प्रस्तावना
राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मागेल त्याला शेततळे ” ही योजना जाहीर केली.
प्रक्रिया
इच्छुक शेतकऱ्यांचे विहित नुमन्यातील अर्ज तथा संमती या योजनेत भाग घेण्यासाठी अनिवार्य आहे. याबाबत शेतकऱ्यांनी त्यांची मागणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे भरावयाची आहे. यासाठी करावयाचे अर्ज https://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावरुन अर्जाचा नमुना प्रपत्र-2 इच्छुक लाभार्थ्यांनी डाऊनलोड करुन घ्यावेत. ऑनलाईन अर्जांची पावती इच्छुक लाभार्थ्यांनी डाउनलोड करुन स्वत:कडे ठेवावी.
ऑनलाईन अर्ज अपलोड करण्याची प्रक्रिया संकेतस्थळावर उपलब्ध राहिल. या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तीने “आपले सरकार” या संकेतस्थळावर जाऊन मागेल त्याचा शेततळे या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर अर्जदारास पुढील तीन पर्याय उपलब्ध राहतील. यापुर्वीच तयार केलेल्या प्रोफाईलचा वापर करणे किंवा प्रोफाईल उपलब्ध नसल्यास नव्याने प्रोफाईल तयार करुन वरील कोणत्याही महा ई सेवा केंद्रामार्फत सीएससीमध्ये प्रथम प्रोफाईलसाठी स्वत:चा मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. अर्जदार स्वत:च्या अथवा सायबर कॅफेतील संगणकाचा वापर करुन अर्ज भरु शकतो. अर्जासाठी सेवा शुल्क 20 रुपये अधिक सेवाकर लागू राहिल. अर्जदाराकडे मोबाईल क्रमांक नसल्यास महा ई सेवा केंद्रातून अर्ज भरत असताना ही प्रक्रिया महा ई सेवा केंद्र चालकामार्फत करावी.
शेततळे कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी अटी व शर्ती पुढील प्रमाणे लागू राहतील.
लाभार्थी पात्रता
- शेतकऱ्याकडे त्याच्या नावावर कमितकती 0.60 हेक्टर जमीन असावी. यात कमाल मर्यादा नाही.
- लाभार्थी शेतकऱ्याची जमीन शेततळ्याकरीता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहिल.
- यापूर्वी अर्जदारांनी शेततळे, सामुदायिक शेततळे शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा.
लाभार्थी निवड
१. दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) शेतकरी व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये ज्येष्ठता यादीत सूट देऊन प्रथम प्राधान्याने त्यांची निवड करण्यात येईल.
२. या व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची ज्येष्ठता यादीनुसार प्रथम अर्ज सादर करणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे या योजनेअंतर्गत निवड करण्यात येईल.
आकारमान
या योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यापैकी कोणत्याही एका आकारमानाच्या शेततळ्याची मागणी करता येईल. यामध्ये जास्तीत जास्त 30 बाय 30 बाय 3 मीटर या आकारमानाचे व कमीत कमी इनलेट आऊटलेटसह प्रकारामध्ये किमान 15 बाय 15 बाय 3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल. तसेच इनलेट आऊटलेट विरहीत प्रकारामध्ये किमान 20 बाय 15 बाय 3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल.
शासन निर्णय :
शासन निर्णय क्रं.शेततळे-2016/प्र.क्र.1(74)/रोहयो-५, दिनांक – १७ फेब्रुवारी २०१६
राज्यात “ मागेल त्याला शेततळे ” योजनेची अनुदान पद्धतीने अंमलबजावणी करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर योजनेबाबत प्रथम टप्प्यातील जिल्हानिहाय मंजूर लक्षांक सोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये दर्शविण्यात आला आहे.
मागेल त्याला शेततळे साठीच्या मार्गदर्शक सूचना
या मार्गदर्शक सुचनामध्ये पुढील घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
- शेततळे कार्यक्रम अंमलबजावणी च्या आटी व शर्ती
- अनुज्ञेय आकारमान व अनुदान
- शेततळे योजनेची अंमलबजावणी
- योजनेची अंमलबजावणी, आढावा व सनियंत्रन
- शेततळ्याचे काम करण्यासाठी अनुसरावयाची पद्धती
- योजनेचे अंमलबजावणी वेळापत्रक
- तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मंजुरी
- लाभार्थ्यांची जबाबदारी
- कार्यान्वयीन यंत्रणांची जबाबदारी
- सनियंत्रन व नोडल अधिकारी
- तपासणी
- त्रयस्थ संस्थेमार्फत कामांची भौतिक तपासणी व मूल्यमापन
- आस्थापना खर्च
- वेबसाईट