Crop County

ज्वारी प्रक्रिया उद्योग

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत भरडधान्याचे उत्पादन वाढवून त्याचा दर्जा उंचावण्यासाठी “भरडधन्य विकास कार्यक्रम” राज्यात राबविला जात आहे.

यवतमाळ येथील कृषि विज्ञान केंद्र, (डॉ.पं.दे.कृ.वी.) येथे शासनाच्या कृषि आयुक्तालया मार्फत नुकतेच ज्वारी प्रकीया प्रात्यक्षिक युनिट सुरु झालेले आहे.

यवतमाळ जिल्ह्याचे वातावरण ज्वारी या पिकास अत्यंत पोषक आहे. खरीप व रबी या दोन्ही हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकरी ज्वारी पिक घेऊ शकतात.

मध्यंतरी ज्वारी या अतिशय पौष्टिक मुल्य असलेल्या पिकाकडे थोडे दुर्लक्ष झाले होते. मात्र भरडधान्य विकास कार्यक्रमाचे निमित्ताने ज्वारीचे महत्व पुन्हा वाढते आहे.

ज्वारी प्रक्रिया युनिटमध्ये एकूण चार यंत्रांचा समावेश होतो.

डी-स्टोनर

या यंत्रांद्वारे ज्वारीतील खडे, माती काडीकचरा निघून ज्वारी व ग्रेडिंग होते म्हणजेच जाड व बारीक दाणे वेगवेगळे होतात.  प्रतवारी मुळे ज्वारीची गुणवत्ता सुधारते शेतक-याला चांगली किंमत मिळते. प्रती तासाला पाचशे किलो (१/२ क्विंटल) धान्य स्वच्छ करण्याची या यंत्राची क्षमता आहे.

डी-हलर

या यंत्रांद्वारे ज्वारीला पॉलिश केले जाते.  खरीप ज्वारीला पावसामुळे  कधी कधी काजळी येते.

अशा ज्वारीला बाजार भाव एकदम कमी मिळtoतो व खाण्या करिता वापरल्यास बुरशीमुळे आरोग्यास अपाय होतो.

डीहलर मधून काळ्या व बेरंग ज्वारीवरील काळपट कवच घासून काढले जाते पांढरी स्वच्छ

ज्वारी मिळते.  परिणामी बाजारभाव चांगला मिळतो.

पल्वरायझर

हे पिठाच्या गिरणी सारखे यंत्र असून त्यात स्वच्छ पॉलिश केलेली ज्वारी टाकुन त्याचे वेगवेगळ्या जाडीचे पीठ तयार केले जाते.  तसेच ज्वारीची सोजी किंवा दलीया ज्वारीचा रवा, पीठ इ. आवश्ककते नुसार ज्वारी दळण्या करिता एक अॅडजस्टेबल हँडल यामध्ये आहे.

शिफ्टर

पल्वरायझर मधून दळून काढलेला भरडा या शिफ्टर मध्ये टाकला जातो.  याला दोन बाजूला रवा व पीठ वेगवेगळे करण्याचीसुविधा असते.  पीठ गाळून, उत्तम गुणवत्तेचा ज्वारीचा रवा यातून वेगळा होतो.  मिळालेला उत्तम गुणवत्तेचा रवा पॅकिंग मशीनने प्लॅस्टिक पिशवीत भरून लेबलिंग केले जाते.

ज्वारीच्या पिठापासून भाकरी, पापड, धापोडे, पळीपापड ई. पदार्थच आमच्या गृहिणींना माहिती होते.  परंतु या वेगवेगळ्या मशिनच्या सहाय्याने मिळणा-या जाड व बारीक पिठापासून इडली मिक्स, चकली मिक्स, ढोकळा, उतप्पा, ज्वारीच्या शेवया इ. नवीन पदार्थ तयार करता येतात.  उत्तम प्रतिचा रवा, दलिया यांचेही चांगले मार्केटिंग करता येते.

आरोग्याप्रती जागरूक असण्यासाठी व मधुमेह, रक्तदाब, कँन्सर, अतिजाड

या वर्गात येणा-या व्यक्तींकरिता आहारातील ज्वारीचे अनन्यसाधारण महत्व आहे.  ज्वारीतील पौष्टिक गुणधर्मा बद्दल मुख:त्वे त्यातील उच्च दर्जाच्या डायटरी फायबर्स ला कुठलाही पर्याय नाही.

ज्वारीमध्ये ७२% कर्बोदके ११.६% प्रथिने व १.९% मेदाचे प्रमाण आहे.  तसेच प्रथीनामध्ये अल्ब्युमीन, ग्लोंब्युलीन, प्रोलॅमीन व ग्लाटेलीन इ. या समावेश आहे.  डायटरी फायबर्स मुळे व प्रथिनांमुळे नर्व्हस सिस्टीम सशक्त होण्यास व चयापचयाची प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.  मलबद्धता व

मलावरोध यासारखे आजार उद्भभवत नाही.  सर्व प्रकारची पौष्टिक मुल्ये जसे जीवनसत्वे, खनिजे व डायटरी फायबर्स ज्वारीमधून संतुलित प्रमाणात मिळतात.

बचत गटांकरिता या ज्वारी प्रक्रिया युनिटद्वारे रोजगाराची नवीन संधी उपलब्ध झाली आहे.  काळी ज्वारी पॉलिश करून देणे, ज्वारीचे ग्रेडिंग करून देणे, ज्वारीचे वेगवेगळे जाडीचे पीठ तयार करून व्यवस्थीत व आकर्षक पॅकिंग केल्यास उत्तम व्यवसाय उदयाल येऊ शकतात.

तसे ‘रेडी टू यूज’ व ‘ इंस्टंट मिक्स ‘ इ. प्रक्रिया पदार्थ ज्वारीपासून तयार करता येतील.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे ज्वारी प्रक्रिया केंद्रात शेतकरी गट, शेतकरी महिला व ग्रामीण युवक युक्तिंकरीता या विषयावर प्रशिक्षण देण्याची व्यवस्था उपलब्ध आहे.

संपर्क :- डॉ. प्रमोद यादगीरवार , कार्यक्रम समन्वयक किंवा प्रा. नीलिमा पाटील ,विषय विशेषज्ञ दूरध्वनी क्र.(०७२३२) २४८२३५