842
2 द्वितीय 40200 19285 59485
3 तृतीय 40200 10285 50485
  एकूण 137082 61730 198812

मनरेगा अंतर्गत किटक संगोपन गृह बांधकामासाठी दिले जाणारे अनुदान (रक्कम रुपयात)

अ.क्र. किटक संगोपन गृहाचा प्रकार मजुरीअकुशल सामुग्रीकुशल एकूण अनुदान देय वर्ष
1 मॉडेल-1(1000 चौ.फु.) 42813 49050 91863 प्रथम वर्ष
2 मॉडेल-2(600 चौ.फु.) 25929 34300 60299 प्रथम वर्ष
3 मॉडेल-3(225 चौ.फु) 14070 19300 33370 प्रथम वर्ष

• पात्र लाभार्थी निकष पुढीलप्रमाणे –

1. अनुसूचित जाती

2. अनुसूचित जमाती

3. भटक्या जमाती

4. भटक्या विमुक्त जमाती

5. दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे

6. महिला प्रधान कुटुंबे

7. शारिरीक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंबे

8. भूसूधार योजनेचे लाभार्थी

9. इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी

10. अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन्य निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार पात्र लाभ व्यक्ती

11. कृषि कर्ज माफी योजना सन 2008 नुसार अल्प भूधारक (एक हेक्टरपेक्षा जास्त दोन हेक्टरपर्यंत) व सिमांत शेतकरी (एक हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र)

• मजुरी अंतर्गत समाविष्ट कामे – जमीन तयार करणे, शेणखत पसरविणे, सरी वरंबे तयार करणे, तुती रोपे लागवड, आंतर मशागत, खते व औषधी देणे, तुती छाटणी, गळ फांद्या काढणे, फांदी कापणे, शेड निर्जंतुकीकरण, चॉकी किटक संगोपन व कोष काढणे (एकूण 682 मनुष्य दिवस 201 रुपये प्रती मुनष्य दिवस याप्रमाणे)

• मनरेगाचा लाभ घेण्याकरिता आवश्यक बाबी-

1. लाभार्थी मनरेगा निकषाप्रमाणे पात्र असावा.

2. किमान अर्धा ते एक एकर सिंचनाची सुविधा असलेली बागायती स्वत:च्या मालकीची जमीन असावी.

3. शासनाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे गटाने रेशीम शेती करण्याची तयारी असावी.

4. ग्रामपंचायतीचा मनरेगाच्या कृती आराखड्यामध्ये समावेश आवश्यक

5. ग्रामसभेचा ठराव आवश्यक

6. पाणी उलब्धता प्रमाणपत्र आवश्यक

7. तुती रोपापासून लागवड करण्याची तयारी असावी

8. लाभार्थी स्वत: जॉब कार्डधारक असून शेतीमध्ये काम करणे आवश्यक आहे.

• आवश्यक कागदपत्रे –

मनरेगा जॉब कार्ड, आधार कार्ड, बॅंक पासबुक, फोटो, 7/12, 8अ, पाणी उपलब्धता, ग्रामसभेचा ठराव.

• संपर्क –

• रेशीम विकास अधिकारी

जिल्हा रेशीम कार्यालय

प्लॉट नं. 15, प्रोझोन मॉलसमोर

सिडको एन-1, औरंगाबाद

संपर्क- 0240 -2475747

ठाणबंद पध्दतीने शेळी पालन
ठाणबंद पध्दतीने शेळी पालन

शेळी पालन ठाणबंद पध्दत

राज्यामध्ये शेळीपालन योजना राबविणेकरिता महामंडळाने रू.100.00 कोटी एवढा निधीची शासनाकडे मागणी करण्यांत आली आहे. या योजनेंतर्गत शेळी-मेंढीपालकांना प्रोत्साहन मिळावे या दृष्टीने 20% अनुदान, 6% व्याजदराने कर्ज देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. महामंडळास उपलब्ध होणा-या रू.100.00 कोटी निधीमधून प्रस्तावित करण्यात येणा-या शेळीगटासाठी आवश्यक असलेल्या अनुदान आणि कर्जाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. तपशील 10+1 20+1 50+2 100+4
1 प्रतिगट किंमत Rs.1,09,902/- Rs.2,09,045/- Rs.5,00,187/- Rs.1,00,350/-
2 प्रस्तावित गटांची संख्या (लाभधारक) 3828 828 424 245
3
अ) शासनाचे लागणारे अर्थसहाय्य ,अनुदान 20 टक्के (रू.लाख) 841.39 346.17 424.15 490.17
ब) कर्ज 75 टक्के, 6 टक्के व्याजदराने (रू.लाख) 3155.26 1298.17 1590.59 1838.14
एकूण 3996.65 1644.34 2015.74 2328.31

'अनारनेट' डाळिंब निर्यातीची कार्यपद्धती
'अनारनेट' डाळिंब निर्यातीची कार्यपद्धती

कृषीमालाची एका देशातून दुसऱ्या देशात निर्यात होत असताना किडी व रोगांचा प्रसार  होऊ नये, तसेच त्यावर नियंत्रण रहावे म्हणुन जागतिक अन्न  संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सन १९५१ मध्ये अंतरराष्ट्रीय पिकसंरक्षण करार  ( (International Plant Protection Convention 1951) करण्यात आलेला आहे. हा करार आंतरराष्ट्रीय पीकसंरक्षण करार म्हणून ओळखला जातो. सदर कराराचा मुख्य उद्देश असा आहे, की कृषिमाल निर्यातीद्वारे कोड व रोगांच्या प्रसारामुळे मानव, प्राणी व पिकांना हानी होऊ नये. तसेच त्यांचा संरक्षणासाठी व ग्राहकाच्या आरोग्याच्या हितासाठी योग्य त्या कार्यप्रणालीचा अवलंब करण्याचा अधिकार प्रत्येक सदस्य देशांना आहे. सध्या या कराराचे १६५ देश सदस्य असुन भारत हा कराराचा सदस्य देश आहे. जागतिक व्यापार संघटनेत सन १९९५ साली ‘कृषि’ या विषयाचा प्रथमतः समावेश करण्यात आला आहे. जागतिक व्यापार संघटनेमध्ये कृषिविषयक विविध करार करण्यात आलेले आहेत. त्यामधील सॅनिटरी व फायटोसॅनिटरी करार (SPS Agreement) अत्यंत महत्वाचे आहे.

त्यानुसार प्रत्येक देशास ग्राहकाच्या रोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातुन अटी व नियमांचे बंधन घालण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार युरोपियन युनियनने किडनाशक अंश नियंत्रणाच्या हमीबाबत खास नियम तयार केलेले आहेत. भारत हा जगातील प्रमुख डाळिंब उत्पादक देश आहे. तर महाराष्ट्र हे मोठया प्रमाणात वाढ होत आहे. राज्यात डाळिंबाची लागवड प्रामुख्याने नाशिक, सोलापूर, अहमदनगर, सांगली, पुणे, सातारा, उस्मानाबाद या औरंगाबाद, जळगाव व धुळे या जिल्ह्यांतही क्षेत्र वाढत आहे. भारतातून डाळिंब निर्यात ही प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती, बहरीन, ओमान, सौदी अरेबिया, श्रीलंका व बांग्लादेश इत्यादी देशांना केली जात होती. परंतु मागील २ वर्षापासून युरोपियन युनियनमधील इंग्लंड, जर्मनी, युनायटेड किंगडम, फ्रान्स, नेदरलँड, बेलाजियम इत्यादी देशांतही डाळिंबाच्या निर्यातीत वाढ होत आहे.

अ.क्र. देश वजन (मे.टन) 2015-26 मूल्य (कोटीत ) 2015-26
1 नेदरलॅड १०३२ २१
2 युनायटेड किंगडम ४४१ १५
3 युनायटेड अरब अमिराती १७३२० २५४
4 सौदी अरेबिया २५५८ ३२
5 नेपाळ १४८३
6 बांग्लादेश २६५०
7 इतर ६९०४ ८३

अरेबियन देशापेक्षा युरोपियन देशांचे गुणवत्ता, किडनाशक उर्वरित अंश आणि किडी व रोगांबाबत निकष हे अत्यंत कडक आहेत. निर्यातीकरिता युरोपियन देशांमध्ये जास्त संधी असल्याने त्या देशातील अटी व शर्तीच्या पुर्ततेची हमी देण्याकरीता सन २०१४-१५ पासुन राज्यात युरोपियन देशांना डाळिंब निर्यातीकरीता कोडनाशक उर्वरित अंश नियंत्रण (RMP) करण्यासाठी ‘अनारनेट’ द्वारे अंमलबजावणी करण्यात येत आहे.

युरोपियन देशांना डाळिंब निर्यातीकरिता आरएमपी (रेसिड्यु मॉनिटरींग प्लॅन – अनारनेट) युरोपियन देशांना निर्यात होणा-या डाळिंबामधील किडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाबाबत अपेडा, कृषि विभाग, डाळिंब संशोधन केंद्र व डाळिंब निर्यातदार

व डाळिंब उत्पादक यांचेशी तसेच युरोपियन युनियनने केलेल्या सुचना व इतर सर्व बाबींचा विचार करुन चालु वर्षापासून युरोपियन देशांना डाळिंब निर्यातीकरीता किडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाबाबत ‘अनारनेट’द्वारे ऑनलाईन नियंत्रणाचे काम कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

‘आरएमपी’ चा मुख्य उद्देश

 1. निर्यातक्षम डाळिंब बागेतील कोडनाशकाचे उर्वरित अंश नियंत्रण करणे.
 2. निर्यातक्षम डाळिंब बागेतील किडी व रोगांच्या नियंत्रणाकरीता राष्ट्रीय संशोधन केंद्र यांनी शिफारस केलेल्या औषधांचा वापर करणे.
 3. कीडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाच्या आराखड्यानुसार विहित करण्यात आलेल्या उर्वरित अंशाच्या प्रमाणापेक्षा उर्वरित अंशाचे प्रमाण जास्त आढळून आले तर त्यासाठी योग्य ती सुधारणा करण्याकरीता पध्दत विहीत करणे व त्यानुसार शेतक-यांना मार्गदर्शन करणे.
 4. इंटरनेट अलर्ट माहिती संदर्भात योग्य ती उपाययोजना/अंमलबजावणी करण्याची पध्दत विहित करणे.

निर्यातक्षम डाळिंब बागांची नोंदणी करण्याची पध्दत

युरोपियन देशांना डाळिंब निर्यात करु इच्छिणा-या डाळिंब बागायतदारांना त्यांच्या डाळिंब बागेची कृषि विभागाकडे ‘अनारनेट’द्वारे नोंदणी करणे सन २०१४-२०१५ पासून बंधनकारक करण्यात आलेले आहे. सन २०१६-१७ या वर्षांमध्ये युरोपियन युनियन व इतर देशांना ताजी फळे व भाजीपाला निर्यात करू इच्छिणा-या उत्पादकांना त्यांच्या बागांची/शेतांची नोंदणी/नुतणीकरण, हॉर्टीनेट ट्रेसेबिलीटी प्रणालीमध्ये नोंदणी करण्याकरीता महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये नोंदणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे.

 1. निर्यातक्षम शेतांची नोंदणी/नुतणीकरणास व्यापक प्रसिध्दी देण्यासाठी व नोंदणी/नुतणीकरण वेळेत करण्याकरीता स्थानिक वर्तमानपत्र, आकाशवाणी तसेच दूरदर्शनवरून इ.विविध प्रसिध्दी माध्यामांव्दारे प्रसिध्दी देण्यात येते.
 2. निर्यातक्षम डाळिंब उत्पादकांच्या तालुकास्तरावर बैठका आयोजित करून युरोपियन देशांना फळे व भाजीपाला निर्यात करू इच्छिणा-या उत्पादकांना त्यांच्या शेताची नवीन नोंदणी/नुतणीकरण करण्याकरीता मार्गदर्शन केले जाते.
 3. निर्यातक्षम डाळिंब बागांची नोंदणी करण्याकरिता प्रति प्लॉट (१ हेक्टर क्षेत्र ) याकरिता रु. ५0 एवढी फी निश्चित करण्यात आली आहे.
 4. अर्जासोबत बागेचा स्थळदर्शक नकाशा व गाव नमूना नं. सात बारा या उता-याची प्रत जोडणे आवश्यक आहे.
 5. नोंदणीचा कालावधी माहे १ ऑक्टोबर २०१६ ते ३१ जानेवारी, २0१७ असा राहील.
 6. खास मोहिम घेऊन सर्व अर्ज तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात स्विकारण्याची व्यवस्था आहे. नवीन नोंदणी  नुतणीकरण करण्याकरिता प्राप्त झालेल्या अर्जामधील माहिती अपेडाच्या वेबसाईटवर (http ://apeda .gov.in )
 7. करण्याची कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरुन निर्यातक्षम शेतांची नोंदणी/नोंदणीचे नुतणीकरण वेळेत करून शेतक-यांना नोंदणी प्रमाणपत्र त्वरीत उपलब्ध करून देणे शक्य होईल.
 8. सदर कामाकरिता तालुकास्तरावर एका स्वतंत्र कर्मचा-याची नियुक्ती करून सदरचे काम प्राधान्याने केले जाते.
 9. यासंबंधीचे सर्व प्रपत्रे http ://apeda .gov .in या संकेतस्थळावर  हॉर्टीनेट या लिंकवर उपलब्ध आहेत.

नोंदणी अधिका-यांची कर्तव्ये व जबाबदा-या

 1. निर्यातक्षम शेतांची नोंदणी करण्यासाठी कार्यक्षेत्रातील शेतक-यांमध्ये विविध प्रचार व प्रसार माध्यमांद्वारे जागृती करणे.
 2. निर्यातक्षम शेतांची नोंदणी करण्याकरिता शेतक-यांनी करावयाचा अर्ज, तपासणी अनेक्झर/प्रपत्र (४अ व ४ ब), पाक्षिक कोड/रोग सर्वेक्षण अहवाल (अपेंडीक्स सी), नोंदणीकृत शेतक-यांनी ठेवावयाचे अभिलेख (अनेक्झर/प्रपत्र २अ) इ. विविध प्रपत्रे तीन प्रतीत छपाई करून घेणे.
 3. अर्ज प्राप्त झालेल्या शेतांची तपासणी करून घेऊन त्यांची नोंदणी करणे.
 4. नोंदणी प्रमाणपत्र प्रिंटींगकरिता हिरव्या रंगाचा कागद वापरणे.
 5. नोंदणी केलेल्या उत्पादकांना पिकावरील किडी व रोगांचे नियंत्रण करण्याकरिता केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोंदणी समिती यांनी असलेली कीडनाशके वापरण्याबाबत तसेच संबंधित पिकासाठीच्या सुधारित पीक उत्पादन पद्धती, एकात्मिक कोड व्यवस्थापन, कोडनाशक उर्वरित अंश पातळी इ. विषयी शेतक-यांना प्रशिक्षित
 6. नोंदणी केलेल्या शेतांतील पिकांवरील किडींच्या स्थितीबाबत पाक्षिक अहवाल तयार करून तो शेतकरी, निर्यातदार, पॅकहाऊसधारक यांना उपलब्ध करून देणे.
 7. कार्यशाळा आयोजित करून शेतकरी, तपासणी अधिकारी व समन्वय अधिकारी यांना प्रशिक्षण देणे.
 8. तपासणी अधिकारी व समन्वय अधिकारी यांच्या कामाचे पर्यवेक्षण करणे.

नोंदणी करण्याकरीता शेतक-यांनी खालील कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे.

 1. विहीत प्रपत्रात अर्ज
 2. ७/१२ उतारा
 3. बागेचा नकाशा
 4. तपासणी अहवाल प्रपत्र (४अ)
 5. फी रु. ५o/- प्रति प्लॉट (१ हेक्टर क्षेत्राकरीता)

वरीलप्रमाणे सर्व माहिती संबंधित मंडळ कृषी  अधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर मंडळ कृषि अधिका-यांमार्फत बागेची प्रत्यक्ष तपासणी करुन प्रपत्र (४अ) मध्ये तपासणी अहवाल तयार करुन संबंधित शेतक-यांचा प्रस्ताव नोंदणी अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या

कार्यालयाकडे पाठविल्यानंतर ‘अनारनेट’ऑनलाईन नोंदणी करण्यात येते व संबंधित शेतक-यांना एक वर्षाकरीता युरोपियन देशांना डाळिंब कोड, तालुका कोड, गाव कोड, फार्म व प्लॉट कोड नंबर संगणकाद्वारे देण्यात येतो. त्या नंबरनुसार पुढील सर्व कार्यवाही ऑनलाईनद्वारे करण्यात येते.

सन २०१६-१७ करीता युरोपियन देशांना डाळिंब निर्यातीकरीता नोंदणी करण्याचे काम ऑनलाईन पध्दतीने सुरु आहे. त्याची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. जिल्हा नोंदणीकृत  बागांची संख्या (सन २०१५-१६)
नाशिक ६८
जळगाव ३१
धुळे २२
अहमदनगर ३६९
पुणे ३७६
सोलापूर ६२६
सातारा ५७
सांगली १७१
कोल्हापूर ११
१० औरंगाबाद २९
११ बीड १०
१२ जालना १०
१३ लातूर
१४ उस्मानाबाद २०
१५ बुलडाणा ११८
एकूण १९२१

नोंदणीकृत बागायतदारांच्या जबाबदा-या व कर्तव्ये

 1. डाळिंब बागेतील कोड व रोगांच्या नियंत्रणाकरीता आरएमपी व शिफारस केलेल्या औषधांचा वापर करणे व त्यांचा सविस्तर तपशील विहीत केलेल्या प्रपत्रात ठेवणे.
 2. मुदतबाह्य व बंदी घातलेल्या औषधांचा वापर न करणे.
 3. एकाच औषधाची सलग फवारणी न करणे.
 4. उर्वरित अंश तपासणी करण्याकरीता नमुने घेतल्यानंतर औषधाची फवारणी न करणे.
 5. औषधांच्या पीएचआर अनुसार औषधांची फवारणी करणे.
 6. खरेदी केलेल्या सर्व औषधे व खतांचे रेकॉर्ड ठेवणे.
 7. उर्वरित अंश तपासणी करण्याकरीता नमुने घेण्यापुर्वी तपासणी अधिका-यांकडुन निर्यातक्षम डाळिंब बागांची प्रपत्र (४अ) मध्ये तपासणी करुन घेणे.
 8. युरोपियन देशांना डाळिंब निर्यातकरीता ऑनलाईन (अनारनेट) द्वारे फायटोसॅनेटरी प्रमाणपत्र देण्याकरीता पुणे, नाशिक, सांगली व सोलापूर येथे कृषि विभागामार्फत सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत.

डाळिंब निर्यात करु इच्छिणा-या उत्पादक शेतकरी निर्यातदारांनी त्यांची माहिती कृषि विभागाकडे देणे आवश्यक आहे.

नोंदणीकृत डाळिंब बागायतदारांनी ठेवावयाचे रेकॉर्ड

 1. डाळिंब बागेवरील कोड व रोगांच्या नियंत्रणाकरीता वापरण्यात आलेल्या किडकनाशकाचा सविस्तर तपशिल विहीत प्रपत्रात ठेवणे.
 2. औषधे व खते खरेदीचा तपशिल ठेवणे.
 3. डाळिंब बागेच्या नोंदणीनंतर उर्वरित अंश तपासणी करण्यापूर्वी प्रपत्र ४अ व ४ब मध्ये तपासणी अधिका-यामार्फत बागेची तपासणी करुन घवून त्याचे रेकॉर्ड ठेवणे.
 4. उर्वरित अंश तपासणीकरीता डाळिंबाचे नमुने घेतल्यानंतर बागेत औषध फवारणी केली नसल्याचे हमीपत्र देणे.

निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन

जागतिक बाजारपेठेतील गुणवत्तेची मागणी लक्षात घेवून डाळिंबाचे निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी शेतक-यांनी खालील बाबीस विशेष महत्व दिले पाहिजे.

 1. डाळिंब फळाची गुणवत्ता, आकार, रंग इत्यादीकरीता एकात्मिक सुक्ष्मद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करणे.
 2. डाळिंब फळावरील किडी व रोगांच्या नियंत्रणाकरीता एकात्मिक किड व्यवस्थापनाची अंबमलबलावणी करणे.
 3. फळामधील कोडनाशक उर्वरित अंशचे प्रमाण शक्य मर्यादेच्या आत राहण्यासाठी एकाच औषधाचा सलग वापर न करणे.
 4. रासायनिक खते व रासायनिक औषधाचा गरजेनुसार व आवश्यकतेनुसार वापर करणे.
 5. डाळिंबावरील किडी व रोगांचे विशेषतः तेल्या रोगाच्या नियंत्रणासाठी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांनी शिफारस केलेल्या औषधांचाच वापर करणे.
 6. गुड अॅग्रीकल्चर प्रॅक्टीसेसचा (GAP) वापर करण्यासाठी ग्लोबलगॅप प्रमाणिकरण करुन घेणे. ७) फळांची काढणी, वाहतुक, हातळणी, पॅकिंग व लेबलींग योग्य प्रकारे करणे व त्याकरीता योग्य त्या सुविधा निर्माण करणे.
 7. फळांची प्रतवारी आकार, रंग व वजनानुसार करणे.
 8. वर्ग-१ दर्जाच्या मालाचे जास्तीतजास्त उत्पादन घेण्यासाठी नियोजन करणे.

युरोपियन देशांना डाळिंब निर्यातीकरीता फायटोसॅनिटरी प्रमाणापत्र घेणे बंधनकारक आहे. कृषि विभागामार्फत कृषि प्रक्रिया व नियोजन विभाग, कृषि आयुक्तालय, साखर संकुल, पुणे-५ व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयातून डाळिंब निर्यातीकरीता फायटोसॅनिटरीचे प्रमाणपत्र देण्यात येते.

निर्यातीसाठी डाळिंबाची गुणवत्ता खालीलप्रमाणे असावी

 1. बियांचा रंग गडद गुलाबी असावा.
 2. फळांचे वजन अंदाजे ३५0 ग्रॅम ते ४५0 ग्रॅम दरम्यानच असावे.
 3. फळांचे कोपरे कमी होऊन गोलाई आलेली असावी.
 4. सारख्या आकाराच्या फळांची एकत्र रचना करावी.
 5. सुमारे १७ टक्के ब्रिक्स असावा.
 6. फळे स्वच्छ, फळांवर ओरखडे, डाग, रोगाची लक्षणे, कीटकांनी पडलेले डाग नसावेत.
 7. फळांचा रंग तजेलदार, आकर्षक असावा व दाण्यांची चव चांगली असावी.
 8. फळांमध्ये काळे दाणे नसावेत.
 9. योग्य पक्वतेला काढणी करावी. (फळधारणेनंतर १३५ दिवसांच्या आत फळांची काढणी करावी.) १o)निर्यातीसाठी डाळिंब पाठविताना आयातदारांच्या मागणीनुसार पॅकिंग करावे. आखाती देशात प्रामुख्याने ५ किलो डाळिंबाचे पॅकिंग करावे लागते. इंग्लंड/युरोपियन देशात ३ ते ४ किलो डाळिंब पॅकिंग करावे लागते.

घ्यावयाची काळजी व उपाय

 • डाळिंब पिकावरील किडी व रोगांचे नियंत्रण करण्याकरिता शिफारस केलेल्या औषधांचाच (कीटकनाशके/ बुरशीनाशके) वापर करण्यात यावा. शिफारस न केलेल्या व वापरास बंदी घातलेल्या औषधांचा वापर करु नये.
 • औषधांची फवारणी शिफारस केलेल्या मात्रेत आणि योग्यवेळी व योग्य प्रमाणात करणे.
 • युरोपियन कमिशन/कोडेक्स अलियेनटॉस कमिशन यांनी निर्धारित केलेल्या मर्यादेच्या आत उर्वरित अंशचे प्रमाण असणे आवश्यक आहे.
 • औषधांची फवारणी प्रशिक्षित व्यक्तिद्वारे व योग्य त्या मात्रेत व योग्य पध्दतीने करणे.
 • वापर करण्यात आलेल्या औषधांचा तपशील ठेवणे.
 • डाळिंबाची काढणी व अंतिम फवारणीमध्ये किती अंतर ठेवले होते, याचा तपशील ठेवणे.
 • फवारणी करण्याकरीता वापरण्यात आलेले फवारणी यंत्र व औषधे, कंटेनरची स्वच्छता काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. जेणेकरुन
 • कीड  व रोगांच्या नियंत्रणाकरीता शिफारस केलेल्या औषधांची खरेदी ही अधिकृत किटकनाशक विक्रेत्याकडून रितसर पावती घेवून करावी.
 • निर्यातक्षम डाळिंब बागेतील डाळिंबाचा रॅण्डम पध्दतीने नमुना काढणीच्या एक महिना अगोदर घेवून त्यामधील उर्वरित अंश तपासणीकरिता उर्वरित चाचणी प्रयोगशाळेत पाठविताना नमुन्यासोबत स्पेअर शेडयुलची माहिती देण्यात यावी.
 • डाळिंब पिकावरील किडी व रोगांच्या प्रभावीपणे नियंत्रण करण्याकरीता एकात्मिक किड व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करावा.
 • उर्वरित अंश चाचणी प्रयोगशाळेतील अहवालात उर्वरित अंशाचे प्रमाण शक्य मर्यादेच्या आत असेल तरच निर्यातीकरीता डाळिंबाची काढणी करावी.

डाळिंब निर्यातीकरीता खालील बाबींची पुर्तता करणे आवश्यक आहे.

 1. विहित प्रपत्र -१ मध्ये अर्ज
 2. आष्यातदार व निर्यातदार यांच्यात करण्यात आलेल्या कराराची प्रत (पहिल्यांदा)
 3. प्रोफार्मा इनव्हाईसाची प्रत।
 4. पॅकिंग लिस्ट
 5. आयात निर्यात कोड नंबर (पहिल्यांदा)
 6. कीटकनाशक उर्वरित अंश तपासणी अहवाल (युरोपियन देशांकरिता आवश्यक
 7. प्रतवारी एगमार्क प्रमाणपत्र (युरोपियन देशांकरिता आवश्यक )
 8. विहित फी

वरील सर्व कागदपत्राची पुर्तता केल्यानुसार संबंधित मालाची प्रत्यक्ष पहाणी करुन आयातदार देशाच्या निकषानुसार मालाची गुणवत्ता आहे किंवा कसे तसेच कोड व रोगमुक्त असल्याची खात्री करुनच संबंधित आयातदार देशाच्या प्लॅट क्वारनटाईन अॅथॉरिटीचे फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र दिले बाजारपेठ ही स्पर्धेची बाजारपेठ आहे. त्या बाजारपेठेमध्ये वेळोवेळी होणा-या बदलाची माहिती अद्ययावत करुन घेण्यासाठी वेबसाईटचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण बरीचशी बाजारपेठांची अद्ययावत माहिती व क्वारनटाईन विषयक माहिती ही वेबसाईटवर उपलब्ध होत असल्याने त्याचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच डाळिंबाच्या गुणवत्ता व इतर हमीकरीता प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. त्याचा फायदा निर्यातीबरोबरच स्थानिक बाजारपेठेतील सुपरमॉलद्वारे विक्रीकरीता निश्चित होणार आहे.

युरोपियन देशांना डाळिंबाची निर्यात करण्याकरीता जास्तीतजास्त तसेच ज्या डाळिंब उत्पादक शेतक-यांनी अनारनेटद्वारे बागेची नोंदणी केलेली आहे. त्यांनी २0१६ या वर्षांकरिता त्यांच्या डाळिंब बागांचे नुतणीकरण करुन घेणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी डाळींब उत्पादक शेतक-यांनी संबधित तालुक्यातील क्षेत्रिय पातळीवर काम करणारे तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. अनारनेटबाबत अधिक माहिती www.apeda.com या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शिवाजीनगर, पुणे-५ या कार्यालयाशी संपर्क साधावा.

स्त्रोत – कृषी विभाग महाराष्ट्र शासन

कृषी उद्योजकता विकास (भाग-2)
कृषी उद्योजकता विकास (भाग-2)

‘कृषी उद्योजकता विकास कार्यक्रम’ चा उद्देश, अर्थसहाय्य लाभार्थी निवड, अटी-शर्ती, अंमलबजावणी आदींबाबतच्या सविस्तर मार्गदर्शनाच्या‍ लेखाचा भाग दुसरा….

उपक्रमाची अंमलबजावणी

1. या उपक्रमाची अमलबजावणी प्रत्येक जिल्ह्याच्या कृषी पणन तज्‍ज्ञ यांच्या माध्यमातून करण्यात येईल. त्यासाठी कृषी पणन तज्‍ज्ञ हे सदर उपक्रमाची माहिती लाभार्थींना व्हावी यासाठी वर्षाच्या सुरूवातीलाच आत्मा अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध जिल्हा व तालुकास्तरीय आत्मा अंतर्गत बैठका (GB, AMC. DFAC & BFAC), कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम, चर्चा, प्रत्यक्ष भेटी इत्यादी उपस्थित राहून माहिती देतील यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्वतंत्र कार्यशाळा सुद्धा आयोजित करतील. यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन प्रकल्प संचालक, आत्मा हे करतील.
2. इच्छुक लाभार्थी संस्थांनी सदर उपक्रमांतर्गत सहभाग नोंदवण्यास स्वारस्य दाखवल्यास त्यांची नोंदणी करावी. त्यांच्या सोबत विशेष चर्चा घडून आणून पूर्वसंमती विषयक अर्ज भरून घ्यावा व त्यासाठी कालमर्यादा ठरवून घ्यावी. ठराविक कालावधीत प्राप्त झालेल्या पूर्व संमतीचे अर्ज जिल्हास्तरीय छाननी समिती पुढे सादर करावेत.
3. जिल्हास्तरीय समितीच्या छाननी नंतर व त्यांच्या मार्गदर्शनानुसार प्राप्त झालेल्या पूर्व संमती अर्जामधून पूर्व संमती प्राप्त झालेल्या अर्जदारांना सविस्तर प्रकल्प अहवाल पाठविणेसाठी लेखी कळवावे. त्यासाठी मार्गदर्शन सूचनांबरोबर देण्यात आलेल्या प्रपत्र चा उपयोग करावा.
4. प्रकल्पाच्या अर्जाचे नमुने, अर्जासोबत सादर करावयाच्या कागदपत्रांची सूची हे तालुका कृषी अधिकारी कार्यालय, शेती सल्ला व माहिती केंद्र व महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पाचे संकेतस्थळावर उपलब्ध असतील.
5. कृषी पणन तज्‍ज्ञ हे ई.डी.पी. प्रकल्पासाठी प्राप्त प्रस्तावांचे स्वतंत्र रजिस्टर ठेवतील, ई.डी.पी. प्रस्तावाचे अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करतील. आत्मा कार्यालय सदर प्रकल्प ए.बी.पी.एफ. विभागीय कार्यालयास तपासणीसाठी पाठवेल (ए.बी.पी.एफ. यांच्या विभागीय सल्लागाराची नेमणूक होई पर्यंत सदर प्रस्तावाची छाननी जिल्हास्तरीय समिती मार्फत केली जाईल.)
6. विभागीय ए.बी.पी.एफ. सल्लागारांकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांची तांत्रिक व आर्थिक क्षमता पडताळून बँकेबल रिपोर्ट (प्रस्ताव) तयार करतील. सदर प्रस्ताव 15 दिवसांच्या आत ए.बी.पी.एफ. सल्लागार यांनी आत्मा कार्यालयास सादर करावा.
7. प्राप्त झालेले प्रकल्प अहवाल जिल्हास्तरीय छाननी समितीच्या शिफारशीनुसार, राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्यात यावे. राज्यस्तरीय समितीच्या मान्यतेनंतर प्रकल्पाची अंमलबजावणी प्रकल्प संचालक, आत्मा करतील.

प्रकल्पांची मंजुरी व अनुदान प्रक्रिया

पहिला टप्पा उपलब्ध अनुदानाच्या आधिन राहून राज्यस्तरीय समिती मार्फत निवड करण्यात आलेल्या कृषि उद्योजक संस्थांना आवश्यक त्या बाबींचा सखोल अभ्यास करून देय असलेल्या घटकांवर एकूण प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा अधिकतम रुपये 10 लाख ऐवढे अर्थ साहाय्य देय राहील. परंतु वेगवेगळ्या प्रकल्पांच्या बाबतीत ही मर्यादा त्या प्रकल्पाच्या एकूण प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा रुपये 10 लाख एवढे या मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रकल्पातील देय असलेल्या घटकांशी निगडीत असल्याने रु. 10 लाख मर्यादेपेक्षाही कमी असू शकते.

प्रकल्प संचालक, आत्मा, प्रकल्प उपसंचालक, आत्मा 2 व कृषि पणन तज्‍ज्ञ यांनी मिळून मोका तपासणी करणे. राज्यस्तरीय समिती जिल्हास्तरावरुन आलेल्या प्रकल्प अहवालांची कृषि व्यवसाय प्रोत्साहन सुविधा या घटकामार्फत तपासणी करून त्यांना मंजूरी देईल व अर्थसहाय्यासाठी प्राधान्यक्रम ठरवेल. संबंधीत जिल्ह्यांच्या प्रकल्प संचालक, आत्मा यांना कळविणे, प्रकल्प संचालक, आत्मा हे संबंधीत लाभार्थीला कळवतील.

पहिला टप्पा वितरित करणे एकूण अनुदानाच्या 50 टक्के ऐवढे अनुदान देय राहील. प्रकल्प पूर्ण कार्यान्वित झाल्यानंतर (उत्पादन सुरू झाल्यांनतर) मोका तपासणी करुन दुसरा टप्‍प्याचे अनुदान वितरित करण्यात येईल.

प्रस्ताव सादर करण्यासाठी निर्देशक पुढीलप्रमाणे

महाराष्ट्र कृषि उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत प्रस्ताव सादर करण्याकरिता प्रथम संबंधीत लाभार्थ्यांने आपला प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी/तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याकडे सादर करावा. त्यानंतर तो प्रस्ताव आत्मा कार्यालय, ए.बी.पी.एफ. विभागीय कार्यालय, जिल्हास्तरीय समिती आत्मा यांच्याकडे येतो. सदरील समितीकडून मंजूर झालेला प्रस्ताव पी.आय.यु. (कृषि), एम.ए.सी.पी. कडे जातो व तेथून अंतिम मंजूरीसाठी राज्यस्तरीय समितीकडे जातो व या प्रस्तावाबाबत राज्यस्तरीय समितीमध्ये चर्चा होऊन परिपूर्ण प्रस्तावास ही समिती मान्यता देते. राज्यस्तरीय समिती, पी.आय.यु.(कृषि), एम.ए.सी.पी., जिल्हास्तरीय समिती आत्मा, ए.बी. पी. एफ. विभागीय कार्यालय, आत्मा कार्यालय, तालुका कृषि अधिकारी/तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, लाभार्थी.

जिल्हास्तरीय छाननी समिती

1. प्रकल्प संचालक, आत्मा-अध्यक्ष.
2. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी – सदस्य. 
3. जिल्हा पणन व्यवस्थापक-सदस्य.
4. कृषि पणन तज्‍ज्ञ-सदस्य. 
5. जिल्हा स्तरावरील अग्रणी बँक व्यवस्थापक-सदस्य. 
6. जिल्हा उप महाप्रबंधक नाबार्ड-सदस्य.
7. सल्लागार, ए.बी.पी.एफ. विभागीय प्रतिनिधी-सदस्य. 
8. प्रकल्प उपसंचालक, आत्मा (प्रशिक्षण व पणन)-सदस्य सचिव.

जिल्हास्तरीय छाननी समितीच्या जबाबदाऱ्या

1. एम.ए.सी.पी. प्रकल्पांतर्गत आत्मा यंत्रणेकडून प्राप्त झालेले प्रकल्प प्रस्ताव अहवालांची छाननी करून, सदर प्रस्तावांची पात्रता, व्यवहार्यता आर्थिक शाश्वत प्रकल्पाची व्हायाबिलीटी साठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक व आर्थिक बाबी तपासणी करणे. 
2. प्रकल्पासाठी आवश्यक असणारे परवाने, विद्युत पुरवठा, त्याचबरोबर खंडीत कालावधीत विद्युत पुरवठ्याची व्यवस्था असल्याची खात्री करणे. 
3. एकूण प्रकल्प अहवालाचे मुल्यमापन करून राज्यस्तरीय समितीकडे मंजुरीसाठी सादर करणे. 
4. प्रकल्प सुरू होणेपूर्वी प्रकल्पाची मोका तपासणी प्रकल्प संचालक, आत्मा, प्रकल्प उपसंचालक, आत्मा (प्रशिक्षण व पणन) व कृषि पणन तज्‍ज्ञ यांनी करावी. 
5. राज्यस्तरीय समितीस अहवाल सादर करणे. (प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषि).
6. राज्यस्तरीय समितीने वेळोवेळी निश्चित केलेल्या जबाबदारींचे पालन करणे. 
7. आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य छोट्या शेतकऱ्यांची व्यापारी संघ याची आर्थिक मदत घेणेसाठी मार्गदर्शन करणे.
अशाप्रकारे नागरिकांनी कृषि व्यावसायिकांवर आधारित कृषि उद्योजकता विकास कार्यक्रमात जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होण्याकरिता मार्गदर्शन/माहिती देण्यात येत आहे. तरी या उपक्रमात सहभागी होऊन कृषि उत्पादकता वाढवून पणन सुविधा देण्याबरोबरच पिकांच्या नवीन जाती, शेती औजारे, कृषि प्रक्रिया आदी मधील नावीन्यपूर्ण प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यातून कृषि क्षेत्रात उद्योजकता वाढीच्या संधी निर्माण करण्यास निश्चित फायदेशीर ठरेल, हे निश्चित !

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली.

माहिती स्त्रोत : महान्युज

कृषि उद्योजकता विकास (भाग-1)
कृषि उद्योजकता विकास (भाग-1)

जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांची मुख्य उद्दीष्टे शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविणे, निव्वळ उत्पन्न वाढविणे, शेतकऱ्यांना कृषी पणन सुविधा पुरविणे ही आहेत. ही उद्दीष्टे साध्य करण्यासाठी प्रकल्पांतर्गत अनेक घटक राबविले जातात. शेतकऱ्यांच्या शेतमालाला गुणवत्ता पूर्ण बनविणे, शेतमालाचे काढणी पश्चात व्यवस्थापन, प्रक्रिया, मुल्यवर्धन, कृषी मालाची थेट विक्री इत्यादीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढविणे व कृषी क्षेत्रात उद्योजकता वाढविण्यासाठी एम.ए.सी.पी. अंतर्गत “कृषी उद्योजकता विकास कार्यक्रम” (Entrepreneurship Development Program) हा घटक राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा उद्देश, अर्थसहाय्य लाभार्थी निवड, अटी-शर्ती, अंमलबजावणी आदींबाबतचे सविस्तर मार्गदर्शन या लेखाच्या दोन भागांद्वारे करण्यात येत आहे.

कार्यक्रमाचा उद्देश

क्षेत्रीय स्तरांवर अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग केले जातात. हे प्रयोग पिकांच्या नवीन जाती, उत्पादन पद्धती, शेती औजारे, व्यवस्थापन पद्धती, कृषी प्रक्रिया व मुल्यवर्धन याबाबत असतात. अशा नावीन्यपूर्ण प्रयोगांना मदत करून ते अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे व त्यातून कृषी क्षेत्रात उद्योजकता वाढीच्या संधी निर्माण करणे आवश्यक असते. या नावीन्यपूर्ण प्रयोगांना आत्मा मार्फत वेळोवेळी मदत करणे आवश्यक आहे. पीक उत्पादकता वाढ, उत्पादित मालाची गुणवत्ता वाढवून निव्वळ नफ्यात वाढ आणि बाजार संपर्क/ पर्यायी बाजार व्यवस्था याद्वारे कृषी व्यावसायिकतेवर आधारित उद्योजकता विकास करणेसाठी एम.ए.सी.पी. प्रकल्पांतर्गत “कृषी उद्योजकता विकास कार्यक्रम” (Entrepreneurship Development Program) हा घटक राबविण्यात येत आहे.

उपक्रमासाठी निवड करावयाच्या प्रकल्पाची संक्षिप्त माहिती

1. काढणी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन धान्य व फळे विषयक प्रकल्प (PHT) अहवाल.
2. मूल्यवर्धन व प्रक्रिया.
3. प्रतवारी व पणन संदर्भातील प्रकल्प अहवाल.
4. कृषि पणन विषयक प्रकल्प अहवाल, कृ‍षि मुल्यवर्धनासाठी यांत्रिकीकरण विषयक प्रकल्प अहवाल, कृषि व्यवसायाला प्रोत्साहन मिळणेसाठीचे उपक्रम जसे (ॲग्री क्लिनिक व ॲग्री बिसनेस सेंटर), शेतकरी गटाने/संघाने कृषि अवजारे सामूहिक भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव. 
5. बाजारभिमुख सेंद्रीय कृषि उत्पादन, प्रतवारी व पणन याबाबत प्रोत्साहन देणारे प्रकल्प अहवाल. 
6. पशुसंवर्धनाचे (छोटे जनावरांचे उदा. शेळी, मेंढी) संबंधीत प्रकल्प अहवाल.

अर्थसहाय्य मर्यादा

प्रस्तावामधील उद्योजक उभारणीसाठी लागणारी मशिनरी व उपकरणे या बाबींनाच फक्त अर्थसहाय्य उपलब्ध होईल. मशिनरी व उपकरणे या बाबींवरील खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त रु. 10 लाख इतके अनुदान देण्यात येईल. जमीन खरेदी व बांधकामे या बाबी अर्थसहाय्यासाठी गृहीत धरल्या जाणार नाहीत. प्रकल्प किमान 6 वर्षे यशस्वीपणे चालविणे बंधनकारक आहे.
प्रकल्पांतर्गत वित्त सहाय्यासाठी फक्त नव्यानेच यापुढे सुरू होणारे प्रकल्पच ग्राह्य धरण्यात येतील. जे प्रकल्प यापूर्वीच कार्यान्वित झालेले आहेत त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध होणार नाही. पूर्वी कार्यान्वित असलेले प्रकल्प अर्थसहाय्यासाठी पाठविल्यास व तशी खात्री झाल्यास संबंधीत अधिकारी प्रशासकीय कारवाईस पात्र राहतील व त्यांच्या विरुद्ध योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल. प्रकल्पासाठी लाभार्थी बँकेकडून कर्ज घेणार असल्यास तसे कर्ज राष्ट्रीयकृत बँकेकडूनच घेणे बंधनकारक आहे.

प्रकल्प व लाभार्थी निवडीची प्रक्रिया

कृषि उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी उत्पादक गट/शेतकरी उत्पादक कंपनी यांना लाभ देण्यात यावा. प्रकल्प संचालक, आत्मा यांनी आर्थिक वर्षाच्या सुरूवातीस कृषि उद्योजक प्रकल्पाची वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धी द्यावी. सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून आलेल्या प्रस्तावापैकी प्रकल्पातील परिक्षेत्राचा जास्तीत जास्त विचार करून उद्योजकाची निवड जिल्हास्तरीय निवड समितीमध्ये करण्यात यावी. तसेच जिल्हास्तरीय निवड समितीच्या सभेचा इतिवृत्तांत लिहावा व उपस्थित सभासदांची स्वाक्षरी या प्रस्तावावर घेण्यात यावी. यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी.

प्रकल्पाच्या सर्वसाधारण अटी व शर्ती

1. अन्नधान्य व फलोत्पादन पिकांच्या कच्या मालावर प्राथमिक स्वरुपाची प्रक्रिया करून, गुणात्मक वाढ करणे अपेक्षित आहे. यामध्ये नवीन, सुधारित तंत्रज्ञानाच्या समावेश असणारे नावीन्यपूर्ण प्रक्रिया प्रकल्पच पात्र ठरतील. 
2. प्रकल्पाच्या ठिकाणी स्वच्छतेविषयक सर्व निकष काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. आवश्यक असल्यास एफपीओ यांचेकडून प्रकल्पासाठीचे लायसन्स/प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. 
3. उत्पादनाचे व्यापारी नाव (Brand Name) संबंधीत कागदपत्रे प्रस्तावाबरोबर जोडणे आवश्यक आहे.
4. जो प्रकल्प उभा करावयाचा आहे त्या प्रकल्पासंदर्भात लाभार्थीने त्याविषयीचे प्रशिक्षण घेतलेले असावे. कृषि विद्यापीठ/कृषि विज्ञान केंद्र/कृषि विभाग/शासन मान्यता प्राप्त संस्थेत प्रशिक्षण घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. 
5. एका लाभार्थी संस्थेचा, प्रकल्प कालावधीमध्ये एकच प्रस्ताव अर्थसहाय्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल.
6. प्रस्तावाबरोबर प्रकल्पाचा आराखडा (प्रोजेक्ट रिपोर्ट) जोडावा. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पांतर्गत कृषि व्यवसाय प्रोत्साहन सुविधा (ABPF) अंतर्गत कृषि उद्योजकांना कृषि व्यवसायाशी संबंधीत प्रकल्प अहवाल तयार करून देण्याची सुविधा उपलब्ध असून त्यासाठी प्रकल्प संचालक, आत्मा यांच्याशी संपर्क साधून या विनामूल्य सुविधेचा फायदा प्रकल्पाचा आराखडा (Project Report) तयार करण्यासाठी घेता येईल. याशिवाय हा आराखडा चार्टर्ड अकौंटंट (सनदी लेखापाल) अथवा तज्‍ज्ञ व्यक्तीकडून तयार करून घेण्यात येऊ शकतो. प्रोजेक्ट रिपोर्टशिवाय (डिआरपी) प्रस्तावाचा अर्थसहाय्यासाठी विचार केला जाणार नाही.
7. प्रकल्प अहवाल हा बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्यायोग्य असावा. (बँकेबल प्रोजेक्ट) त्यामध्ये मुख्यत: प्रकल्पाचा संक्षिप्त तपशील, उत्पादन कार्यक्रम, त्यासाठी लागणारी मशिनरी व साहित्य, कच्चा माल व त्याची उपलब्धता, इतर साधन सामग्री (वीज, पाणी, इ.) मनुष्यबळ, बाजारपेठेची उपलब्धता व नफ्याचे विश्लेषण या बाबींचा अंतर्भाव असावा. नफ्याचे विश्लेषण काढण्यासाठी प्रकल्प खर्च, त्यासाठी लागणारे कायमस्वरूपी व खेळते भांडवल व त्यापासून मिळणारे उत्पन्न या बाबींची आवश्यकता राहील. प्रक्रिया केंद्र दीर्घ कालावधीसाठी चालू शकेल व ते आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या सक्षम असेल या बाबींची प्रकल्प अहवालातून खात्री होणे आवश्यक आहे.
8. प्रकल्प आधारित विकास कार्यक्रमाच्या संकल्पनेनुसार एकमेकाशी संलग्न/पुरक इतर घटकांचा एकत्रित प्रस्तावही लाभार्थ्यांस सादर करता येईल.
9. प्रकल्प अहवाल (Project Report) इंग्रजीमध्ये तयार करण्यात यावा. प्रकल्प अहवाल तयार करताना विचारात घ्यावयाच्या बाबींची माहिती सहपत्रित करण्यात आलेली आहे. जिल्हा उद्योग केंद्र/कंपनी ॲक्टनुसार प्रमाणपत्र/एफपीओ नोंदणी प्रमाणपत्र/संस्थेची नोंदणी प्रमाणपत्र जोडावे. सादर केलेल्या बाबींवर इतर योजनेतून फायदा घेतलेला नाही असे हमीपत्र प्रकल्प संचालक, आत्मा यांनी द्यावयाचे आहे. लाभार्थीने ज्या घटकासाठी अर्थसहाय्य घेतले आहे ते घटक/प्रकल्प किमान 6 वर्षे कार्यान्वित राहणे बंधनकारक राहील अन्यथा सदरील रक्कम व्याजासहित वसुलपात्र राहील.
10. प्रस्तावाबरोबर आवश्यक ती कागदपत्रे, देयके/दरपत्रके, बांधकाम नकाशा व अंदाजपत्रक (स्थापत्य अभियंता यांचे स्वाक्षरीने) इ. जोडणे आवश्यक आहे. लाभार्थीने ज्या घटकासाठी अर्थसहाय्य मागितले आहे तो घटक/प्रकल्प पूर्ण झाला असल्यास एकूण प्रकल्पाच्या (खर्चाचे चार्टर्ड इंजिनियरचे प्रमाणपत्र व एकूण प्रकल्प खर्चाचे चार्टर्ड अकौंटंटचे प्रमाणपत्र जोडावे.)
11. लाभार्थी व प्रकल्प संचालक, आत्मा यांच्यात अनुदान वितरणाच्यावेळी रुपये 100/- च्या स्टँम्प पेपरवर नोटराईज्ड केलेला विहित नमुन्यातील करारनामा करण्यात यावा. लाभार्थी हा एखादी संस्था असल्यास लेखा परीक्षणाचा अहवाल (मागील तीन वर्षाचा) जोडावा. सहकारी संस्था असल्यास संस्था कार्यरत असल्याबाबतचे जिल्हा उपनिबंधकाचे प्रमाणपत्र जोडावे.
12. प्रकल्प चालू करण्यापूर्वीची मोका तपासणी करण्याची जबाबदारी प्रकल्प संचालक, आत्मा यांची राहील. प्रपत्र 1 मधील तपासणी अहवाल व त्यासोबत प्रस्ताव मंजूरीसाठी शिफारस करून पाठविताना द्यावयाचा मोका तपासणी अहवालासाठी दिलेल्या प्रपत्रामध्ये अहवाल द्यावयाचा आहे. त्यांच्याशिवाय प्रकल्प उपसंचालक – 2 आत्मा यांनी प्रकल्प सुरू होण्यापूर्वी व प्रकल्प झाल्यानंतर द्यावयाच्या मोका तपासणी अहवालावर सह्या केल्यास त्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. याची कृपया नोंद घेण्यात यावी. 
13. अर्थसहाय्याचा लाभ घेण्यासाठी सादर करण्यात येणारा प्रस्ताव हा मूळ प्रतीत पाठविण्यात यावा. झेरॉक्स प्रती पाठविण्यात येवू नयेत. तसेच प्रस्तावासोबत काही कागदपत्रे साक्षांकित करावयाची असल्यास ती राजपत्रित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने करावीत. अनुदानाची रक्कम धनादेशाद्वारे बँक कर्ज खात्यावर जमा करण्यात येईल. मात्र त्यासाठी लाभार्थीने बँकेतील कर्ज खाते क्रमांकाचा तपशील देणे आवश्यक राहील. बिगर सहकारी संस्थानी कंपनी व्यवस्थपनात/मालकी हक्कात बदल केल्सास लाभार्थीने तसे कार्यालयास कळविणे बंधनकारक राहील व त्याची प्रत नोडल ऑफिसर, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषि), एम.ए.सी.पी.,पुणे यांना देणे बंधनकारक राहील.
14. लाभार्थ्यांने सदर प्रकल्पाच्या नाम फलकावर “जागतिक बँक सहाय्यित महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकस प्रकल्पाच्या अर्थसहाय्याने” असे ठळक अक्षरात नमूद करावे. तसेच नाम फलकावर महाराष्ट्र स्पर्धाक्षम विकास प्रकल्पाचे सांकेतिक चिन्ह असणे बंधनकारक आहे. प्रकल्पाच्या जागेबाबतचा मालकी हक्क पुरावा (7/12 आणि 8 अ उतारे) किंवा नोटराइज्ड भाडेपट्टी करारनामा/लिज डिड पुरावा देण्यात यावा. जागा भाडे तत्वावर घेतली असल्यास भाडेपट्टीचा कालावधी किमान वीस वर्ष असावा.
15. भांडवली खर्चाचे अर्थसहाय्यासाठी विचार करण्यात येईल. प्रस्तावामध्ये बऱ्याच वेळा लाभार्थीकडून मोठ्या प्रमाणावर बांधकामाचा खर्च समाविष्ट करण्यात येतो. हा खर्च अर्थसहाय्य देण्यासाठी विचारात घेतला जाणार नाही. प्रकल्पासाठी येणारा बांधकामाचा खर्च स्वत: लाभार्थ्यांने करावयाचा आहे.

संकलन :जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली.

माहिती स्त्रोत : महान्युज

फार्महब वर उपलब्ध माहिती ही लोकांनी पुरवलेली असून विविध स्रोतांतून संकलित केलेली आहे. आम्ही या माहितीची हमी किंवा जबाबदारी घेत नाही.