केळीचा घड काढल्यानंतर केळीच्या खोडापासून धागानिर्मिती करणे शक्य आहे. त्यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळू शकेल.
केळीचे खोड लवकर कुजत नसल्यामुळे आंतरमशागतीसाठी अडचणी येतात. मात्र, खोडापासून धागानिर्मितीमुळे ही अडचण दूर होण्यासोबत उत्पन्नही मिळू शकते.
केळी खोडापासून धागानिर्मितीसाठी आवश्यक बाबी
केळी खोडापासून धागा काढणारे यंत्र
कापलेल्या केळीझाडांचे खोड
तीन पुरुष मजूर व २ स्त्री मजूर प्रतिदिवस
केळी खोडापासून धागानिर्मितीची प्रक्रिया
केळी खोडापासून उत्कृष्ट प्रतीचा धागा काढण्यासाठी लाल केळी, नेंद्रन, रस्थाली ह्या जातींचा वापर करतात. महाराष्ट्रात लागवडीखाली असलेल्या अर्धापुरी, ग्रॅन्ड नैन, श्रीमंती, महालक्ष्मी ह्या जातींपासूनही चांगल्या प्रतीचा धागा काढता येतो. धागा काढण्यासाठी फक्त खोडाचाच वापर करता येतो असे नाही, तर घडाच्या दांड्याचा तसेच पानाच्या शिरेचाही करता येतो. परंतु, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर धागा फक्त खोडापासून बनू शकतो. धागा काढण्यासाठी खोडाचा वापर झाड कापल्यापासून चोवीस तासांच्या आत करावा.
धागा काढणीसाठी तीन माणसांची गरज असते. एक माणूस खोड उभे चिरून त्याचे चार तुकडे करतो. त्यासाठी गुजरात येथील नवसारी कृषी विद्यापीठामध्ये केळीचे खोड कापणी यंत्र तयार केले आहे. हे यंत्र खोडाचे दोन ते चार उभे काप करते. दुसरी व्यक्ती प्रत्यक्ष यंत्रावर धागा काढणीचे काम करते. तिसरी व्यक्ती काढलेला धागा पिळण्याची प्रक्रिया करून धागा दोरीवर वाळत घालते. तसेच प्रक्रियेदरम्यान निघालेले पाणी व लगदा वेगळे करते. दोन स्त्री मजुरांचा वापर सहाय्यक म्हणून होतो.
सुकवलेला धागा मोठ्या दाताच्या फणीने विंचरून घेतल्यास धाग्याची प्रत चांगली मिळते. कुशल कारागीराद्वारे आठ तासांमध्ये २० ते २५ किलो धागा मिळू शकतो. या यंत्राची किंमत अश्वशक्तीनुसार ७० हजार ते १ लाख ७५ हजार रुपये अशी असते. केळी खोडापासून काढलेला धागा एकूण ३ (पहिली, दुसरी व तिसरी) प्रतीत विभागला जातो. यंत्रामधून काढलेले सूत सहसा तिसऱ्या प्रतवारीचे असते. त्याला विंचरून घेतल्यास ते दुसऱ्या प्रतिपर्यंत जाऊ शकते. त्यानंतर लाकडी पाटीने त्यास पॉलिश करून पांढरे शुभ्र झाल्यास पहिल्या प्रतिपर्यंत जाऊ शकते.
धाग्याचा दर
पांढरा शुभ्र धागा – १०० ते १२० प्रतिकिलो
सिल्व्हर शाईन धागा – ८० ते १०० प्रतिकिलो
पिग्मेंट युक्त धागा – ८० रु. किलो
धाग्याची उपयुक्तता
धाग्यापासून बारीक दोरी, दोरखंड, पिशव्या, पाय पुसणी, चटई, आकर्षक टोप्या, कापड, साड्या, शोभेच्या वस्तू, क्राफ्ट पेपर, टिश्यू पेपर, फिल्टर पेपर, पृष्ठ, फाईलसाठी जाड कागद, सुटकेस, डिनरसेट, बुटांचे सोल, चप्पल इत्यादी वस्तू बनविता येतात.
केळी खोडापासून धागा निर्मितीचे फायदे
केळी बागेतील न कुजणारे अवशेष जाळले जातात. त्यामुळे पर्यावरणाच्या ऱ्हासासोबतच जमिनीतील उपयुक्त जिवाणूही नष्ट होतात. त्याचा फटका उत्पादकतेला बसतो.
बागेच्या स्वच्छतेसाठी लागणारी अनुत्पादक मजुरी वाचते.
दुष्काळामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे घडनिर्मिती न झाल्यास उर्वरीत उभ्या खोडापासून काही प्रमाणात आर्थिक लाभ होऊ शकतो.
केळी खोडापासून धागेनिर्मिती यंत्र व कार्यपद्धती
या यंत्रात दोन रिजिड पाइप बसवले असून, गायडिंग रोलर असतात. या रोलरमुळे केळी खोड आत सरकते. खोडाच्या आकारमानानुसार दोन रिजिड पाइपमधील अंतर कमी-जास्त करता येते. रोलर फिरविण्यासाठी बेल्ट पुली यंत्रणा बसवलेली असते. यासाठी एक एचपी क्षमतेची सिंगल फेज विद्युत मोटर पुरेशी होते.
यंत्राच्या दुसऱ्या बाजूने निघालेले धागे पिळून त्यातील पाणी बाहेर काढले जाते. धागे तारांवर एक दिवस वाळवतात. कोरड्या धाग्यांमध्ये विशिष्ठ प्रकारची फणी फिरवून ते एकमेकांपासून वेगळे करतात.
शेतातून खोडाची वाहतूक, उभे चिरून त्याचे चार तुकडे करणे, यंत्रात भरणे व धागे पिळून काढणे या कामांसाठी पुरुष मजूर लागतात. धाग्यांतून फणी फिरविणे, ते वाळत घालणे या कामांसाठी महिला मजूर लागतात.