Crop County

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात झाल्यास आता शासन मदतीसाठी धावले आहे. अपघातामुळे मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे अर्थसहाय्य देण्यात येते.शेतकऱ्याला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेचा कालावधी 1 डिसेंबर 2016 ते 30 नोव्हेंबर 2017 असा असून दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीमार्फत योजना राबविण्यात येत आहे.

या कालावधीसाठी राज्यातील सर्व सातबाराधारक शेतकऱ्यांचा विमा हफ्ता शासनामार्फत भरण्यात आला असून दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. अपघात होणाऱ्या शेतकऱ्यांचा विमा प्रस्ताव विमा कालावधीत तसेच विमा कालावधी संपल्यानंतरही 90 दिवसापर्यंत केव्हाही विमा कंपनीकडे सादर करता येईल. विम्याचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी 10 ते 75 या वयोगटातील सातबाराधारक असणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांनी अर्जाच्या नमुन्यासाठी आपल्या नजिकचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्याच्या वारसदाराने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत शासनाचे विमा सल्लागार प्राथमिक छाननी करून प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजूरीसाठी पाठवितात.

या योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी कृषी विभागाकडून सहाय्य करण्यात येते. शासनाने जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. या कंपनीला अधिकृत विमा सल्लागार म्हणून नेमले असून त्यांचा टोल फ्री क्रमांक 18002333533 आहे. प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी कोणत्याही खाजगी व्यक्ती, मध्यस्त किंवा दलालाचे सहाय्य घेण्याची आवश्यकता नाही. शेतकरी किंवा त्यांच्या वारसदारांनी समस्या असल्यास कृषी विभाग किंवा सल्लागार कंपनीशी संपर्क साधावा.यापूर्वी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्यावतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणतीही वेगळी विमा योजना लागू केली असल्यास अथवा विमा उतरवला असल्यास त्याचा या योजनेशी संबंध राहणार नाही. या विमा योजनेअंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतील.
लाभ कधी मिळेल

विमा संरक्षणात रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, हिस्त्र जनावरांनी खाल्ल्यामुळे किंवा चावल्यामळे जखमी होणे किंवा मृत्यू, दंगल आणि अन्य कोणतेही अपघातांचा समावेश करण्यात आला आहे.
लाभ कधी मिळणार नाही

नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, बाळंतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबींचा विमा संरक्षणात समावेश नाही.
अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.