Crop County

कृषी महोत्सवातून होणार तंत्रज्ञानाची देवाण – घेवाण

बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रयोगशील व प्रगतीशील शेतकऱ्यांचे माध्यमातून शेतकऱ्यांना आपाआपसातील विचारांची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वृध्दिंगत होऊ शकतो. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा शाश्वत पद्धतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या उन्नत होऊन जागतिक पातळीवरील स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिध्द करु शकतील. याकरिता राज्यातील 34 जिल्ह्यात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमास 5 जानेवारी 2017 च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या कृषी महोत्सवा विषयीची माहिती सांगणारा लेख….

शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजना/उपक्रमांची माहिती, संशोधित कृषी तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषी पूरक व्यवसाय इत्यादी बाबतचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे. कृषी प्रदर्शन, कृषी विषयक परिसंवाद आणि अनुभवी शेतकरी/उद्योजकांची व्याख्याने, यशस्वी शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विचारवंत यांची थेट भेट घडावी व सामान्य शेतकऱ्यांना शंका निरसन करुन घेता यावे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारित धान्य व खाद्य महोत्सव तसेच फळे, फुले व भाजीपाला महोत्सव इत्यादीचे आयोजन करण्यासाठी मुंबई व मुंबई उपनगर जिल्हे वगळता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये दरवर्षी 5 दिवसीय कृषी महोत्सव साजरा करण्यास राज्य योजनेस मान्यता देण्यात आली आहे.

जिल्हा कृषी महोत्सव योजनेचा उद्देश, महोत्सवाचे स्वरुप व योजनेचे घटक याप्रमाणे असेल.

योजनेचा उद्देश

कृषी विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार, शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण, समूह, गट संघटित करुन स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करणे, कृषी विषयक परिसंवाद, व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणींद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता – खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास आणि विपणनास चालना देणे.

कृषी महोत्सवाचे स्वरुप

कृषी महोत्सव आयोजित करताना महोत्सवाचे स्वरुप कसे असावे, विविध समित्यांचे गठन व सदस्यांच्या जबाबदाऱ्या, महोत्सवाची जाहिरात, अंदाजपत्रक, प्रदर्शन मांडणीपासून यशस्वी करेपर्यंतची प्रक्रिया याबाबतचा तपशील या निर्णयान्वये देण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये या महोत्सवाचे स्वरुप सारखेच ठेवल्यास त्याद्वारे शासनाच्या कृषी तसेच अन्य विभागातील नाविन्यपूर्ण व महत्वास्च्या योजना, कार्यक्रमांच्या ग्रामीण, निमशहरी भागात प्रचार व प्रसारासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याची विविध भौगोलिक परिस्थिती व हवामान तसेच पीकपद्धती व तंत्रज्ञानाची प्राथमिकता यानुसार प्रात्यक्षिके व चर्चासत्रांच्या विषयामध्ये स्थानिक आवश्यकतेनुसार बदल होतील.

कृषी महोत्सव योजनेचे घटक

कृषी प्रदर्शन- कृषी महोत्सवातील कृषी प्रदर्शन हा महत्वा चा घटक असून यामध्ये शासकीय दालन, विविध कंपन्यांचे स्टॉल्स, खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे. जिल्हास्तरावर कृषी आणि पूरक व्यवसायाशी निगडित एकात्मिक शेती पद्धती संकल्पनेवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये कृषी संबंधित कृषी तंत्रज्ञान विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, संबंधित विविध कृषी महामंडळे यांचा सक्रिय सहभाग राहिल. शासकीय यंत्रणा बरोबरच खाजगी कंपन्या, उद्योजक, बचतगट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा सहभाग घेण्यात येईल.

परिसंवाद/चर्चासत्र

कृषी शास्त्रज्ञ, कृषी व संलग्न विभागातील तज्ज्ञ अधिकारी, विविध पुरस्कार प्राप्त प्रयोगशील शेतकरी, प्रक्रिया उद्योजक, यशस्वी महिला शेतकरी/उद्योजिका यांची व्याख्याने आयोजित करण्यात यावीत.

उत्पादक ते ग्राहक थेट विक्री केंद्र

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या दर्जेदार मालाची विक्रीद्वारे श्रृंखला विकसीत करण्यास प्रोत्साहन देण्यात येईल.

विक्रेता खरेदीदार संमेलन

विविध सार्वजनिक खासगी भागीदारीतून चालू प्रकल्प, कृषी माल प्रक्रिया उद्योजक आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या एकत्रित सुसंवादाकरिता सर्व घटक एका व्यासपीठावर आणून बाजाराभिमुख कृषी विस्ताराला चालना देणे.

शेतकरी सन्मान समारंभ

जिल्ह्यातील कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले शेतकरी तसेच पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांचा प्रशस्तीपत्रासह यथोचित सन्मान करुन स्मृतीचिन्ह वितरण करण्यात येतील.
जिल्हा कृषी महोत्सवाअंतर्गत कृषी प्रदर्शन व धान्य महोत्सवात शासकीय दालनामध्ये 40 स्टॉल्स, कृषी निविष्ठा 30, कृषी तंत्रज्ञान व सिंचन 30, गृहोपयोगी वस्तू 40, धान्य महोत्सव 20, खाद्यपदार्थ 20 अशा एकूण अंदाजे 200 स्टॉलचा समोवश असेल. शासकीय दालनामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती व उपक्रम यांचे स्टॅाल्स असतील. या कार्यक्रमाकरिता पुढील शासकीय विभाग, कार्यालये, यंत्रणांच्या दालनांना प्राधान्य देण्यात यावे.

कृषी विभागाच्या विविध योजना, उदा. प्रधानमंत्री फसल बिमा योजना, शेतकरी अपघात विमा योजना, जलयुक्त शिवार अभियान, आत्मा, माहिती विभाग, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना,इ., संबंधित विभागातील कृषी विद्यापीठ (विस्तार व प्रशिक्षण), जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचा कृषी विभाग (विविध लोक कल्याणकारी योजना), महसूल विभाग (सुवर्ण जयंती राजस्व अभियान, विविध लोक कल्याणकारी योजना), समाजकल्याण विभाग (विविध लोक कल्याणकारी योजना), आरोग्य विभाग (म.फुले जनआरोग्य योजना), सामाजिक वनीकरण महासंचालनालय (वृक्ष तोड प्रतिबंध जनजागृती), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (विविध लोक कल्याणकारी योजना), विविध संशोधन केंद्रे (सुधारित, संशोधित व विकसित वाण व तंत्रज्ञान यांचा प्रचार प्रसार), विविध कृषी विज्ञान केंद्रे (अव्यावसायिक लोककल्याणकारी उपक्रम), ग्रामीण विकास विभाग (विविध लोक कल्याणकारी योजना), स्वच्छ भारत अभियान, तंटामुक्ती अभियान.

या कृषी महोत्सवात खालील उपक्रम, विभागांच्या दालनांचाही समावेश असेल. महाराष्ट्र फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ, महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ, वसुंधरा एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम, महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मक प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ, एन.सी.डी.ई.एक्स, रेशीम विकास विभाग, नाबार्ड, भारतीय कृषी संशोधन परिषद, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्था, अपेडा, संबंधीत जिल्ह्यांच्या अग्रणी बँका, संबंधीत जिल्ह्यांच्या मध्यवर्ती सहकारी बँका, संबंधित जिल्ह्यांतील दुग्ध उत्पादन संस्था, बी.एस.एन.एल., मेडा (महाऊर्जा).

राज्याच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) या केंद्रपुरस्कृत योजने अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या आत्मा नियामक मंडळामार्फत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. जिल्हा कृषी महोत्सव आयोजनाकरिता आत्मा नियामक मंडळाची रचना, स्वरुप अध्यक्ष, सदस्य व सदस्य सचिव यांच्या कामांची विभागणी या प्रमाणे राहील : जिल्हाधिकारी अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य, प्रकल्प संचालक आत्मा सदस्य सचिव, जिल्हा माहिती अधिकारी सदस्य, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सदस्य, कृषी विकास अधिकारी संबंधित जिल्हा परिषद सदस्य, मान्यताप्राप्त इव्हेंट कंपनीचे आयोजक सदस्य असतील.

कृषी महोत्सवाचा कार्यकाळ, हंगाम

जिल्हा कृषी महोत्सव 5 दिवसांचा असेल तसेच महोत्सवाची तारीख ऑक्टोबर ते मार्च या दरम्यान घेतल्यास यावेळी पावसाची शक्यता कमी प्रमाणात असते. या दरम्यानच्या काळामध्ये शक्यतो स्थानिक पीक पद्धतीनुसार शेतकऱ्यांकडे वेळ उपलब्ध असेल असा काळ निवडावा. महोत्सवादरम्यान रविवार तसेच सार्वजनिक सुट्या येतील अशा तारखा निवडाव्यात. या दरम्यान स्थानिक पातळीवर मोठा उत्सव/सण तसेच राज्यातील वेळोवेळी होणाऱ्या विविध प्रकारच्या निवडणूकांचा आचारसंहिता कालावधी या बाबी आत्मा नियामक मंडळ विचारात घेईल.

आर्थिक तरतूद

जिल्हा कृषी महोत्सव योजना ही 100 % राज्य योजना राज्यात 2018-19 पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2016-17 या चालू आर्थिक वर्षात मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित 34 जिल्ह्यांकरिता कृषी महोत्सव आयोजनाकरिता रुपये 20 लाख प्रति जिल्हा याप्रमाणे एकूण रुपये 680 लाख एवढी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. सदर योजने अंतर्गत कार्यक्रम आयोजनावरील खर्चाच्या, मानधनाच्या रकमा DBT (Direct Benefit Trasfer) द्वारे तात्काळ प्रदान करण्यात येतील.

जिल्हा माहिती कार्यालय, धुळे

स्त्रोत – महान्युज