Crop County

तुती रेशीम उद्योग

कृषिप्रधान भारतामधील महाराष्ट्राचे ग्रामीण भागात शेतीशी निगडीत असलेल्या रेशीम उद्योगातून अनेक शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावले आहे. या उद्योगातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन शहरांकडे जाणारा लोंढा थांबविण्यात काही अंशी मदत झालेली आहे. आज काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी एकात्मिक शेतीचा विचार करणे गरजेचे झाले आहे. यामध्ये इतर पिकांबरोबरच रेशीम उद्योगासारख्या महिन्याला उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेती उद्योगाचा विचार करणे व अंमलात आणणे आवश्यक आहे.

रेशमाचे प्रकार – अळीच्या खाद्य प्रकारावरून रेशमाचे 4 प्रकार पडलेले आहेत. तुती रेशीम, टसर रेशीम, मुगा रेशीम व एरी रेशीम हे ते 4 प्रकार. एकूण रेशीम उत्पादनाचे 90 ते 95 टक्के तुती रेशीमचे उत्पादन घेतले जाते. तसेच रेशमाच्या चारही प्रकारात हे उच्च दर्जाचे गणले जाते. महाराष्ट्रामध्ये तुती रेशीम व टसर रेशीम या दोन प्रकारचे रेशीम उत्पादन घेतले जाते. तुती रेशीम हे पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागातील 24 जिल्ह्यांमध्ये तर टसर रेशीम हे पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या 4 जिल्ह्यांमध्ये घेतले जाते. तुती रेशीम उद्योगासाठी लागणारे अंडीपूंजाचे उत्पादन गडहिंग्लज येथे करण्यात येते.

• तुती रेशीम उद्योग – राज्यातील भौगोलिक परिस्थिती व हवामान रेशीम उद्योगासाठी पूरक आहे. उन्हाळ्यातील काही महिने वगळता राज्यातील हवामान तुतीची वाढ जोमाने होण्यास पोषक आहे. यासाठी पर्जन्यमान 600 ते 2500 मि.मि./ वार्षिक तसेच पावसाळ्यात दहा दिवसांतून एकदा 50 मि.मि. पाऊस झाल्यास तुतीची चांगली वाढ होते. यासाठी जमीन ही खोल पाण्याचा योग्य निचरा होणारी, चांगल्या प्रकारे ओलावा टिकवून ठेवणारी व भुसभुशीत असावी. तसेच तापमान 13 ते 40 अंश सेल्सिअस, पाच ते दहा तास सूर्यप्रकाश या बाबी तुती वाढीस पोषक ठरतात.

• तुती रेशीम उद्योगाचे फायदे-

1. रेशीम उद्योगापासून नियमित शाश्वत उत्पन्न मिळू शकते.

2. एकदा तुती लागवड केली की 12 ते 15 वर्ष लागवडीचा खर्च येत नाही. तसेच एकदा किटक संगोपन गृह बांधले व साहित्य खरेदी केली की पुन्हा खर्च येत नाही.

3. तुती रोपांची लागवड केल्यापासून 3 ते 4 महिन्यात तुती बाग किटक संगोपनासाठी योग्य होते. त्यामुळे इतर व्यापारी पिके अथवा फळ बागेच्या तुलनेत तुती लागवडीपासून उत्पादन कमी कालावधीत सुरू होते.

4. कमी पाण्यातही तुती जगत असल्यामुळे उन्हाळ्यात अथवा दुष्काळात दोन महिने पाणी नसतानाही तद्नंतर मिळालेल्या पाण्यावर बागा पुन्हा उगवून येते.

5. किड व रोग तसेच नैसर्गिक आपत्ती जसे अवकाळी पाऊस, गारपीट पासून बागेस विशेष नुकसान होत नाही.

6. इतर बागायती पिकांच्या तुलनेत तुतीच्या झाडांना पाणी कमी लागते.

7. रेशीम अळ्यांच्या संगोपनासाठी पाला वापरला जात असल्याने तुती बागेस किटकनाशके बुरशीनाशके इत्यादी फवारणी खर्च येत नाही.

8. किटक संगोपन संपल्यावर तुती बागेत उरलेला पाला तसेच अळ्यांनी खाऊन राहिलेला पाला जनावरांना दिल्यास त्यांच्या दुधाच्या प्रमाणात व फॅटसच्या प्रमाणामध्ये वाढ होते. रेशीम उद्योग व शेळीपालन किंवा रेशीम उद्योग व दुध व्यवसाय यासारख्या जोड उद्योगांमध्ये शेतकरी चांगला जम बसवू शकतात.

9. संगोपानातील कचरा, काड्या, अळ्यांची विष्ठा, खाऊन राहिलेला पाला हे कुजवून चांगले खत तयार होते व हा काडीकचरा गांडुळास दिल्यास अतिशय चांगल्या प्रकारचे गांडूळ खत यापासून मिळते.

10.घरातील स्त्रीया, ज्येष्ठ माणसे आपली कामे सांभाळून हा उद्योग करु शकतात तसेच घरातील व्यक्तीद्वारे सहज व सुशिक्षित बेरोजगार यांना करण्यासारखा व 50 ते 60 टक्के महिलांचा सहभाग असणारा उद्योग आहे.

11. रेशीम अळ्यांचे योग्य संगोपन, अळ्यांना पुरेशी जागा व पोषक खाद्य दिल्याने 100 अंडीपुंजाला कमीत –कमी 60 किलो कोष उत्पादन होते.

12. उत्पादित केलेल्या कोषास शासनाचा हमीभाव रु. 178.50 प्रति किलो आहेच परंतु बाजारात त्याची किंमत सरासरी 300 रुपये प्रतिकिलो पेक्षा जास्त आहे. त्यामुळे 100 अंडीपुंजाचे पीक घेतले तर 18000 रुपये तर 200 अंडीपुंजाचे पीक घेतले तर 36000 रुपये एका पिकास 30 दिवसात मिळतात.

13. एका एकर बागेमधून वर्षाला कमीत कमी 4 पिके तर जास्तीत जासत 6 पिके घेता येतात. यावरुन वर्षाला कमीत कमी 1 लाख 20 हजार रुपये उत्पादन मिळते.

14. कोषापासून धागा काढून त्यापासून कापड तयार करणे हा मुख्य भाग असला तरीही याशिवाय कमी प्रतिच्या कोषापासून फुले, बुके, हार, तोरण, वॉल पिस या बाबी तयार करता येतात.

15. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला व्यवसाय.

• तुती रेशीम सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी –

1. शेतकऱ्यांकडे किमान अर्धा ते एक एकर पाण्याचा निचरा होणारी व आठमाही पाण्याची सोय असलेली जमीन

2. एक एकर तुती लागवडीसाठी 500 रुपये शासकीय नोंदणी फी जमा करावी लागते.

3. नोंदणीसाठी शेतीचा 7/12, 8 अ उतारा, आधार कार्ड, निवडणूक कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते व पासपोर्ट साईजचे दोन फोटो, मनरेगा करीता जॉब कार्ड आवश्यक आहे.

4. तुती लागवड करणे, किटक संगोपन साहित्य खरेदी व आदश्र किटक संगोपन गृह बांधकामाची क्षमता

5. रेशीम उद्योग करण्यासाठी मानसिक तयारी

• रेशीम उद्योगासाठी मिळणाऱ्या सोयी सवलती-

1. शासनामार्फत रेशीम उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, वेळोवेळी प्रत्यक्ष बागेस भेट देऊन तसेच मेळावे, चर्चासत्र, कार्यशाळा आयोजित करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यात येते.

2. मोफत प्रशिक्षण व अभ्यास दौरे आयोजित करुन शेतकऱ्यांना रेशीम उद्योग विषयी माहिती करुन दिली जाते.

3. म.गा.रो.ग्रा.ह. योजनेमध्ये किटक संगोपन गृह बांधकामासाठी 1000 स्क्वे. फुटासाठी 91863 रुपये, 600 स्क्वे. फुटासाठी 60229 रुपये तर 225 स्क्वे. फुटासाठी 33370 अनुदान देण्यात येते.

4. योजनेअंतर्गत गट रेशीम करिता तुती गट लागवड व किटक संगोपन करिता कुशल व अकुशल कामासाठी तीन वर्षात एकूण 1 लाख 98 हजार 812 रुपये देण्याची तरतूद आहे.

• केंद्र व राज्य शासनाच्या येाजना-

1. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजना :

या योजनेअंतर्गत शासन निर्णय क्रमांक मग्रारो 2014/प्र.क्र.79/रोहयो-5, दिनांक 31 मार्च 2016 अन्वये संपूर्ण राज्यात रेशीम उद्योग विकास योजना राबविणे व रेशीम किटक संगोपन गृह बांधकाम या दोन्ही योजना संयुक्तपणे राबविण्यास मान्यता दिली असून या योजनेमध्ये तुती लागवड, जोपासना, नर्सरी, कोष काढणे याबरोबरच किटक संगोपन गृह बांधकामासाठी अकुशल व कुशल कामाकरिता मोबदला देण्यात येतो. या योजनेमध्ये मिळणाऱ्या अनुदानाचा तपशील पुढील प्रमाणे..

मनरेगा अंतर्गत तुती लागवडीसाठी तीन वर्षात दिले जाणारे अनुदान तपशिल एकक: प्रती लाभार्थी एक एकर (रक्कम रुपयात)

अ.क्र.वर्षमजुरी अकुशलसामुग्री कुशलएकूण रुपये
1प्रथम566823216088842
2द्वितीय402001928559485
3तृतीय402001028550485
 एकूण13708261730198812

मनरेगा अंतर्गत किटक संगोपन गृह बांधकामासाठी दिले जाणारे अनुदान (रक्कम रुपयात)

अ.क्र.किटक संगोपन गृहाचा प्रकारमजुरीअकुशलसामुग्रीकुशलएकूणअनुदान देय वर्ष
1मॉडेल-1(1000 चौ.फु.)428134905091863प्रथम वर्ष
2मॉडेल-2(600 चौ.फु.)259293430060299प्रथम वर्ष
3मॉडेल-3(225 चौ.फु)140701930033370प्रथम वर्ष


• पात्र लाभार्थी निकष पुढीलप्रमाणे –

1. अनुसूचित जाती

2. अनुसूचित जमाती

3. भटक्या जमाती

4. भटक्या विमुक्त जमाती

5. दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे

6. महिला प्रधान कुटुंबे

7. शारिरीक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंबे

8. भूसूधार योजनेचे लाभार्थी

9. इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी

10. अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन्य निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार पात्र लाभ व्यक्ती

11. कृषि कर्ज माफी योजना सन 2008 नुसार अल्प भूधारक (एक हेक्टरपेक्षा जास्त दोन हेक्टरपर्यंत) व सिमांत शेतकरी (एक हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र)

• मजुरी अंतर्गत समाविष्ट कामे – जमीन तयार करणे, शेणखत पसरविणे, सरी वरंबे तयार करणे, तुती रोपे लागवड, आंतर मशागत, खते व औषधी देणे, तुती छाटणी, गळ फांद्या काढणे, फांदी कापणे, शेड निर्जंतुकीकरण, चॉकी किटक संगोपन व कोष काढणे (एकूण 682 मनुष्य दिवस 201 रुपये प्रती मुनष्य दिवस याप्रमाणे)

• मनरेगाचा लाभ घेण्याकरिता आवश्यक बाबी-

1. लाभार्थी मनरेगा निकषाप्रमाणे पात्र असावा.

2. किमान अर्धा ते एक एकर सिंचनाची सुविधा असलेली बागायती स्वत:च्या मालकीची जमीन असावी.

3. शासनाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे गटाने रेशीम शेती करण्याची तयारी असावी.

4. ग्रामपंचायतीचा मनरेगाच्या कृती आराखड्यामध्ये समावेश आवश्यक

5. ग्रामसभेचा ठराव आवश्यक

6. पाणी उलब्धता प्रमाणपत्र आवश्यक

7. तुती रोपापासून लागवड करण्याची तयारी असावी

8. लाभार्थी स्वत: जॉब कार्डधारक असून शेतीमध्ये काम करणे आवश्यक आहे.

• आवश्यक कागदपत्रे –

मनरेगा जॉब कार्ड, आधार कार्ड, बॅंक पासबुक, फोटो, 7/12, 8अ, पाणी उपलब्धता, ग्रामसभेचा ठराव.

• संपर्क –

• रेशीम विकास अधिकारी

जिल्हा रेशीम कार्यालय

प्लॉट नं. 15, प्रोझोन मॉलसमोर

सिडको एन-1, औरंगाबाद

संपर्क- 0240 -2475747