Crop County

बायोगॅस तंत्रज्ञानाची माहिती

बांधकामाच्या रचनेवरून तरंगती गॅसटाकी संयंत्र आणि स्थिर घुमट संयंत्र, असे बायोगॅसचे प्रकार आहेत. तरंगत्या टाकीचा बायोगॅस चांगला चालतो; पण त्यासाठी बराच खर्च येतो.

संयंत्रावर तरंगणारी लोखंडी टाकी गंजल्यास किंवा काही कारणांनी निकामी झाल्यास ती दुरुस्त करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी बराच खर्च येतो. सध्या महाराष्ट्रात स्थिर घुमट संयंत्र प्रकारातील दीनबंधू बायोगॅस बांधले जातात.

बायोगॅस बांधणीसाठी लागणारे साहित्य हे उत्तम दर्जाचे असावे. शिवाय बांधणारा गवंडी कुशल कारागीर असावा. बायोगॅस संयंत्र शौचालयास जोडल्यास स्वच्छता राखण्यास मदत होते.

बायोगॅस संयंत्राचे बांधकाम

1) बायोगॅस बांधण्यासाठी घराजवळची उंच, मोकळी, कोरडी व बराच वेळ सूर्यप्रकाश मिळणारी जागा निवडावी.

2) जागा शक्‍यतो गोठ्याजवळ किंवा घराजवळ असावी.
3) जमिनीखालील पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा खाली असावी.
4) निवडलेल्या जागेजवळ पाण्याची विहीर व हातपंप तसेच झाडे नसावीत.
5) बायोगॅसच्या आकारानुसार (घ.मी.) प्रत्येक दिवशी लागणारे शेण (किलो) वापरावे. शेण व पाणी सम प्रमाणात घेऊन मिसळावे. त्यातून कचरा काढून संयंत्रामध्ये सोडावे. थंडीच्या दिवसांत शक्‍यतो कोमट पाण्याचा वापर करावा.
6) संयंत्राच्या प्रवेश कक्षावर व निकास कक्षावर उघडझाप करणारी झाकणे बसवावीत, जेणेकरून त्यातून माणूस, प्राणी इत्यादींचा आत प्रवेश होणार नाही याची काळजी घ्यावी.
7) संयंत्राच्या निकास कक्षातून पाचक यंत्रामधील द्रावण हलवावे, जेणेकरून शेणावर जमा होणारी साय ढवळली जाईल.
8) घुमटाला नेहमी मातीने झाकून ठेवावे.
9) बायोगॅसला संडास जोडला असल्यास संडास स्वच्छ करताना रासायनिक पदार्थांचा वापर करू नये. शक्‍यतो राखेचा वापर करावा.
10) पाइपलाइनमध्ये पाणी साचू नये म्हणून पाणी काढण्याच्या नळीतून नियमित पाणी काढावे.

संपर्क – प्रा. प्रकाश बंडगर – 9764410633
पद्‌मश्री डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे, जि. कोल्हापूर