Crop County

बोरापासून रस, सरबत, स्क्वॅश

बोरापासून घरच्या घरी रस, सरबत, स्क्वॅश तयार करता येतो. उमराण, गोला, ऍपल बोर, कडाका या बोरांपासून टुटीफ्रुटी तयार करावी.

रस

1) खाण्यायोग्य असलेली पिवळसर रंगाची पिकलेली व निरोगी बोरे निवडून घ्यावीत. किडकी बोरे निवडून काढण्यासाठी बोरे पाण्यात टाकल्यास किडकी बोरे पाण्यावर तरंगतात, तर चांगली बोरे पाण्यात बुडतात.
2) पाण्यात बुडालेली बोरे स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर बोरातील बी कॉर्क बोररच्या साह्याने काढून गरांचे बारीक तुकडे करून ते मिक्‍सरमधून लगदा तयार करावा किंवा पल्परला लावून गर एकजीव करून घ्यावा.
3) या लगद्यात 0.50 ते 1 टक्का पेक्‍टिनेज थ्री एक्‍सएल किंवा ट्रायझाइम पी-50 हे एंझाइम मिसळून रस थोडा वेळ तसाच ठेवावा. यामुळे रसाची रिकव्हरी 45-55 टक्‍क्‍यांपर्यंत मिळते.
4) हायड्रॉलिक बास्केट प्रेसच्या साह्याने त्या लगद्यातून रस काढावा. हा रस पाश्‍चराईझ करून, परिरक्षकाचा वापर करून, निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून, बाटल्या हवाबंद करून वर्षभर साठवून ठेवता येतो. हा रस पुढील पेये तयार करण्यासाठी वापरता येतो.

सरबत, स्क्वॅश, सिरप

1) सरबत तयार करताना वरीलप्रमाणे काढलेला रस 10 टक्के, रसामधील साखर ग्रहित धरून उरलेली साखर टाकून त्याचा ब्रिक्‍स 15 अंश, सायट्रिक आम्ल मिसळून आम्लता 0.30 टक्के करावी. उरलेले पाणी वापरून सरबत तयार करावे.
2) स्क्वॅश करताना रस 25-30 टक्के घ्यावा. रसामधील साखर व आम्लता ग्रहित धरून बाकीची साखर व सायट्रिक आम्ल टाकून अनुक्रमे त्याचा ब्रिक्‍स 45 अंश व आम्लता 1.50 टक्के करावी. तयार झालेला स्क्वॅश निर्जंतुक केलेल्या बाटल्यांत भरावा. स्क्वॅश वापरताना एक ग्लास स्क्वॅशमध्ये दोन किंवा तीन ग्लास थंड पाणी घालून त्याचा आस्वाद घ्यावा.
3) सिरप करण्यासाठी रस 40 टक्के घ्यावा. रसामधील साखर ग्रहित धरून उरलेली साखर व सायट्रिक आम्ल टाकून त्याचा अनुक्रमे ब्रिक्‍स 65-68 अंश, आम्लता 1.5 ते 2 टक्के व उरलेले पाणी टाकून सिरप बनवावा. स्क्वॅश व सिरपमध्ये सोडियम बेन्झोएट 600 मिलिग्रॅम प्रति किलो पेय या प्रमाणात वापरावे. सिरपचा आस्वाद घेताना एक ग्लास सिरपमध्ये चार-पाच ग्लास थंड पाणी मिसळावे.

बोराची टुटीफ्रुटी

1) बोरापासून टुटीफ्रुटी तयार करण्यासाठी उमराण, गोला, ऍपल बोर, कडाका इत्यादीसारख्या आकाराने मोठ्या असणाऱ्या जाती वापराव्यात.
2) टुटीफ्रुटी तयार करण्यासाठी पिवळसर रंगाची बोरे निवडून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत व त्यांची साल स्क्रॅपरच्या किंवा पिलरच्या साह्याने काढावी. नंतर त्यातील बी कॉर्क बोररच्या साह्याने काढून टाकून सुरीने त्यांचे चौकोनी लहान तुकडे करून उकळत्या पाण्यात 3 मिनिटे धरावेत. नंतर ते तुकडे एक टक्का सायट्रिक आम्ल असलेल्या 50 अंश ब्रिक्‍सच्या पाकात 24 तास ठेवावेत. गरज भासल्यास खाद्य रंग वापरावा.
3) दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी पाकाचा ब्रिक्‍सवर कॅंडीमध्ये दिल्याप्रमाणे करावा. तुकडे पूर्णपणे पाकवल्यानंतर पाकातून काढून, वाहत्या पाण्यात धुऊन घ्यावेत. सावलीत सुकवून, वजन करून, प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवावेत.
4) बोरापासून तयार केलेल्या टुटीफ्रुटीचा उपयोग विविध प्रकारचे केक, फ्रूट ब्रेड, फ्रूट सॅलड, आइस्क्रीममध्ये करता येतो.

जॅम


1) चांगली पिकलेली निरोगी फळे निवडून वाहत्या स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यावीत. नंतर फळांतील बी कॉर्क बोररच्या साह्याने काढून त्यांचे लहान लहान तुकडे करावेत.
2) या तुकड्यांच्या वजनाएवढे पाणी टाकून शिजवून घ्यावे व तो लगदा थंड थालेवर एक मिलिमीटरची छिद्रे असलेल्या चाळणीतून काढून घ्यावा. या एकजीव केलेल्या 1 किलो गरामध्ये 1 लिटर पाणी, 750 ग्रॅम साखर व 8-10 ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून ते मिश्रण शेगडीवर गरम करावे.
3) मिश्रणाचा ब्रिक्‍स 65 ते 68 अंश ब्रिक्‍स आला किंवा ते मिश्रण तुकड्यात पडू लागले म्हणजे जॅम तयार झाला असे समजावे. तयार झालेला जाम गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून, बाटल्या थंड झाल्यावर मेणाचा थर देऊन किंवा ऍल्युमिनियम फॉइल लावून, लेबल लावून, बाटल्या थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.