Crop County

केळी पीक विमा योजना

रावेर, जि. जळगाव – हवामानावर आधारित पीक विमा योजनेसंदर्भात केळी पिकाच्या संवेदनशील “ट्रिगर्स अवस्थे’बाबत अहवाल तयार करून तो मुख्य सांख्यिकी विभाग पुणे यांना पाठविल्याची माहिती कृषी विभागाचे तंत्र अधिकारी अनिल भोकरे यांनी सांगितले. तर सहकारी साखर कारखान्यांना साखर निर्यातीची परवानगी व केळीसाठी पीक विमा योजनेसंदर्भात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या भेटीची वेळ मिळाल्याची माहिती खासदार हरिभाऊ जावळे यांनी “ऍग्रोवन’शी बोलताना दिली.

केळी पिकाला विमा, तसेच फळ म्हणून मान्यता मिळावी यासंदर्भात “सकाळ व ऍग्रोवन’ने विशेष पुढाकार घेतला आहे. कृषी विभागानेही या पुढाकाराला प्रामाणिक प्रयत्नांची जोड दिली आहे. दरम्यान, केळी, आंबा, काजू, द्राक्ष या पिकांना हवामानावर आधारित पीक विमा लागू व्हावा यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संकल्पना मांडली होती. तर यासंदर्भात राज्याचे सांख्यिकी, फलोत्पादन विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठाचे सर्व संशोधक, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे दोन-तीन बैठका झाल्या.

बैठकांमध्ये केळी संदर्भात संवेदनशील “ट्रिगर्स अवस्था’, गारपीट, पाऊस, वादळी तडाखा, अतिवृष्टीनंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे, अहवाल आदींवरून शासनातर्फे केळीसाठी हवामानावर आधारित पीक विमा योजना राबविता येईल काय? याबाबत चर्चा झाली. हॉर्टिकल्चर कृषी संचालक, फलोत्पादन विभाग अधिकारी, केळी संशोधन केंद्र जळगावचे प्रमुख शास्त्रज्ञ के. डी. बडगुजर, कृषी तंत्र अधिकारी अनिल भोकरे यांनी केळी पिकासंदर्भातील नुकसानकारक अवस्था व हवामान यासंदर्भात अहवाल तयार करून मुख्य सांख्यिकी विभाग पुणे यांच्याकडे पाठविला आहे. यानंतर पीप्रीएड कंपनी व शासन पीक विम्याचे स्वरूप ठरविणार असल्याचे श्री. भोकरे यांनी सांगितले.

काय आहे ट्रिगर्स अवस्था?

हवामानातील ज्या घटकांचा केळीवर थेट परिणाम होऊन उत्पादनात घट तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते, अशा घटकांना “ट्रिगर्स’ म्हटले जाते. सततचा पाऊस, गारपीट, वादळी वारे, कडाक्‍याची थंडी आदी घटकांचा साधारणतः यामध्ये समावेश होतो.

सर्वांना मिळणार समान न्याय

ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती स्वतःचा विमा काढून संकटकालीन संरक्षण मिळवते. त्याच पद्धतीने प्रस्तावित हवामानावर आधारित पीक विमा योजनेत सर्वांना समान न्याय देणे व शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे हा महत्त्वाचा उद्देश आहे.

—————————————————————————————

स्त्रोत: अग्रोवन